Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

मौलिक क्षण “हीरक महोत्सव समारोह” दिनांक २ मे ते ४ मे २०२२

मौलिक क्षण “हीरक महोत्सव समारोह” दिनांक २ मे ते ४ मे २०२२

सन २०२१-२२ या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. भाऊसाहेब काळे भागशाळेमध्ये कोरोना प्रतिबंधांचे पालन करीत  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपल्या मंडळाने प्रसिध्द केलेल्या हीरक महोत्सवी ‘निर्धार’ स्मरणिकेत मंडळाच्या स्थापनेपासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या वाटचालीतील सर्व महत्वाच्या घटनांचा आढावा सन्माननीय सभासद आणि हितचिंतकांसाठी सादर करण्यात आला आहे. तो माहितीपूर्ण, उद्बोधक आणि स्मृती जागविणारा आहे. प्रस्तुत वार्तांकनाद्वारे  दिनांक २ मे २०२२ ते ४ मे २०२२ या तीन दिवसात प्रत्यक्ष हीरक महोत्सव सांगता समारोहाचा शुभारंभ आणि त्यासह आयोजित विविध र्यक्रमांचे आणि प्रमुख घटनांचे संक्षिप्त वृत्तांकन आपल्या  सर्वांच्या माहितीसाठी सादर करीत आहोत.

        मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचा दिमाखदार हीरक महोत्सवी सांगता समारोह दिनांक २ मे २०२२ ते ४ मे २०२२ या तीन दिवसात अतिशय उत्साहाने आणि आनंदात पार पडला. मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाटचालीतील महत्वाचा मैलाचा दगड आणि कार्यपूर्तीचा हिरेजडीत टप्पा अशी या दिमाखदार सोहळ्याची मंडळाच्या वाटचालीत नोंद व्हावी असे दृष्ट लागण्यासारखे सुनियोजित आयोजन करण्यात आले होते. वर्षभर पार पडलेल्या विविध उपक्रमांसह हीरक महोत्सवाच्या सुनियोजित आखणीचे आणि सादरीकरणाचे शिवधनुष्य हीरक महोत्सव समितीने लिलया पेलले याबद्दल हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे, उपाध्यक्ष श्री. भास्कर पाळेकर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप पांडुरंग पाळेकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल जनार्दन तेली, सचिव श्री. रमेश कविटकरसर, खजिनदार श्री. रघुनाथ रत्नोबा पाळेकर  सर्व सल्ल्गार, पदाधिकारी आणि सभासदांचे मन:पूर्वक आभार मानून हीरक महोत्सव सांगता समारोहाच्या वार्तांकनाला सुरुवात करतो.

हीरक महोत्सव सांगता समारोह शुभारंभ – दिवस पहिला: सोमवार दिनांक २ मे २०२२:

        हीरक महोत्सवी सांगता सोहळ्याच्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राचा शुभारंभ सकाळी ८.३० वाजल्यापासून कार्यक्रमास निमंत्रित मान्यवरांचे संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत विध्यार्थी मानवंदना, बँडपथक स्वागत, मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाकडून आदरातिथ्य आणि मार्गदर्शन असे आपुलकीच्या वातावरणात झाले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर मा. श्री विश्वासराव पाळेकर, अध्यक्ष, मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व संस्थापक डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन हीरक महोत्सवी सांगता समारोप समारंभाचा शुभारंभ झाला. मुख्याध्यापक श्री. दिलीप घरपणकर आणि त्यांच्या सहकारी शिक्षक कर्मचार्‍यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे पुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले.

