माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करण्याची गरज
आजच्या विकसनशील कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातले मुटाट हे एक आडवळणी खेडेगांव. कोकण रेल्वेवरील वैभववाडी स्थानकाच्या आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गाच्या तरेळे स्थानकाच्या पश्चिमेला विजयदूर्गला जाणा-या मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विसावलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे गांव. माथ्यावर जांभळ्या दगडाचा ऐसपैस सडा आणि पायथ्याशी विजयदूर्ग खाडीचा रम्य परिसर. असे निसर्गसमृद्धीचे लेणे लेवून हाकेहाकेच्या अंतरावर वसलेल्या वाड्यांमधून वास्तव्य करीत असलेली सुमारे ४००० ची लोकवस्ती. लोक व्यवसायाने शेतकरी व शेतमजूर. दुकानदार,व्यापारी वा इतर व्यवसायिक त्या मानाने विरळच. अशा या खास कोकणी खेड्यात छपन्न वर्षांपूर्वी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामिण विद्दयार्थ्याना उपलब्ध करुन देणा-या आमच्या पूर्वसुरींच्या कार्याची व आजवरच्या वाटचालीची अल्पशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.
संस्थापक मंडळ - १९६२
मुटाट गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काचतज्ञ व कोकणातल्या कांही शिक्षण संस्थांशी निगडीत असलेले डॉ. श्रीधर रघुनाथ लेले,M.Sc.Ph.D. यांना भेटून आपला विचार या मंडळीनी त्यांच्या कानावर घातला. गांवातच माध्यमिक शाळा सुरु करण्याची कल्पना, शाळेची गरज कशी व किती आहे हे स्वानुभवावरुन पटल्यामुळे डॉक्टरांना एकदम मान्य झाली व ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन देण्यांचे त्यांनी तात्काळ मान्य केले.
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पाठिंबा मिळणार म्हटल्यावर संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यावर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुटाट या संस्थेची स्थापना होऊन तिची आवश्यक असलेल्या सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली. या कामी ज्या प्रमुख व्यक्तींनी विषेश खटपट केली त्या व्यक्ती अशा:- डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, सर्वश्री विष्णु सखाराम मराठे ,सावळाराम जनार्दन परांजपे, भिकाजी धोंडो चिरपुटकर, भिकाजी विश्राम घाडी,गोपाळ लक्ष्मण पाळेकर,भालचंद्र चिंतामण लेले, शिवराम वामन लेले, केशव राजबा राणे,श्रीपाद रामकृष्ण लेले,धोंडो नारायण परब,जगन्नाथ दामोदर लेले, गुंडो सखाराम कांबळे,भिकाजी गणेश सोवनी,रामचंद्र गोविंद पुजारी आणि अनंत ध्यानबा पाळेकर.