      प्रमुख पाहुणे मा.श्री. शरदराव उत्तम शेटे, सहाय्यक प्राध्यापक, श्रीम. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांचेसमवेत सन्माननीय पाहुणे मा.श्री.अशोक मनोहर देसाई,सर कार्यवाह, अखिल कुंभवडे ग्राम विकास मंडळ, मा.श्री. बाबुराव वामनराव राणे, अध्यक्ष, श्रीपावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ, बापर्डे, मा.डॉ. मीरा पिंपळस्कर,M.Sc.Ph.D., मा. डॉ. प्रसाद रमेश भिडे, MA.Ph.D,  अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव राणे, उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, हीरक महोत्सव समिती अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे,   कार्योपाध्यक्ष श्री. जितेंद्र साळुंके,  

मुख्य कार्यवाह श्री. सुभाषचंद्र परांजपे, सह कार्यवाह श्री. विवेक केळकर, कोषाध्यक्ष श्री. संजय टाकळे डॉ. हेमलता पुरंदरे, श्रीमती सविता फणसळकर, सौ.गीता सोवनी, श्री. रमेश भिडे, डॉ. दिलीप पाळेकर, श्री. विलास साळुंके,श्री. अच्युतराव राणे, श्री. राजेश राणे, मुख्याध्यापक श्री. दिलीप घरपणकर इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत आणि टाळ्यांच्या गजरात मंडळाच्या “निर्धार” या हीरक महोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. याचबरोबर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते हीरक महोत्सवी स्मृती चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

         हीरक महोत्सवी सांगता समारंभास उपस्थित सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक शाल, गुलाबपुष्प, निर्धार स्मरणिका आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर हीरक महोत्सव समारंभाचे औचित्य साधून मंडळाच्या कामकाजात महत्वपूर्ण योगदान देत भरीव कार्य करणार्‍या श्री.शिवाजी राणे, श्री.धनंजय परांजपे, डॉ.हेमलता पुरंदरे, श्री. सुभाषचंद्र परांजपे, या मान्यवरांचे शाल, गुलाबपुष्प, निर्धार स्मरणिका आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. मंडळाचे माजी जेष्ठ पदाधिकारी श्री. रमेशराव घाटे, श्री. प्रभाकर परांजपे हे वयपरत्वे समारंभास हजर राहू शकले नसल्याने त्यांचा सत्कार मुंबईत करण्यात आला. मंडळाचे मणचेतील मुख्य आधारस्तंभ श्री. बापुसाहेब गोखले यांचा मणचे येथे दुपारच्या कार्यक्रमात सत्कार करण्याचे ठरले.

हीरक महोत्सवाच्या मुहुर्तावर मंडळाच्या कार्यालयात, मंडळ स्थापनेपासून ते हीरक महोत्सवापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाने मंडळ स्थापना, शैक्षणिक उद्दिष्टांची कार्यवाही, शैक्षणिक विस्तार आणि भावी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करुन संस्मरणीय कार्य करणार्‍या महनीय मान्यवरांच्या प्रतिमा तस्वीरींचे मा. अध्यक्ष,कार्यकारी समिती पदाधिकारी आणि सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.    

      डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसराची वीज गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प डॉ. हेमलता पुरंदरे आणि कुटुंबीय यांनी संपूर्ण खर्चाने उभारून दिला. या प्रकल्पाचे  डॉ. हेमलता पुरंदरे यांचे हस्ते शालार्पण करण्यात आले. त्याचबरोबर हायस्कूलच्या एस.एस.सी २००१ च्या बॅचने हायस्कूलची एक वर्गखोली डिजिटल केली त्याचे त्या बॅचच्या प्रमुख विध्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

      प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्षात  मंडळास देणग्या प्रदान करणार्‍या प्रमुख देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर ज्या काही मोजक्या स्पर्धा हायस्कूलमध्ये पार पडल्या त्यातील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

        प्रमुख पाहुणे मा.श्री. शरदराव उत्तम शेटे यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि हीरक महोत्सवाच्या प्रमुख सोहळ्यास अनुलक्षून ओघवत्या शैलीत उद्बोधक विचार मांडले. सन्माननीय पाहुणे मा. श्री. अशोक मनोहर देसाई, यांनी विध्यार्थ्यांस स्वानुभवाचे हलके फुलके दाखले देत, टाळ्यांच्या गजरात मौलिक मार्गदर्शन केले. मा. श्री. बाबुराव वामनराव राणे, यांनी मुटाट आणि बापर्डे यांचा ऋणानुबंध आणि शेजारधर्म यावर छान भाष्य करीत, हायस्कूलचा नयनरम्य परिसर, एकमेकांचे सहकार्य आणि सर्वसंबंधितांचा भक्कम आधार यामुळे संस्था उद्दिष्टांची निश्चित पूर्ती करेल अशी शुभेच्छा व्यक्त केली. या प्रसंगी सर्वांचा आग्रह लक्षात घेत डॉ.हेमलता पुरंदरे यांनी वंश अनुवंश या वैद्यकीय दृष्ट्‍या सामान्यांना गहन वाटणार्‍या परंतु महत्वाच्या विषयाची सर्वांना सुलभपणे ओळख करुन दिली. महिलांचे सबलीकरण आणि त्यांचा सर्व क्षेत्रातील वाढता सहभाग देशासाठी मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मीरा पिंपळस्कर यांनी सन १९५०-६० च्या दशकातील आठवणी सांगून कै. बाबासाहेब चिरपुटकर आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या उदात्त कार्याबद्दल उपयुक्त माहिती दिली. डॉ. प्रसाद भिडे हे नवीन पिढीचे प्रतिनिधी असूनही बालपणी त्यांनी मुटाटला दिलेल्या भेटींची रंजक माहिती विध्यार्थ्यांना दिली. संस्कृत अध्यापनाबाबत संस्था विचार करणार असेल तर सर्व सहकार्य करण्याचे त्यांनी सुचित केले. एक्याण्णव वर्षांच्या श्रीमती सविता फणसळकर (चिरपुटकर) यांनीही  विध्यार्थ्यांना लहानपणीच्या आठवणी सांगितल्या.

         वरीलप्रमाणे रंजक, रंगतदार परंतु लांबलेला कार्यक्रम आटोपता घेणे गरजेचे असल्याने हीरक महोत्सव समिती अध्यक्ष श्री.बळवंतराव राणे आणि अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर यांनी समयोचित संक्षिप्त विचार व्यक्त केले आणि कार्यक्रम आभार प्रदर्शनाने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चेतन पाळेकर आणि श्री. केशव परांजपे यांनी केले. वरील कार्यक्रमानंतर सर्व निमंत्रित पाहुणे, विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

      दुपारच्या सत्रात, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे, येथे भागशाळेसाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, सन्माननीय पाहुणे श्री अशोक देसाई, उपाध्यक्ष श्री. शिवाजी राणे, उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, मुख्य कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे, कोषाध्यक्ष श्री. संजय टाकळे,  सहकार्यवाह श्री रघुनाथ पाळेकर, सदस्य श्री. अरविंद ठाकूरदेसाई तसेच इतर मंडळ पदाधिकारी, मुटाट व मणचे स्थानिक समितीचे सदस्य, मणचे गावचे सरपंच, मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे सहाय्यक शिक्षिका सौ. मृणाल कोयंडे यांनी  गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. श्री बापूसाहेब गोखले यांना शाल, श्रीफळ, निर्धार स्मरणिका आणि स्मृतिचिन्ह  देऊन अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मा. श्री अरविंद ठाकूरदेसाई यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मणचे भागशाळेसाठी प्रमुख देणग्या देणार्‍यातील श्री. आदित्य अरविंद ठाकूरदेसाई, श्री. मोरेश्वर (बापूसाहेब) गोखले, श्रीम. स्नेहल मुकुंद ठाकूरदेसाई, सौ.श्रध्दा परेशानंद कुलकर्णी (लिमये) श्री. धोंडी रामचंद्र जोशी, श्री. सुनिल यशवंत इस्वलकर, श्री. हेमंत वसंत गोखले यांचेसह कै. भाऊसाहेब काळे भागशाळेतून सेवानिवृत्त झालेले श्री. दिलीप यशवंत लेले आणि सौ. श्रध्दा शंकर पराडकर यांचेसह अनेक देणगीदारांचा संस्था पदाधिकार्‍यांच्या हस्ते गुलाबपुष्प, स्मरणिका आणि स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          उपस्थित मणचे स्थानिक समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी आपले विचार व्यक्त केले. सन्माननीय पाहुणे श्री. अशोक देसाई यांना कै. भाऊसाहेब काळे भागशाळेचे विध्यार्थी आणि शिक्षकांनी बोलण्याची विनंती केली त्यास मान देत त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत भाषण केले. काही ग्रामस्थांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर यांनी सांगितले की, कै. भाऊसाहेब काळे भागशाळा ही मंडळाची विस्तार शाखा असून मंडळाच्या वाटचालीत भागशाळेला महत्व आहे. मणचेकर ग्रामस्थांनी हीरक महोत्सवाचे औचित्य साधून मणचे भागशाळेसाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विध्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मणचे येथे सुरु केल्यास मंडळ त्यास प्रोत्साहन देईल. कार्यक्रम समाप्तीनंतर भागशाळेत चालू असलेल्या विकास कामांची कार्यकारी समिती पदाधिकार्‍यांनी पाहाणी केली.

      रात्रीच्या सत्रात डॉ. श्रीधर रघुनाथ  लेले हायस्कूलच्या रंगमंचावर रात्रौ ठीक ९.३० वाजता “ मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” हा उत्तम  अभिरुची संपन्न एकपात्री  कार्यक्रम आपल्या  हायस्कूलचे माजी विध्यार्थी आणि नामवंत अभिनेते श्री. रमेश रामचंद्र भिडे यांनी  प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद घेत आणि टाळ्यांच्या गजरात सादर केला. श्री. रमेश भिडे यांनी त्यांच्या समवयस्क स्नेह्यांचा  हृद्य सत्कार केला. एकंदरीत कथनात्मक आणि अभिनयाची जुगलबंदी असलेला हा एकपात्री नाट्यप्रयोग शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत बहारदार रंगला.

सुवर्ण महोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस दुसरा मंगळवार दिनांक ३ मे २०२२:

      कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, हीरक महोत्सव समिती अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे, यांचेसह प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत माजी विध्यार्थी मा.अ‍ॅड. श्री. रुपेशजी राणे, मा. श्री. विलास कृष्णा साळुंके, संचालक- द.म्युनि.को.ऑप.बँक लि. मुंबई, मा. श्री. रविंद्र सहदेव पेडणेकर, राष्ट्रीय शरीर सौष्टव पटू , श्री. अशोक देसाई, श्री. अरुण मिराशी, श्री. प्रभाकर विनायक जोशी, श्री. शशिकांत घाटे, श्री. बाळकृष्ण पाळेकर, श्री. सुनिल गुरव, श्री. वसंत आपटे, श्री अंकुश मोंडे, संस्था पदाधिकारी सर्वश्री सुभाषचंद्र परांजपे, रघुनाथ पाळेकर, संजय टाकळे, जितेंद्र साळुंके,  डॉ. विनय केळकर, सौ. गीता सोवनी, सौ. अमृता परांजपे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मुख्याध्यापक श्री. दिलीप घरपणकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले.

        हीरक महोत्सवाचा दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम हा प्रामुख्याने कार्य-गौरव सोहळ्याचा होता. या कार्यक्रमात संस्था हितार्थ उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती, प्रमुख देणगीदार, प्रमुख जाहिरातदार आणि माजी विध्यार्थी यांचा गुणगौरव आणि सत्कार करण्यासाठी नियोजित होता. कार्यक्रमारंभी कनिष्ठ महाविद्यालय इमारतीच्या गच्चीवर नव्याने बांधलेल्या पाणी गळती प्रतिरोधक  शेडचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. हीरक महोत्सवाच्या मुहुर्तावर विद्या संकुल बागेत नारळाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याच बरोबर सन्माननीय पाहुणे श्री. अशोक देसाई यांचेकडून  देणगीरुपाने मिळालेल्या अनुक्रमे वाचनालय आणि मंडळ ऑफिसमधील कपाटांचे त्यांच्या शुभहस्ते शालार्पण करण्यात आले.

      यानंतर प्रमुख देणगीदार, जाहिरातदार आणि हितचिंतकांचा शाल, गुलाबपुष्प, स्मरणिका आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हीरक महोत्सवासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सर्वश्री बळवंतराव राणे, शिवाजी राणे, धनंजय परांजपे, सुभाषचंद्र परांजपे, संजय टाकळे, विवेक केळकर, विनय केळकर, जितेंद्र साळुंके, रघुनाथ पाळेकर, अरविंद ठाकूरदेसाई, सौ. गीता सोवनी व सौ. अमृता परांजपे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्वश्री किरण प्रभू,अच्युतराव राणे,राजेश राणे,  बाळकृष्ण पाळेकर, सुर्यकांत साळुंके, विठोबा प्रभू, श्रीकृष्ण सोवनी,चंद्रकांत घाडी, प्रमोद चव्हाण,चंद्रकांत पाळेकर यांचेसह मंडळाचे अनेक आजी-माजी सभासद, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,


   

हीरक महोत्सव समिती सदस्य, माजी विद्दयार्थी यांचा गुलाबपुष्प, स्मरणिका आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. दिलीप घरपणकर, सहाय्यक शिक्षक सर्वश्री चेतन पाळेकर, तन्मय कोठावळे, आणि कर्मचारी श्री. विजय ठाकूरदेसाई यांचा खास सत्कार करण्यात आला.  

        हीरक महोत्सवानिमित्त कर्तव्य तत्पर संस्थानियुक्त शिक्षणसेवक, अध्यापक आणि कर्मचारी कु. निशा विजय पाळेकर, कु. प्रणाली सुरेश रायकर, सौ. गीतांजली अशोक देसाई आणि सर्वश्री शैलेश कृष्णा पाडावे, अजित न्हानू कविटकर, चेतन रघुनाथ पाळेकर, ओंकार भास्कर लेले आणि केशव सुभाषचंद्र परांजपे यांना विशेष पारितोषिक देत गौरविण्यात आले.

        प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या मान्यवर नामवंत माजी विध्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेबद्दलच्या हृद्य आठवणी आणि यशप्राप्तीसाठी घेतलेले कष्ट वर्णन करुन विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

         अध्यक्षीय भाषणानंतर सकाळच्या सत्रातील या कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने सांगता झाली. कार्यक्रमानंतर निमंत्रित पाहुण्यांसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

        दुपारच्या सत्रात निमंत्रित खुला गट कबड्डी सामने व खो-खो प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले होते.        या क्रीडा सामन्यांनाही चांगला प्रतिसाद लाभल्याने सर्व सामने उत्कंठावर्धक होत उपस्थित मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी खेळाडूंचे कौतुक करीत कार्यक्रमात रंगत भरली. सायंकाळी उशीरापर्यंत रंगलेल्या या सामन्यांच्या विजेत्यांना चषक आणि पारितोषिके देण्यात आली.

       रात्रौ ठिक ९.३० डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कुल, कै. भाऊसाहेब काळे भागशाळा आणि यशवंतराव राणे विध्यामंदिर बापर्डे येथिल विध्यार्थी आणि शिक्षकांनी एकापेक्षा एक बहारदार, मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हजारों प्रेक्षकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात सादर केले. सहाय्यक शिक्षक श्री. उदय कदम यांनी सादर केलेला दशावतार नाट्यविष्कार सर्वांना आवडला. पाळेकरवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. त्रिंबककर यांनी दिग्दर्शन केलेले विध्यार्थ्यांचे कार्यक्रम उत्कंठावर्धक झाले. एकंदरीत शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या मनोरंजन कार्यक्रमांमुळे हीरक महोत्सवाची शोभा वाढली.  

सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस तीसरा : शुक्रवार दिनांक ४ मे २०२२:

      कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ९.३० वाजता सत्यनारायण महापूजेने झाली. महापूजेचे यजमानपद सौ. गीता आणि श्री. श्रीकृष्ण सोवनी यांनी स्वीकारले होते. पूजाविधी आणि महाआरती झाल्यावर ठीक ११.०० वाजता फुड फेस्टीवलचे उद्घाटन अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर यांनी केले. पंचक्रोशीतील सुमारे १२ गृहिणींनी विविध स्वादिष्ट पाककृती सादर केल्या होत्या. फूड फेस्टीवलमधील पाककृतींचा उपस्थित मान्यवर, विध्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

  

सत्यनारायण महापूजेनंतर सुमधुर भजनांचा कार्यक्रम पार पडला. दुपारी निमंत्रित पाहुणे मंडळी, हीरक महोत्सव कार्यकर्ते आणि संस्था पदाधिकारी यांचा सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

      दुपारच्या सत्रात ठीक ३.३० वाजता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुमारे पन्नास माजी विध्यार्थ्यांनी सदर मेळाव्यात सहभागी होत मंडळ संचालन, विध्यार्थ्यांचे हायस्कूल आणि संस्थेविषयींचे विधायक विचार मांडले. भावी काळात अधिकाधिक माजी विध्यार्थ्यांना  संस्थेशी जोडून संस्थेच्या विकासात योगदान देण्याचे एकमताने सर्वांनी प्रतिपादन केले. तसेच माजी विध्यार्थी संघाचे स्वतंत्र अस्तित्व राखून त्याद्वारे सर्वांना संपर्क व्यासपीठ मिळवून देण्याचा निश्चय सर्वांनी केला.

     सायंकाळी ठीक ४.३० वाजता हीरक महोत्सव समितीची आढावा बैठक सुरु झाली. सन २०२१-२२ या हीरक महोत्सवी वर्षात समितीने पार पाडलेल्या महत्वपूर्ण कार्याचा तपशील सचिव श्री रमेश कविटकर यांनी सभेपुढे ठेवला. हीरक महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी एकदिलाने या सोहळ्याचे काम पार पाडून संस्था आणि डॉ. श्री.र.लेले हायस्कूलच्या  लौकिकात भर टाकली आहे अशा शब्दात मंडळ अध्यक्ष श्री पाळेकर यांनी सर्वांचे कौतुक केले.  हीरक महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांमुळे हीरक महोत्सवाचे संस्मरणीय सादरीकरण आणि समारोप करता आला यासाठी अभिनंदन करीत सर्वांचे हार्दिक आभार मानले.

        वरीलप्रमाणे हीरक महोत्सव समिती आढावा बैठकीचे महत्वाचे कामकाज आटोपल्यानंतर मंडळ कार्यालयात सायंकाळी ठीक ५.३० वाजता कार्यकारी समितीची सभा पार पडली.

      सन्माननीय सभासद, हितचिंतक, माजी विध्यार्थी, देणगीदार, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी आणि विध्यार्थ्यांच्या   वर्षभरातील सहकार्याने आणि अनंत व्यक्तींच्या सहभागाने हीरक महोत्सव फुलत गेला. अशा या हीरक महोत्सवी महासोहळ्याचा नेत्रदिपक सांगता सोहळा हजारोंच्या उपस्थितीत रात्रौ ठीक ९.३० वाजल्यापासून क्षणोक्षणी उत्कंठावर्धक होत गेलेल्या “ जल्लोष हीरक महोत्सवाचा, सोहळा कला गुणांचा ” या सादरकर्ते शिवप्रेमी पाळेकरवाडी या कलाकार वृंदाने जल्लोषात सादर केलेल्या विविध, कलात्मक आणि मनोरंजन कार्यक्रमाने समारोप झाला. वर्षभरातील सर्व कार्यक्रम आनंदात आणि वेळापत्रकाप्रमाणे  पार पडल्याने हीरक महोत्सवाची सांगता संस्मरणीय झाली.        

              हीरक महोत्सव – सन २०२१-२२: आयोजन – नियोजन आणि सादरीकरणाचे लक्षवेधी कार्य: हीरक  महोत्सवाचे देखणे आयोजन, सुनियोजित आखणी आणि आकर्षक सादरीकरणाचे लक्षवेधी कार्य हीरक महोत्सव समिती अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी, उत्त्तमरित्या पार पाडले. हीरक महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर नेमलेल्या व्याख्यान आयोजन समिती, प्रसिध्दी विभाग समिती, क्रीडा समिती, स्मरणिका समिती, अल्पोपहार-भोजन समिती, स्पर्धा आयोजन समिती, परिसर सुशोभिकरण समिती, आतिथ्य समिती, कार्यक्रम नियोजन समिती, रंगरंगोटी समिती, निमंत्रण समिती, स्वयंसेवक समिती आणि सत्कार समिती या सर्व समित्यांनी मुख्याध्यापक श्री दिलीप तुकाराम घरपणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य पार पाडले. सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी जबाबदारीने आणि समरसून काम केल्याने हीरक महोत्सव सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला. खास करुन सहाय्यक शिक्षक श्री. पाडावे सरांच्या मार्गदर्शनाखाली हीरक महोत्सवाच्या दोनही दिवशी प्रशालेच्या विध्यार्थीनींनी स्वागत गीत आणि सरस्वती वंदना उत्कृष्टपणे सादर केले.

        कार्यकारी समिती, हीरक महोत्सव सांगता सोहळा नेत्रदिपक होण्यासाठी वर्षभर सहभागी होत हातभार लावणार्‍या  संस्थेतील आणि संस्थेबाहेरील सर्व मान्यवरांचे, कंत्राटदारांचे, विविध सेवा पुरवठादारांचे, सभामंडप, डेकोरेशन, महापूजा व्यवस्थापन, भोजन, अल्पोपहारादी सर्व  व्यवस्थापन चोख पाडणार्‍या सर्वांचे आदरपूर्वक आभार मानत आहे.  या सोहळ्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे  मुख्य कार्यवाह श्री. सुभाषचंद्र परांजपे, उपाध्यक्ष श्री. शिवाजी राणे, उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, कोषाध्यक्ष श्री. संजय टाकळे, सहकार्यवाह श्री. रघुनाथ पाळेकर, सहकोषाध्यक्ष डॉ. विनय केळकर, सदस्या सौ. गीता सोवनी सदस्या सौ. अमृता परांजपे आणि सदस्य श्री. अरविंद ठाकूरदेसाई यांच्या हीरक महोत्सव सहभाग कार्याची प्रशंसा करावी ती थोडीच आहे. या ज्ञापनाद्वारे हीरक महोत्सव महासोहळा संस्मरणीय करण्यासाठी सर्व कार्यक्रमांना उपस्थिती नोंदवून तो यशस्वी करण्यात हातभार लावलेले सर्व सन्माननीय पाहुणे, सन्माननीय देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक, माजी विध्यार्थ्यीं, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि सर्व स्नेहीजनांचे कार्यकारी समिती मन:पूर्वक आभार मानत आहे. याचबरोबर पुढील वाटचालीत अखंड उपक्रमशीलतेचा वारसा असाच कायम राखू असे ठामपणे सांगत हीरक महोत्सवी समारोपाचे वार्तांकन पूर्ण करतो.   

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकरिता

श्री. सुभाषचंद्र परांजपे            श्री. विश्वासराव पाळेकर

मुख्य कार्यवाह                           अध्यक्ष

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *