Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

आमची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

विकसनशील कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातले मुटाट हे एक आडवळणी खेडेगांव. कोकण रेल्वेवरील वैभववाडी स्थानकाच्या आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गाच्या तरेळे स्थानकाच्या पश्चिमेला विजयदूर्गला जाणा-या मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विसावलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे गांव. माथ्यावर जांभळ्या दगडाचा ऐसपैस सडा आणि पायथ्याशी विजयदूर्ग खाडीचा रम्य परिसर. भातशेतीच्या वाफ्यांच्या अवतीभवती डोंगरद-यांतून जोपासलेल्या हापुस आंब्याच्या बागा, रायवळ आंब्यांच्या राया, हिरवीगार वनराई, खाडीकिनारी आणि वाड्यावाड्यांमधून डोकावणारी माडाची बने. आंबा, फणस, काजू, रातांबे, चिक्कू सारख्या कोकणी मेव्याची हंगामानुसार रेलचेल. असे निसर्गसमृद्धीचे लेणे लेवून हाकेहाकेच्या अंतरावर वसलेल्या मोवळवाडी, गयाळवाडी, ब्राह्मणवाडी, प्रभुवाडी, बौध्दवाडी, घाडीवाडी, राणेवाडी, वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या १० वाड्यांमधून वास्तव्य करीत असलेली सुमारे ४००० ची लोकवस्ती. लोक व्यवसायाने शेतकरी व शेतमजूर. दुकानदार,व्यापारी वा इतर व्यवसायिक त्या मानाने विरळच. आंबा व्यापार करणा-यांची हल्ली त्यांत गणना होऊ लागली आहे. अशा या खास कोकणी खेड्यात छपन्न वर्षांपूर्वी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामिण विद्दयार्थ्याना उपलब्ध करुन देणा-या आमच्या पूर्वसुरींच्या कार्याची व आमच्या आजवरच्या वाटचालीची सुवर्ण महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने अल्पशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.

एका विषेश माहितीची सुरुवातीलाच सर्वांनी नोंद घेणे औचित्यपूर्ण ठरेल. ती म्हणजे सुमारे १२ वर्षांपूर्वी (१९९९-०० सालात) मुटाटचे विभाजन होऊन वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या वाड्यांचा मिळून पाळेकरवाडी (लोकवस्ती सुमारे १४००) या गावाची शासकीय निर्मिती झाली.त्यामुळे मुटाट गावाचे आता दोन गांव झाले आहेत.आमच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आता मुटाट पंचक्रोशीत मुटाट,पाळेकरवाडी,मणचे,वाघोटण आणि सडेवाघोटण या गावांचा समावेश होतो.

मुटाटच्या विभाजनपूर्व आणि विभाजनोत्तर भौगोलिक पार्श्वभूमीशी निगडीत विस्मृतीत जाणा-या आठवणीनां थोडासा उजाळा देऊया. गावातील वाड्यांच्या छोट्या भागाला अजूनही अवाट म्हणायची पध्दत आहे. मुटाटातील भेंडी आणि भटवाडी ही नावेही लोकांच्या स्मरणात आहेत. आजच्या पिढीतील काहींना कदाचित माहिती नसेल की काही भौगिलिक ठिकाणांना विशिष्ट रुढ नांवे आहेत. तळेरे विजयदूर्ग मार्गावर पाळेकरवाडी तिठ्यावर असलेल्या छोट्या टेकडीवजा उंचवट्यावर एक पुरातन दगडांचा छोटा बुरुज (देवरणे) आहे. त्याचे उभा धोंडा हे नांव केवळ आजुबाजूच्या परिसरातच नाही तर चक्क एस टी चा थांबा म्हणून दप्तरी नोंद आहे. तसेच लिखी हे मुटाट फाट्याचे नांव सर्वश्रृत आहे. स्थानेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वाहणा-या बारमाही पाणी असलेल्या वहाळाच्या उतारावरील पाण्याच्या कोंडीना रंकाळ्याच्या कोंडी हे नाव प्रचलित असल्याचे सर्वाना आठवत असेल. हायस्कूलशेजारच्या कुपलाच्या टेकडीचे नाव कदाचित काही वर्षांनंतर गावक-यांच्या लक्षातही राहणार नाही. लोकहो! आधुनिकीकरणामुळे पूर्वीच्या खेड्यांचा अमूलाग्र बदल होताना दिसत आहे. यासाठी वर वर्णन केलेल्या तसेच अन्य ग्रामवैशिष्ट्यांची आठवण जतन करणे महत्वाचे आहे. या विषयांतरानंतर आता पुढील वाटचालीकडे वळुया.

सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने सुमारे ५० वर्षांपूर्वी (सन १९६०-६१ पूर्वी) मुटाट गांव मागासच होता.शासनाच्या कृपाप्रसादे त्यावेळी गांवात इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण देणा-या दोन प्राथमिक शाळा होत्या.इंग्रजी शिक्षणाची सोय खुद्द गावातच नव्हे तर पंचक्रोशीतही नव्हती.त्यासाठी मुटाटच्या विध्यार्थ्याला लांबच्या शहरात अथवा तालुक्याच्या गांवी जावे लागत असे.पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्थलांतर करणे ज्यांना जड जात होते अशांना शिक्षण नाईलाजास्तव सोडून द्यावे लागत असे.त्यातच बहुतांशी पालक अशिक्षित गरीब शेतकरी वर्गातील असल्याने पाल्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ अभावानेच आढळायची. अशी स्थिती असतानाही स्वातंत्रपूर्व काळांत श्री रघुनाथ अनंत तथा बळवंतराव लेले (डॉ श्रीधर रघुनाथ लेले यांचे वडील) यांनी जवळ जवळ ४० वर्षे इंग्रजी १ ते ३ इयत्तांचे वर्ग आपल्या घरी भरविले. सर्व विषय ते स्वत:च शिकवीत. सन १९३९ मध्ये ते निवर्तले. स्थानिक व गांवाबाहेरील काही मोजक्या इच्छुक विध्यार्थ्यानी याचा लाभ घेतला. श्री बळवंतरावांच्या निधनानंतर इंग्रजी शिक्षणाची ही सोय बंद झाली. त्यानंतर शिक्षणाबद्दलच्या तळमळीमुळे आणि दूर्लभ इंग्रजी शिक्षण आपल्या गावातील इच्छुक ज्ञानार्थी विद्दयाथ्यांना मिळावे म्हणुन डॉ.मोरेश्वर जनार्दन बोडस हेही आपल्या घरी इंग्रजीचे वर्ग काही काळ चालवित होते.परंतु व्यवसायातील व्यापामुळे त्यांना ते नाइलाजाने बंद करावे लागले.

कालांतराने शिक्षणाचे वाढते महत्व व उपयुक्तता यांची जाणीव झाल्याने मुटाटच्या विध्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर करावी व त्यांना गावाबाहेर न जावे लागता ही सुविधा गावातच उपलब्ध व्हावी या विचाराने १९६०-६१ च्या दरम्याने काही खटपटी मंडळी एकत्र आली. सर्वश्री भिकाजी धोंडो चिरपुटकर, भालचंद्र चिंतामण लेले, विष्णु सखाराम मराठे,भिकाजी विश्राम घाडी,धोंडो नारायण परब,केशव राजबा राणे,डॉ मोरेश्वर जनार्दन बोडस इत्यादींचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.एका नवीन उत्साहाने ही मंडळी भारावली होती.काहीतरी भरीव कामगिरी करावी अशी जबर इच्छा मनी बाळगून होती. एकमेकांच्या कल्पना जाणून घेऊन परिस्थितीनुरुप विचार विनिमय करून मुटाट गांवातच माध्यमिक शाळा सुरु करावी असा निर्णय या प्रागतिक विचारवंतानी केला.

विचार पक्का झाल्यावर तो प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. मुटाट गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काचतज्ञ व कोकणातल्या कांही शिक्षण संस्थांशी निगडीत असलेले डॉ. श्रीधर रघुनाथ लेले,M.Sc.Ph.D. यांना भेटून आपला विचार या मंडळीनी त्यांच्या कानावर घातला. गांवातच माध्यमिक शाळा सुरु करण्याची कल्पना, शाळेची गरज कशी व किती आहे हे स्वानुभवावरुन पटल्यामुळे डॉक्टरांना एकदम मान्य झाली व ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन देण्यांचे त्यांनी तात्काळ मान्य केले.

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पाठिंबा मिळणार म्हटल्यावर संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यावर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुटाट या संस्थेची स्थापना होऊन तिची आवश्यक असलेल्या सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली. या कामी ज्या प्रमुख व्यक्तींनी विषेश खटपट केली त्यांचा नामोल्लेख करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो.त्या व्यक्ती अशा:- डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, सर्वश्री विष्णु सखाराम मराठे ,सावळाराम जनार्दन परांजपे, भिकाजी धोंडो चिरपुटकर, भिकाजी विश्राम घाडी,गोपाळ लक्ष्मण पाळेकर,भालचंद्र चिंतामण लेले, शिवराम वामन लेले, केशव राजबा राणे,श्रीपाद रामकृष्ण लेले,धोंडो नारायण परब,जगन्नाथ दामोदर लेले, गुंडो सखाराम कांबळे,भिकाजी गणेश सोवनी,रामचंद्र गोविंद पुजारी आणि अनंत ध्यानबा पाळेकर.

अशा रीतीने मंडळाची स्थापना झाल्यावर त्याच वर्षी म्हणजे तारीख ११ जून १९६२ पासून मंडळाच्या मुटाट विद्यामंदिर मुटाट या शाळेत इयत्ता ८वी चा एक वर्ग सुरु करण्यात आला. शुभारंभाच्या या इयत्ता ८वी च्या वर्गात पटावर एकूण २९ विद्यार्थी-विद्यार्थीनी होते. त्या नंतर पुढील प्रत्येक वर्षी एक इयत्ता अशा क्रमाने, जून १९६५ मध्ये इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु झाला. मार्च १९६६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेला आमच्या विद्या मंदिराची पहिली तुकडी बसली. शालांत परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.आमची शाळा पूर्णांशाने माध्यमिक शाळा झाली.एक लक्ष पुरे झाले.

प्रारंभी म्हणजे जून १९६२ पासून एका तात्पुरत्या तयार केलेल्या कच्च्या जागेमध्ये वर्ग भरत होते. प्राथमिक शाळेची जागासुध्दा वर्गासाठी वापरण्यात आली. परंतु अशी कामचलाऊ व्यवस्था योग्य नाही. चिरकालीन व्यवस्था असणे इष्ट आहे,असा विचार करुन मंडळाने गावांत शाळेसाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला.

शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीसाठी प्रशस्त व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेची शोधाशोध सुरु झाली. शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसण्या-या घाडी आणि साळुंके या शेतकरी कुळांनी व श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू या मालकांनी स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली. घाडी आणि साळुंके शेतकरी बांधवांचा तसेच जमीनचे मालक श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू यांचा त्याग मंडळासाठी अनमोल आहे.

इमारत बांधण्याच्या दृष्टीने १९६३ च्या डिसेंबर महिन्यांत इमारत बांधकाम शास्त्र विषयक तज्ञांनी जागेची पाहणी केली.आराखडे तयार करुन दिले. हे तज्ञ मुंबईहून मुटाटला आले होते. कंत्राटदार त्यावेळी गावात उपलब्ध नव्हता, म्हणुन मुंबईच्या एका प्रख्यात कंत्राटदारावर बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली.बांधकाम साहित्य, मजूर, यंत्रसामुग्री वगैरे मुंबईहून रवाना झाली.ग्रामस्थांच्या सहकार्याने व श्रमदानाने आणि शहरी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बांधकामाला सुरुवात झाली व शीघ्र गतीने साधारणत: १९६५ च्या मध्यास २०३ फुट लांब व २८ फुट रुंद या आकाराची सुंदर,टुमदार,पाहताक्षणी जिची भव्यता नजरेत भरुन येईल अशी एक चिरेबंदी इमारत भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ येथे दिमाखाने उभी राहिली.सरस्वतीच्या उपासनेचे मंगल मंदिर तयार झाले.तारीख १९ जुलै १९६५ पासून या ज्ञानमंदिरात मुटाट विद्दया मंदिराचे वर्ग भरु लागले.एक ऐतिहासिक घटना असा या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल.

या इमारतीत चार मोठ्या आकाराच्या वर्गखोल्यांच्या बरोबर चित्रकलायतन, विज्ञानालय, मुख्याध्यापकांचे कार्यालय, शिक्षकांची खोली समाविष्ट आहेत.एक संकल्प साध्य झाला. सुमारे लाख भराचा खर्च या इमारतीसाठी त्यावेळी आला. इमारत बांधकामासाठी निधी संकलानाच्या दोन मोहिमा मंडळाने काढल्या.तारीख १४ एप्रिल १९६४ ला चौपाटी जवळील भारतीय विद्याभवनमध्ये संगीत संशयकल्लोळ या संकृत नाटकाचा बहारदार प्रयोग गिरगांवच्या ब्राह्मण सभेने केला. या वेळी एक स्मरणिका प्रकाशित केली.नाटकाची तिकिट विक्री व जाहिरातीमधून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.४४,०००/- ची रक्कम मिळाली.त्यानंतर पुन्हा एकदा तारीख १७ एप्रिल १९६६ ला स्मरणिका प्रकाशन व संगीतभूषण श्री. राम मराठे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम दादरच्या बालमोहन विद्दा मंदिराच्या हॉलमध्ये विनाशुल्क करण्यात आला. जाहिरातदार, देणगीदार व संगीतप्रेमी मंडळी या समारंभाला बहुसंख्येने आली होती.स्मरणिकेच्या या उपक्रमातून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.२७,०००/- मिळाले. या शिवाय काही लहानमोठ्या देणग्या आल्या. वरील दोन्ही मोहिमांमुळे मंडळाला मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून इमारतीचा खर्च पूरेपूर चुकता झाला.

वाचकांच्या माहितीसाठी एका गोष्टीची येथे आवर्जुन नोंद घेतो. वर सांगितल्याप्रमाणे जो काही लाखभराचा निधी मंडळाने गोळा केला तो गोळा करण्यात डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांनी आपल्या व्यवसायातील मंडळींकडून जाहिराती आणल्या. देणग्या मिळविल्या, विदेशवासिंयांकडूनही काही सहाय्य मिळविले. आमच्या पाठीशी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले नसते तर एवढा मोठा निधी त्यावेळी इतक्या अल्प काळात जमा होऊ शकला नसता. ही अतिशयोक्ती नसून वस्तूस्थिती आहे. डॉक्टरांनी मुटाटकरांवर अतिशय उपकार केले आहेत.अनेकांना आपल्या कारखान्यात त्यांनी नोकरी दिली. या उपकारांची प्रत्येक मुटाटकराला जाणीव आहे.

इमारत निधीसाठी श्री.विनायक भिकाजी देसाई व श्री.माणेकलाल प्राणजीवनदास मेहता यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच श्रीमती रमाबाई बोडस यांनी पांच हजार रुपये एक रकमी दिले.या त्यांच्या भरीव सहाय्याबद्दल त्यांनी सुचविल्याप्रमाणे शाळेच्या वर्ग खोल्यांना नांवे देण्यात आली व तशा संगमरवरी दगडाच्या पाट्या त्या त्या खोल्यांच्या प्रवेशव्दारापाशी बसविण्यांत आल्या. पाट्यावरील मजकूर पुढील प्रमाणे:
श्री.उमाकांत श्रीरंग देसाई विज्ञानालय
श्री.माणेकलाल प्राणजीवनदास मेहता चित्रकलायतन
श्री.गजानन जनार्दन आणि श्रीमती रमाबाई बोडस वर्गखोली

वरील पाट्यांचा जाहीर अनावरण समारंभ दिनांक १ मार्च १९६९ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री माननीय श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांच्या शुभ हस्ते झाला.समारंभाला पंचक्रोशीतून हजार दीड हजार मंडळी जमली होती.दीर्घ काळ स्मरणात राहील असा हा समारंभ होता.

या नंतर लवकरच एक वज्राघाततुल्य प्रसंग ओढवला. मंडळाचे प्रमुख संस्थापक व अध्यक्ष डॉ.श्रीधर रघुनाथ लेले याना ता.२०एप्रिल १९६९ रोजी आकस्मिकरित्या देवाज्ञा झाली.मुटाटचा प्रकाश हरपला असेच सर्वाना वाटले.कार्यकर्ते मनाने थोडेसे खचले.आता संस्थेचे काय होणार अशी भीती काहीना वाटू लागली.अशा वेळी श्री भिकाजी धोंडो उर्फ बाबासाहेब चिरपुटकर पुढे आले.त्यांनी सर्वाना धीर व दिलासा दिला. डॉक्टरांचे परमस्नेही नामदार श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:हून स्विकारली व कार्यकर्त्यांना उत्तेजन दिले.

कै. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक १९ एप्रिल १९७० रोजी आर्यन शाळेच्या सभागृहात त्यांना जाहीर आदरांजली वाहण्यात आली. डॉक्टरांच्या जीवनांतील विविध पैलुंचे दर्शन घडविणारा स्मृतिपूजा विशेषांक त्यावेळचे मुख्याध्यापक श्री.वामन गणेश नवरे यांनी परिश्रमपूर्वक तयार केला होता. त्या अंकाचे प्रकाशन सौ.ताराबई पुरुषोत्तम खेर यांच्या हस्ते झाले.

डॉ.श्रीधर रघुनाथ लेले ही व्यक्ती म्हणजे मंडळाचा आर्थिक झरा होता.शाळेसाठी द्रव्याची त्यांनी कधी कमतरता भासू दिली नाही.हा झरा बुजल्यावर मंडळापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.शाळेचा संसार खर्च कसा निभावयाचा याची थोडी चिंता लागली होती.पण याच सुमारास सरकारी अनुदान धोरणांत क्रांतीकारी बदल झाला.मान्यताप्राप्त शिक्षकांच्या पगारासह सर्व रास्त खर्चाचा ९९ टक्के भार सरकारने आपल्या शिरावर घेतला.ग्रामिण भागातील शाळा चालकांची एक मोठी चिंता दूर झाली.या सरकारी धोरणाचे त्यावेळी आम्ही जाहीर स्वागत केले होते.

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांनी मुटाटकरांवर अनंत उपकार केले .त्यांनी गांवामध्ये नवचैतन्य निर्माण केले.तन-मन-धन अर्पण करुन गावात माध्यमिक शाळा सुरु केली.त्यांना मुटाटचा सूर्य व जनक मानतात.त्यांच्या सामाजिक ऋणातून थोडेफार तरी मुक्त व्हावे व त्यांची प्रेरक शक्ति सदोदित स्फुरण देत राहावी म्हणून मुटाट विद्यामंदिराला डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल असे नांव देण्याचा ठराव मंडळाच्या तारीख २७ मे १९७३ रोजी भरलेल्या जादा सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजूर केला.नामांतराचा जाहीर समारंभ तारीख १ मार्च १९७५ रोजी झाला.त्यावेळचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री.भाईसाहेब सावंत (माजी आरोग्य मंत्रि महाराष्ट्र राज्य) समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.अध्यक्षस्थानी मुटाटचे थोर विव्दान डॉ.वामन केशव लेले M.A.Ph.D. हे होते. समारंभ बहारदार झाला.

मंडळाची कार्यकारी समिती प्रारंभी मुटाट येथे होती.कालांतराने त्यातील बरीच मंडळी मुंबईला आली व संस्थेचा कार्यालयीन कारभार मुंबईहून होऊ लागला.रजिर्स्टर्ड ऑफिस मुटाटहून मुंबईला हलविण्यात आले. त्यामुळे बृहन्मुंबई विभागाच्या धर्मादाय आयुक्तांच्या कचेरीत मूळची नोंदणी वर्ग करण्यात आली.नवा क्रमांक F-2046(Bombay) असा आहे.

डॉ. लेले यांच्या निधनानंतर मंडळाच्या प्राप्तीचा उगम आटत चालला असताना एक भली मोठी रक्कम मंडळाला देणगी रुपाने मिळाली.त्याची हकीकत अशी:
श्री.गणेश अनंत लेले (डॉक्टरांचे चुलते) हे बडोदे संस्थानामध्ये मोठ्या अधिकारावर नोकरीला होते. दिनांक २७-२-१९४५ ला केलेल्या व्यवस्थापत्राने त्यांनी आपल्या मिळकतीची वाटणी केली.त्यानंतर दोन वर्षानी ते निर्वतले.साधारण १९७१ पर्यंत त्या मिळकतीची कोणी रीतसर व्यवस्था केली नाही.काही संबंधितांनी ही गोष्ट मंडळाच्या पदाधिका-यांजवळ स्पष्ट केली. खर्च व खटपट मंडळाने केल्यास या व्यवस्थापत्रातून मिळणारी रक्कम संस्थेला देणगी म्हणून द्दयावयाची तयारी त्यावेळच्या त्यांच्या वारसानी दर्शविली.तारीख ८ सप्टेंबर १९७२ ला मुंबईच्या हायकोर्टात मिळकतीचे व्यवस्थापक पत्र मिळविण्यासाठी वारसानी अर्ज केला. व्यवस्थापक पत्र मिळाल्यानंतर मिळकतीची रक्कम गोळा करण्यात आली.सर्व प्रकारचा खर्च वजा करुन वारसांच्या अतुलनीय त्यागामुळे मंडळाला एक रकमी रुपये ४१,४९६/- मिळाले.श्रीमती गीता श्रीधर लेले,श्री.अनंत श्रीधर लेले, डॉ.हेमलता माधव पुरंदरे,श्री.भालचंद्र रामचंद्र लेले श्री.देवदत्त पुरुषोत्तम लेले व श्री.माधव पुरुषोत्तम लेले या वारसांचे मंडळ अनंत आभारी आहे.

वारसांचे औदार्य हे जसे उपरोल्लेखित देणगीस कारणीभूत झाले तसेच श्री.भि.धो.उर्फ बाबासाहेब चिरपुटकर यांनी या कामी घेतलेले अविश्रांत परिश्रम हेही तितकेच महत्वाचे आहेत.थोडक्यात सांगावयाचे झाल्यास श्री.बाबासाहेबांनी ही कामगिरी स्विकारली नसती तर इतकी मोठी रक्कम त्यावेळी मंडळाच्या पदरात पडली नसती.वयाची सत्तरी आलेली,दृष्टी कमजोर झालेली अशा स्थितीतही वार्धक्यातील अडचणींची तमा न बाळगता त्यांनी स्विकारलेली कामगिरी पूर्णपणे तडीस नेली.तरुण व अननुभवी कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचा पितृतुल्य आधार होता.सम्यक मार्गदर्शन होते. डॉ.लेले यांनी स्थापलेल्या मंडळाचे बाबासाहेबांनी संगोपन व संवर्धन केले. श्री मनोहर गोविंद लेले यांच्यासारखे नि:स्वार्थी आणि निरलसपणे कार्य करणारे कार्यकर्ते तयार केले. त्यांनी दाखविलेल्या आखीव रेखीव मार्गावरुन कार्यकर्त्यांनी चालायला नुकतीच सुरुवात केली असताना तारीख ८ नोव्हेंबर १९७५रोजी चिरनिद्रा घेण्यासाठी बाबासाहेब आम्हांस सोडून गेले.मंडळावर झालेला हा दुसरा वज्राघात.आले देवाजींच्या मना तेथे कोणाचे चालेना! कोणालाच कालगती रोखता येत नाही,की नियतीचा खेळ समजत नाही.

बाबासाहेब चिरपुटकरांच्या निधनानंतरच्या कठिण परिस्थितीत कार्यकारी समितीचे जेष्ठ सभासद श्री मनोहर गोविंद लेले, श्री कृष्णाजी विठ्ठल लेले, श्री विष्णु सखाराम मराठे आणि श्री जगन्नाथ मोदर लेले यांनी मंडळाच्या कार्याची धुरा सांभाळली. विशेषकरुन श्री मनोहर गोविंद लेले यांनी परिश्रमपूर्वक निवडक कार्यकर्त्यांची जे पाठबळ मंडळाच्यापाठीशी उभे केले होते ती मंडळी कामाला लागली. जेष्ठांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला आणि सर्वजण झपाटून कामाला लागले.

श्री.बाबासाहेब चिरपुटकर यांनी मंडळाची अविरत व आमरण सेवा केली.ती अनमोल आहे.त्यांची सेवा सतत डोळ्यासमोर रहावी व स्मृती प्रेरणादायी व्हावी म्हणून हायस्कूलमधील एका वर्ग खोलीला त्यांचे नाव देण्याचा निर्णय तारीख ३१-१२-१९७८ ला भरलेल्या वार्षिक साधारण सभेने घेतला.

तारीख ११-२-१९८० ला मुटाटला आणखी एक समारंभ झाला.आगावू ठरल्याप्रमाणे तीन वर्ग खोल्यांवर नावांच्या संगमरवरी पाट्या बसविल्या होत्या त्यांचे अनावरण बेळगांवचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्धोगपती श्री. बाळकृष्ण महादेव गोगटे तथा रावसाहेब गोगटे यांच्या हस्ते या दिवशी झाले.सुप्रसिध्द कादंबरी लेखिका व रत्नागिरीच्या त्यावेळच्या आमदार सौ.कुसुमताई अभ्यंकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पाट्यांवरील मजकूर येणे प्रमाणे.
श्री.पुरुषोत्तम रामचंद्र लेले आणि श्रीमती सुंदराबाई पुरुषोत्तम लेले वर्ग खोली
श्री.भालचंद्र रामचंद्र लेले वर्ग खोली
श्री.भिं.धो.चिरपुटकर वर्ग खोली 

मंडळाच्या आणि हायस्कूलच्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमांचा परामर्श घेऊन प्रगतीच्या अनेक टप्प्यांसह मंडळाची आणि हायस्कूलची सन १९८० पर्यंतची वाटचाट वर सादर केली आहे. यानंतरच्या वाटचालीतील प्रमुख घटनांचा संक्षिप्त आढावा घेताना एक महत्वाचे निरीक्षण इथे नमूद करावेसे वाटते ते असे की, आर्थिकदृष्ट्या यथातथा स्तरातील असूनही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी डगमगून न जाता पूर्वसूरींच्या पुण्याईने मंडळाचा कारभार नेटका करुन संस्थेची भरभराट केली.

आरंभापासून म्हणजे सन १९६२-६३ या शालेय वर्षापासून ते सन २०११-१२ या शालेय वर्षापर्यंतची वर्षवार विद्दयार्थ्यांची संख्या,तुकड्यांची संख्या,शालान्त परीक्षेचा निकाल,मुख्याध्यापकांची, शिक्षकांची तसेच शालेय कर्मचा-यांची नांवे इत्यादि उपयुक्त माहिती स्मरणिकेत अन्यत्र दिली आहे. ती उद्बोधक वाटेल असा विश्वास आहे.

खेडेगावातील शाळा म्हटली की तेथे विद्यार्थ्यांची तशी कमतरताच.आलोभने प्रलोभने दाखवून सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य देऊन थोड्याफार प्रमाणात त्यांच्यावर सक्ती करुन विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागते.याला मुटाट हायस्कूल अपवाद कसे होईल? प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या साधारणपणे प्रमाणित होती.मुटाटच्या खाडीपल्याड असलेले कुंभवडे गांवी ज्यावेळी हायस्कूलची सोय झाली त्यावेळी आमच्याकडील विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली.नव्या शैक्षणिक आकृतिबंधामुळे इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे प्राथमिक शाळेचे ३ वर्ग हायस्कूलला जोडण्याच्या सरकारी निर्णयामुळे १९७८-७९ या वर्षापासून एकेक इयत्ता आमचेकडे घेण्यात आली.१९७९-८० या वर्षी इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे तीनही वर्ग पूर्णपणे आमच्या हायस्कूलमध्ये भरु लागले आणि त्यामुळे विद्यार्थी संख्येला नीटसा आकार आला.पुढील प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या वाढतच गेली.या वाढत्या विद्यार्थ्याची सोय थातूर मातूर सोय असलेल्या अपु-या जागेतच करावी लागत असे.व्हरांड्यामध्येही वर्ग भरवावे लागत.एवढे करुनही ही सर्व व्यवस्था अपुरी पडू लागली.नव्या वर्ग खोल्यांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.अखेरीस नवीन वर्ग खोल्या बांधण्याचा कार्यकारी समितीने निर्णय घेतला.

वर्ग खोल्या बांधण्याचा निर्णय झाल्यावर इमारत बांधकाम शास्रविषयक सल्लागार मंडळींकडून जागेची पाहणी करुन असलेल्या इमारतीवर मजला चढवून नवीन वर्ग खोल्या बांधाव्यात असे ठरले.त्याप्रमाणे तज्ज्ञांकडून नियोजित बांधकामाचा अंदाजी खर्च काढण्यात आला.काटकसर तसेच अत्यावश्यक बाबींवरच खर्च करण्याचे धोरण ठरवून काढण्यात आलेला खर्च दोन लाखांच्यावर गेला.अंदाजीत खर्च व प्रत्यक्ष खर्च यांत साधारणपणे फरक पडतो. प्रत्यक्ष खर्च हा काही प्रमाणात जास्त होतो. हे गृहीत धरुन किमान अडीच लाख रुपयांची तरतुद करायला हवी असे कार्यकारी समितिने ठरविले.अडीज लाखांचा निधी उभा करणे ही कामगिरी कार्यकर्त्यांना जरा जड वाटत होती.या क्षेत्रांत सर्वच नवखे होते. डॉ. लेले यांच्या पश्चात एवढा मोठा निधी जमा करण्याचा प्रसंग आजवर कधी आला नव्हता व ते असताना अशी वेळ इतरांवर कधी आली नव्हती.त्यामुळे ही कामगिरी आपल्या हातून तडीस जाईल की नाही अशी भिती काहींच्या मनाला चाटून गेली.थोडीशी संभ्रमावस्था आली होती खरी.

या थोड्याश्या कठिण परिस्थितीत कार्यकारी समितीचे जेष्ठ सभासद श्री कृष्णाजी विठ्ठल लेले आणि श्री मनोहर गोविंद लेले यांनी योग्य मार्गदर्शन करुन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. खास करुन श्री मनोहर लेले यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या विनयशील आणि आश्वासक स्वभावामुळे मंडळाशी संबंसधित तसेच अपरिचितांनीही देणग्यांचा हात पुढे केला. त्यांच्या बरोबरीने श्री नारायण गणेश परांजपे,कार्यकारी समितीचे एक जेष्ठ,जुने आणि जाणते सदस्य व मंडळाचे उपाध्यक्ष हे पुढे आले. त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.मनातील भिती दूर केली.कार्याचे महत्व व महनियता लोकांना पटवून द्या,लोक तुम्हाला जरुर सहाय्य करतील असा कानमंत्र दिला.विश्वास निर्माण केला.लाखभराचा निधी जमवून देण्याचे आश्वासन दिले.या आश्वासनाचा एक भाग म्हणून आपल्या परांजपे ऑटो कास्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीतर्फे इमारत निधीसाठी म्हणून रु.२५,०००/- ची शुभारंभाची देणगी त्वरीत दिली.

या सर्व गोष्टींचा कार्यकर्त्यांच्या मनावर इष्ट परिणाम झाला.सर्वजण एकवटले व निधीसंकलन मोहिमेला दृढ निश्चयाने सुरुवात झाली.लहानमोठ्या मिळतील त्या देणग्या गोळा करण्यासाठी कार्यकर्ते दारोदार फिरु लागले.अनेक मुटाटकरांनी आपले कर्तव्य मानून जमेल त्या रकमेच्या देणग्या दिल्या. शिक्षण प्रसार हे पुण्यकर्म समजून अनेक मंडळीनीही आमच्या कार्यास हातभार लावला. मंडळाचे विश्वस्त श्री अनंतराव श्रीधर लेले यांनीहि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. निधी जमविण्याचा एक भाग म्हणून स्मरणिका काढायचे ठरले. स्मरणिकेतील जाहिरातीव्दारा छपाई खर्च वजा जाता सुमारे ४२,७५५ रुपयांचा बांधकाम निधी गोळा झाला. स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची सजावट व छपाई श्री हरीष बाळकृष्ण परब यांनी विनामुल्य करुन दिली. स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा दिनांक १५ सप्टेंबर १९८५ रोजी दादरच्या बालमोहन विद्दयामंदिराच्या सभागृहात मंडळाचे अध्यक्ष श्री पु.ग.खेर यांचे अध्यक्षतेखाली डॉ.सुधाकर साने यांचे उपस्थितीत संपन्न झाला.ख्यातनाम गायिका सौ.जयमाला शिलेदार यांच्या सुश्राव्य नाट्यगीत गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. मंडळाचे एक हितचिंतक श्री.य.के.लेले यांच्या सौजन्याने नाट्यगायनाचा कार्यक्रम विनाबिदागी सादर करण्यात आला.

नियोजित बांधकामासाठी जामसंड्याचे श्री.सुरेश गोगटे यांना कंत्राट देण्यात आले.जानेवारी १९८५ मध्ये त्यांनी या बांधकामाची सुरुवात केली.बांधकाम चालू असताना कल्पना नसतांनाही काही अडचणी आल्या.त्या दूर करुन अल्पशा विलंबाने अखेरीस जुलैच्या आरंभी त्यांनी नवीन तीन वर्ग खोल्या बांधून पूर्ण केल्या.दिनांक १५ जुलै १९८५ पासून नवीन जागेत दोन वर्ग सुरु झाले.आमच्या योजनेचा एक भाग पूर्ण झाला.या कामाबरोबरच इमारतीची इतर काही पूर्वी न केलेली किरकोळ कामे करुन घेण्यात आली.या वाढीव कामांमुळे बांधकामाचा एकूण खर्च अडीच लाखांपर्यंत गेला.बांधकाम चालू असताना विद्यार्थ्यांची मोठीच अडचण झाली.जुन्या इमारतीच्या काही भागाची मोडतोड करावी लागल्यामुळे काही वर्ग बाहेरील मोकळ्या जागेत तात्पुरती सोय करुन भरवावे लागले.थोड्याच दिवसांत आपली शाळा नवीन होणार या एका गोड कल्पनेने विद्यार्थ्यांनी ही अडचण सहन केली.याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.शिक्षक व शिक्षकेतर सेवकवर्गांची गैरसोय होणे स्वाभाविक होते.आपली गैरसोय त्यांनी कधीच व्यक्त केली नाही.उलट आम्हालाच सुखद धक्का दिला.मंडळाच्या इमारत निधीमध्ये आपलाही अल्पस्वल्प वाटा असावा याची जाणीव ठेवून आपापसात गोळा केलेली रु ५,२२५/- ची रक्कम मंडळाला देणगी म्हणून दिली.त्यांच्या या देणगीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.अध्यापन कार्याबरोबर वेळप्रसंगी संस्थेला आर्थिक सहाय्य करण्यात आम्ही मागे नाही हे त्यांनी कृतीने सिध्द केले.विनम्रभावाने त्यांना आमचे प्रणाम.

विस्तारीत इमारतीचे जाहीर उद्घाटन व नव्या वर्गखोल्यांचे नामकरण करण्यासाठी तारीख १मार्च १९८६ रोजी हायस्कूलच्या प्रांगणात एक शानदार समारंभ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवगडच्या स.ह.केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. ए. कुळकर्णी यांनी भुषविले होते.श्री. अप्पासाहेब गोगटे व श्री. दादासाहेब राणे हे आजीमाजी आमदार, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. इमारत विस्ताराच्या कार्यपूर्तीमुळे कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उत्साहाला आलेले उधान स्पष्टपणे प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते.

सन १९८७-८८ हे मंडळाचे व डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे रौप्यमहोत्सवी वर्ष. संस्थेच्या व हायस्कूलच्या यशस्वी वाटचालीतील महत्वाचा ऐतिहासिक टप्पा. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या व हायस्कूलच्या वाटचालीतील हा महत्वाचा टप्पा तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिका-यांना व ग्रामस्थांना प्रचंड आत्मविश्वास व कार्यपूर्तीचा आनंद देवून गेला. दृष्ट लागण्यासारखा हा रौप्य महोत्सवी सोहळा तारीख २८ जानेवारी १९८८ ते ३० जानेवारी १९८८ या कालावधीत शाळेच्या प्रांगणात चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तीन दिवस चाललेल्या या समारंभ सोहळ्याचे प्रसंगी अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणुन कोल्हापुरचे प्राचार्य म.अ.कुळकर्णी होते. प्राचार्य कुळकर्णी यांच्याबरोबर डॉ.दिलीप केशव राणे व डॉ. शरद रंगनाथ लेले या विद्वतजनांचा सहवास ग्रामस्थांना घडला व या विद्वतजनांचे प्रबोधनपर बोल ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी हायस्कूलचे स्नेहसंम्मेलन झाले. रात्रीच्या सत्रात विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले.दुसरा दिवस हा या सोहळ्याचा प्रमुख दिवस.या दिवशी सकाळच्या सत्रात काही वर्गखोल्यांचे व प्रवेशव्दाराचे नामकरण अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.रात्रीच्या कार्यक्रमात श्री सदाशिव रामचंद्र लेले यांनी जादूचे प्रयोग सादर केले तर माजी विद्यार्थी श्री म.वि.गोखले यानी सुरेल आवाजात श्रोत्यांना नाट्यगीते ऐकविली.तिसरे दिवशी सकाळी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.त्या दिवशी रात्री मुंबईच्या श्री परशुरामबुवा पांचाळ यांच्या सुमधुर भजनाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.ग्रामस्थांच्या बरोबरीने कार्यकारी समितीचे मुंबई पुण्याकडील पदाधिकारी व सभासद या रौप्य महोत्सवी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित होते.

थोडे मागे जाऊन एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख केल्याशिवाय मंडळाच्या वाटचालीचा आढावा पुढे कथन करता येणार नाही.ती म्हणजे मुटाट जवळच्या मणचे गावांत मंडळाने डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलची भागशाळा सुरु केली.मणचे गावच्या गावक-यांनी विनंती केल्यावरून सन १९८४-८५या वर्षी इयत्ता ८ वी चा एक वर्ग,पुढील वर्षी ९ वीचा एक वर्ग व १९८६-८७ साली दहावीचा वर्ग अशा क्रमाने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी पर्यंतचे भागशाळेचे वर्ग सुरु झाले.तीनही वर्गांची मिळुन विद्यार्थी संख्या सुमारे १४० होती.भागशाळेच्या वर्गांसाठी जागेची तात्पुरती सोय ग्रामपंचायतीने गावांतील श्रीकृष्ण मंदिराच्या धर्मशाळेत केली होती. या कामी त्या वेळचे सरपंच श्री. बापूसाहेब गोखले यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्नांना मणचे ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य दिले. माजी आमदार श्री. दादासाहेब राणे यांनी या भागशाळेसाठी शिक्षण खात्याकडून त्वरीत परवानगी मिळवून दिली. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

सन १९८५-८६ ते सन १९९७-९८ या काळांत प्रामुख्याने विकासाशी निगडीत असे विषेश प्रसंग आले नाहीत. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे इमारत विस्तारासंबसधीचे हिशेब पूर्ण करणे, पावती पुस्तके जमा करुन जमाखर्चाची शहानिशा करणे यासाख्या तांत्रिक बाबींवर कार्यकर्त्यांचा बराच वेळ खर्ची पडला.परिणामी जमाखर्चाचे काम पूर्ण होऊन लेखापरीक्षण होण्यास विलंब झाला.त्यामुळे मंडळाच्या वार्षिक सभा वेळापत्रकाप्रमाणे घेता आल्या नाहीत.मात्र कार्यकारी मंडळाचे उद्देश्य विकासाचे काम अविरत चालू होते.मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करुन देण्यासाठी अधिकाधिक सोयी मंडळाच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध करणे,माहिती तंत्रज्ञानाची तोंडओळख होण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे इत्यादी विधायक बाबींवर सतत विचार चालू होता.याचाच एक भाग म्हणून हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी संगणक प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण करण्यात आल्या.तसेच विद्यार्थ्याना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध स्पर्धात्मक परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत होते. मणचे भागशाळा शाखेसाठी जागेची सोय करण्याविषयी कार्यकारी समितीच्या सभांमध्ये वेळोवेळी चर्चा होत होत्या. मंडळ व मणचे ग्रामस्थांकडुन भागशाळेसाठी सुयोग्य जागेच्या पर्यायांचा शोध चालू होता.थोडक्यात भविष्यातील विस्ताराची पायाभरणी याच कालावधीत करण्यात आली. याच कालावधीत आम्ही मंडळाच्या आगामी वाटचालीतील महत्वाकांक्षी संकल्पांची रुपरेषा निश्चित केली.

या जवळजवळ बारा वर्षांच्या कालावधीत मंडळाचे अनेक नामवंत पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते दिवंगत झाले. त्यांत मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री ना.श्री. पुरुषोत्तम गणेश खेर, श्री. प्रभाकर ताम्हनकर, श्री. धोंडोपंत घाटे,श्री. नानासाहेब पाळेकर,इत्यादी मान्यवरांना आम्ही कायमचे पारखे झालो. ते जरी आज आमच्यात नसले तरी त्यांचे कार्य आम्हांला सदैव मार्गदर्शक होऊन प्रोत्साहित करीत आहे. आमचे जेष्ठ सभासद व पदाधिकारी श्री विष्णु सखाराम मराठे,श्री मनोहर गोविंद लेले, श्री कृष्णाजी विठ्ठल लेले आणि श्री जगन्नाथ दामोदर लेले यांनी मंडळाच्या कार्य संचालनांत त्यांची उणीव भासू दिली नाही. खास करुन श्री मनोहर गोविंद लेले यांनी मुटाटशी संबंधित डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना मंडळाच्या कार्यात सहभागी करुन नविन रक्ताला वाव देण्याचे धोरण राबविले.आजच्या कार्यकारी समितीचे निरीक्षण केले तर श्री मनोहर गोविंद लेले यांचे धोरण सफल झाल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.

मंडळाला कार्यप्रवण होऊन पंचवीस वर्षे झाल्यामुळे सन १९९८-९९ या वर्षात मंडळाच्या घटनेतील अडचणीच्या उद्देश कपातीचा आणि सभासद वर्गणीवाढीचा निर्णय मंडळाला घ्यावा लागला त्याची हकीगत अशी: मंडळाच्या उद्देशातील – सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील जनतेच्या आर्थिक, सामाजिक, औद्दोगिक व सांस्कृतिक विकासासाठी व सर्वांगीण उत्कर्षासाठी खटपटी करणे या उद्देशामुळे धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात मंडळाला १९९२-९३ ते १९९७-९८ या सहा वर्षांत रु.९२२४ इतकी रक्क्म वर्गणी म्हणून भरावी लागली.वरील उद्देश शिक्षणबाह्य प्रकारातील असल्याने हिशेबतपासनिसांच्या सल्ल्यानुसार व पूर्ण विचारांती मंडळाने हा उद्देश घटनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच मंडळाच्या विविध सभासद प्रकारांच्या वर्गणीत १९६२ सालापासून वाढ करण्यात आली नव्हती.अनेक सभासदांकडून त्यात वाढ करावी अशा सूचना येत होत्या. सभासदांच्या सूचनेचा सर्वांगाने विचार करुन कार्यकारी समितीने तारीख १ एप्रिल १९९९ पासून सभासद वर्गणीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला (सभासद वर्गणी दरपत्रक स्मरणिकेत अन्यत्र छापलेले आहे ).

डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल इमारतीच्या विस्तारानंतर मंडळाने मणचे भागशाळेसाठी कायमस्वरुपी इमारत बांधण्यासाठी चाचपणी सुरु केली. अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि श्री. कृष्णाजी विठ्ठल लेले यांनी याकामी पुढाकार घेतला.कार्यकारी समितीच्या सभांमध्ये अनेकदा या विषयावर सखोल चर्चा होऊन सर्व सोयीनीयुक्त असा भागशाळा इमारतीचा प्रस्ताव कार्यान्वित करावयाचे ठरले. सन१९९७-९८ पासून या विषयांवर लक्ष केंद्रित करुन मणचे ग्रामस्थांच्या प्रमुख सहभागासाठी मणच्यातील मंडळाचे हितचिंतक व सचोटीचे कार्यकर्ते श्री. मोरेश्वर अनंत उर्फ बापुसाहेब गोखले, श्री. अरविंद ठाकुरदेसाई, श्री. प्रभाकर मणचेकर, श्री. मुकुंद ठाकुरदेसाई, श्री.तोरसकर, श्री.गजानन सिताराम मेस्त्री, श्री.मंगेश रहाटे व अन्य ग्रामस्थांशी विचारविनिमय केला.या सर्वांनी सहकार्याचा हात पुढे केल्यामुळे ग्रामस्थांच्या पाठिंब्याने भागशाळेची (भाऊसाहेब काळे भागशाळा) संपूर्ण नवी इमारत बांधावयाचा संकल्प जाहीर केला. इमारत बांधकामासाठी मुंबईस्थित मणचे ग्रामविकास मंडळाने आश्वासक पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मणचे ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागांच्या अनेक प्रस्तावांतून गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री.गजानन सिताराम मेस्त्री यांच्या मालकीच्या सर्वे नं.१२,पोट हिस्सा नं.६ क्षेत्र ०-१६-४ या सुमारे १६ गुंठे क्षेत्राच्या भुखंडाची नियोजित शाळा इमारतीसाठी निवड करण्यात आली.भुखंड खरेदीसाठी रुपये ६०,०००पेक्षा अधिक खर्च आला. जमीन खरेदीसाठी श्रीमती नलिनी केशव गोखले यांचेवतीने रुपये ४०,०००/- देणगीस्वरुपात मंडळास मिळाले.एक मोठे काम झाले. मंडळाकडे भुखंड तर आला.आता पुढे काय? अर्थभार पेलावा कसा आणि निधी उभारावा कसा? हे प्रश्न आ वासून उभे राहिले.

या बिकट प्रसंगी श्री कृष्णाजी विठ्ठल लेले आणि कुटुंबिय मंडळाच्या मदतीस धावून आले. त्यांच्या डोंबिवलीतील नातलग श्रीमती शांता काळे याना त्यांनी मंडळाच्या मणचे भागशाळेविषयी सर्व माहिती सांगितली. श्रीमती शांता काळे मंडळाच्या कार्यामुळे प्रभावित झाल्या.मंडळाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे व हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचे निमंत्रण स्विकारुन त्यांनी प्रत्यक्ष मंडळाच्या कार्याचे निरीक्षण केले. त्या स्व:त मणचेकर असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी मुळचे मणचेकर असलेले पण मणचे गाव कायमचे सोडून मुंबईस स्थलांतरीत झालेले कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे,संस्थापक समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई यांचे सुपुत्र डॉ.राम काळे व डॉ.घन:श्याम काळे याना मणचे भागशाळेविषयीची सर्व माहिती सांगितली. प्राथमिक माहितीची देवाणघेवाण झाल्यानंतर सर्वश्री रमेशराव घाटे,विश्वासराव पाळेकर,मनोहर लेले आणि प्रभाकर मणचेकर यांनी डॉ.घन:श्याम काळे यांची वसई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना मंडळाच्या कार्याची सांद्यत माहिती दिली. मणचे भागशाळेची प्रगती व भागशाळा इमारतीची निकड समजावून सांगितली. डॉ.घन:श्याम काळे यांचे पुण्यातील जेष्ठ बंधु डॉ.राम काळे यांना सविस्तर पत्राने मंडळाच्या कार्याचा परिचय करुन दिला.

आणि सर्व काळे कुटुंबीय या उदात्त शैक्षणिक कार्याच्या पूर्ततेसाठी मंडळाच्या पाठिशी उभे राहिले. मणचे येथील नूतन इमारतीस कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे भागशाळा हे नाव देण्याच्या अटीवर त्यांनी एकरकमी रुपये पांच लाख देणगी देण्याचे मान्य केले. शुभारंभाच्या या आश्वासक देणगीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना बळ लाभले.त्यांनी यथाशक्ती धनसंचयाचा वसा घेऊन दृढनिश्चयाने उर्वरीत रक्कम उभी केली. मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश घाटे यांच्या प्रयत्नाने वालचंद ट्रस्ट यांचेकडून घसघशीत २.७५लाख रुपयांची विनाअट देणगी मिळाल्याने आमचे काम फारच सोपे झाले.मग देणग्या देण्यात मणच्याचे गोखले,ठाकुरदेसाई,मणचेकर इत्यादी मणचे ग्रामस्थांबरोबर मुटाटकरही मागे राहिले नाहीत.याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही आमच्या सन २००४ ते सन २००७ या काळात प्रसिध्द केलेल्या अहवालांत सादर केलेली आहे.

भागशाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ दिनांक १० जानेवारी २००४ रोजी श्री नारायणराव दिवेकर भागीदार समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई, यांचे अध्यक्षतेखाली मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर कार्योपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजन होऊन झाला. विधीवत भूमीपूजनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायणराव दिवेकर यांचे शुभ हस्ते शिलान्यासाचा चिरा बसविण्यात आला. अत्यंत उत्साही वातावरणात मणचे गांवी हायस्कूल भागशाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची मुहुर्तमेढ रोवली गेली. या महत्वपूर्ण सोहळ्यास सर्वश्री वि.स.मराठे, ज.दा.लेले,अच्युत राणे,शिवाजी राणे,विनायक कृष्णाजी लेलें सह मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेली पाहुणे मंडळी उपस्थित होती. मंडळाच्या स्थानिक समितीचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय श्री.बापुसाहेब गोखले,श्री.अरविंद ठाकुरदेसाई यांचेसह समस्त मणचेकर ग्रामस्थ आणि मणचे ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी यांनी या शानदार सोहळ्याचे उत्तम आयोजन केले होते. नियोजित बांधकामासाठी मुटाटचे श्री सुरेश रायकर यांना कंत्राट देण्यात आले.

समस्त मणचेकर ग्रामस्तांसह सर्वांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून सुंदर अशी आठ वर्ग खोल्यांची नूतन इमारत मे २००५ मध्ये बांधून पूर्ण झाली. बांधकामास सुरुवात झाल्यापासून ते उद्घाटन होईपर्यंत सुमारे रु.२२ लाखांचा खर्च झाला. दिनांक १२ जून २००५ रोजी डॉ. राम काळे, डॉ.घन:श्याम काळे यांचे शुभ हस्ते भागशाळा इमारतीचा दिमाखादार उद्घघाटन सोहळा झाला.तसेच वर्ग खोल्यांना देणग्या देणा-या देणगीदारांच्या हस्ते खोल्यांच्या नामकरन फलकांचे अनावरण करण्यात आले. एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेला. मंडळाच्या इतिहासात ठळकपणे ही घटना अधोरेखित करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे.त्याचबरोबर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे श्रम सार्थकी लागल्याने कृतकृत्य वाटत आहे. दिनांक ८ ऑगस्ट २००६ पासून नवीन इमारतीत भागशाळेचे (इयत्ता ८ वी ते १०) वर्ग भरु लागले.

मंडळाच्या या सुवर्णमहोत्सवी आढावाप्रसंगी काही खास गोष्टींचा व ठळक घटनांचा उल्लेख आम्ही अन्यत्र केला आहे. त्यातील एक ठळक घटना अशी:
मंडळाच्या मालकीच्या असलेल्या हायस्कूल इमारतीचा भूखंड भूमापन क्रमांक १११ब खाते क्रमांक ७०४ (१.०७ हेक्टर २ आर) तसेच कै.अनंत विठ्ठल लेले यांचेकडून खरेदी केलेला भूखंड सर्वे न.२०२ हिस्सा न. १३ क्षेत्र १५ गुंठे ठिकाण आगार हे दोनही भूखंड शासकीय विलंबामुळे रीतसर मंडळाच्या नावे ७/१२ मध्ये नोंद होऊ शकले नव्हते.कार्यकारी समितीचे माजी खजिनदार व स्थानिक समितीचे कर्तव्यतत्पर सभासद श्री.अच्युत अर्जुन राणे यांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांस यश येऊन या दोन्ही जमिनी निर्विवादपणे मंडळाच्या मालकीच्या झाल्या.श्री राणे आणि त्यांना सहाय्य करणा-या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत.

मणचे येथील भागशाळा इमारतीच्या बांधकामानंतर मंडळाने मुटाट परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्याच्या पर्यायावर विचार सुरु केला. सन २००८ सालच्या हायस्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी ग्रामस्थांबरोबरच्या बैठकीत या पर्यायावर सखोल चर्चा झाली. मुटाटचे आराध्यदैवत श्री स्थानेश्वराच्या दर्शनासाठी मुंबईकर मंडळी गेली असता गप्पागोष्टींच्या ओघात श्री अच्युतराव राणे यानी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाबद्दल विचारणा केली. कनिष्ट महाविद्दयालय विनाअनुदान तत्वावर चालवावे लागणार असल्याने घसघशीत देणगी मिळाल्यास कनिष्ट महाविद्दयालय सुरु करावयाचा मंडळाचा विचार असल्याचे कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यानी सांगितले. श्री अच्युतराव राणे यानी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाबद्दलची माहिती मुटाटचे सुपुत्र श्री रावजी शिवराम राणे यांच्या कानावर घातली. श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे यांनी कनिष्ट महाविद्दयालय प्रत्यक्षात येण्यासाठी मंडळास आश्वासक पाठिंबा दिला. कनिष्ट महाविद्यालय विनाअनुदान तत्वावर चालवावे लागणार ही शक्यता गृहित धरुन त्यांनी खर्चाचा बोजा उचलण्याचे मान्य केले. आणि विनाविलंब रुपये ११,००,०००(रुपये अकरा लाख) ची भरीव देणगी दिली.

श्री नाना राणे यांचे आश्वासक पाठबळ व परिसरातील विद्दार्थ्यांची आग्रही मागणी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २००९-१० पासून मुटाट येथे कै.सौ.जानकी शिवराम राणे कनिष्ट महाविद्दालयाच्या ( प्रस्तावित) विनाअनुदानीत वाणिज्य शाखेचा ११ वीचा वर्ग सुरु करुन शुभारंभ केला. कनिष्ट महाविद्दयालयास शासनाची मान्यता मिळेल अशी खात्री होती.परंतु प्रयत्न करुनही शासकीय धोरणांमुळे मान्यता मिळू शकली नाही. इयत्ता अकरावी वाणिज्यचा वर्ग २००९-१०या वर्षी चालवून इयत्ता बारावीसाठी २०१०-११मध्ये फणसगांव शिक्षणसंस्थेमार्फत विद्यार्थ्थांना बोर्डाच्या परीक्षेला बसविले. आमच्या महत्वाकांक्षी वाटचालीत सहकार्याचा हात पुढे करुन आमच्या विद्दयार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणच्यासाठी सर्व ती मदत केल्याबद्दल आम्ही फणसगांव शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री. सहदेव नारकर व त्यांच्या सहका-यांचे आभारी आहोत. एक पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी कनिष्ट महाविद्दयालयाला शिक्षण खात्याची परवानगी मिळावी म्हणून मंडळाचे आणि श्री नाना राणे यांचे अखंड प्रयत्न सुरु आहेत.

मुटाटला कनिष्ट महाविद्यालय सुरु करावयाचे म्हटल्यावर सारे पदाधिकारी व कार्यकार्ते उत्साहाने कामास लागले. कनिष्ट महाविद्दयालयासाठी सुसज्ज जागा, त्याचबरोबर संगणक प्रशिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम , हायस्कूलची वाढती विद्दयार्थी संख्या आणि भविष्यातील सर्वांगीण वाढ विचारात घेऊन मंडळ मुटाट हायस्कूल इमारतीच्या विस्ताराची योजना आखली. हायस्कूल इमारतीच्या दक्षिणेला इमारतीला जोडून मणचेप्रमाणे आठ खोल्यांची एक मजली इमारत बांधण्याचे ठरले. प्रस्तावित इमारतीच्या आराखडयाच्या शासकीय मान्यतेनंतर रविवार दिनांक ४ जानेवारी २००९ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे , कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री. मनोहरपंत लेले यांचे उपस्थितीत विश्वस्त व उपाध्यक्ष श्री. विष्णु सखाराम मराठे व मुख्याकार्यवाह श्री. जगन्नाथ दामोदर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. भूमीपूजन सोहळ्याचे पौरोहित्य आदरणीय श्री विनुभाऊ मराठे यांनी केले.या सोहळ्यास सर्वश्री शिवाजी राणे,राजेश राणे,अच्युतराव राणे,सदानंद पाळेकर,विठोबा प्रभु,सुभाषचंद्र परांजपे,सुरेश पाळेकर,सुरेश रायकर यांचेसह स्थानिक समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

भूमीपूजन सोहळ्यानंतर नियोजित बांधकामासाठी श्री सुरेश रायकर यांना बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. पावसाळा संपल्यावर प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात करण्याचे नक्की झाले. दिनांक २७ दिसेंबर २००९ या शुभ दिवशी सकाळी ९ वाजता श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे,अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते कोनशिला बसविण्यात येऊन बांधकामाचा शुभारंभ झाला. या संस्मरणीय सोहळ्यास कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी श्री शिवाजी राणे,श्री विनायक लेले,श्री राजेश राणे,श्री जितेंद्र साळुंके यांचेसह मुंबईहून आलेल्या पाहुण्यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. स्थानिक समितीचे श्री अच्युत राणे,श्री सुभाषचंद्र परांजपे,श्री सदानंद पाळेकर,श्री सुरेश पाळेकर,श्री विठोबा प्रभु, देवगड पंचायत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्री जनार्दन तेली, स्थानिक समिती सभासद, प्रमुख ग्रामस्थ व अन्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीने समारंभाची शोभा वाढली. कोनशीलान्यास आणि बांधकाम शुभारंभाचा हा संस्मरणीय सोहळा दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहील.

बांधकाम शुभारंभ सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभारंभाच्या देणग्या देऊन तथा जाहीर करुन आमचा उत्साह व्दिगुणित केला. वाचकहो! बांधकाम सुरु झाल्यावर आमच्या देणगीदारांकडून उदारहस्ते अर्थसहाय्याचा जो ओघ सुरु झाला तो अजूनही अव्याहत सुरु असून देणग्यां येत आहेत. आमच्या आवहनाला प्रतिसाद देत श्री मनोहर गोविंद लेले आणि कुटुंबीय, श्री रमेश अच्युत घाटे आणि कुटुंबीय, श्री यशवंत केशव लेले, श्री विनायक कृष्णाजी लेले आणि कुटुंबीय, सौ सुशीला व श्री नारायण गणेश परांजपे आणि कुटुंबीय, श्री बळवंत शिवराम राणे आणि कुटुंबीय, श्री विवेक विष्णु केळकर आणि कुटुंबीय, श्री अभिजित राणे मित्रमंडळ आणि माजी विद्यार्थी संघ यांचेकडून प्रमुख देणग्या प्राप्त झाल्या. सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या शुभ मुहुर्तावर सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमुख देणगीदारांच्या हस्ते नूतन वर्गकक्षांचे अनावरन करण्यात येणार आहे (अनावरन फलकांचा तपशील अन्यत्र दिला आहे). आजमितीस संपूर्ण इमारतीच्या बांधकामास आवश्यक सोयींसहित सुमारे २८ लाख रुपये एवढा खर्च झाला. काही किरकोळ कामे वजा जाता मार्च २०१२ अखेर बांधकाम पूर्ण झाले आहे.

सन २०११-१२ या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने मुटाट येथील नूतन हायस्कूल इमारतीचे उर्वरीत बांधकाम, कंपाऊंडचे मजबूतीकरण, रंगमंचाचे कायमस्वरुपी निर्माण यांच्या जोडीने हायस्कूल संकुलास व नूतन इमारतीस नांव देण्याच्या उद्देश्यासाठी देणग्या जमविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कार्यकारी समितीच्या पदाधिकारी डॉ. हेमलता माधव पुरंदरे यांनी आमच्या आवहनास प्रतिसाद देऊन विद्दयानगरी संकुलाच्या नामकरणासाठी घसघशीत देणगी जाहीर करुन शुभारंभाची रक्कम मंडळाकडे जमा केली आहे. तसेच मणचे येथिल भाऊसाहेब काळे भागशाळेच्या पोषण आहार खोलीसाठी मणचेकर ग्रामस्थांनी देणग्या जमविण्याचा संकल्प सोडला आहे. या पोषण आहार खोलीच्या बांधकामासाठी श्रीमती शांता काळे यांनी आश्वासक देणगी दिली आहे. या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित होणा-या स्मरणिकेत छापण्यासाठी अनेक जाहिरांतीं मंडळाचे विश्वस्त श्री अनंतराव लेले तसेच श्री बळवंतराव राणे आणि श्री अभिजित राणे यांनी मिळवून दिल्या आहेत. मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निधी संकलनासाठी अनंत परिश्रम घेत आहेत. येणेप्रमाणे अनेक मान्यवरांकडून व कार्यकर्त्यांकडून भरघोस अर्थसहाय्य प्राप्त होत असल्याने व होण्याच्या मार्गावर असल्याने मंडळाच्या उद्देश्यपूर्तीसाठी सध्य:स्थितीत निधीची चणचण पडणार नाही याची खात्री वाटते.

गेल्या काही वर्षातील विविध उपक्रम कार्यान्वित होत असताना कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष/कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि खजिनदार श्री. विनायक लेले, यांनी समर्थपणे कार्याची धुरा सांभाळली. कार्यकारी समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य सर्वश्री प्रभाकर परांजपे, रामचंद्र वारीक,शिवाजी राणे, जितेंद्र साळुंके,विवेक केळकर,राजेश राणे आणि किशोर प्रभू यांची अखंड आणि समर्थ साथ त्यांना मिळाली. त्याचप्रमाणे मुटाट व मणचे परिसरातून कार्यकारी समितीचे पदाधिकारी सर्वश्री विष्णु सखाराम मराठे,जगन्नाथ दामोदर लेले, सुभाष गणेश परांजपे यांचे जोडीने स्थानिक समिती सदस्य सर्वश्री अच्युत अर्जुन राणे, बापुसाहेब गोखले, अरविंद ठाकुरदेसाई,मंडळाचे सल्लागार व हितचिंतक सर्वश्री बळवंतराव राणे,नानासाहेब राणे,अभिजित राणे,रघुनाथ रत्नोबा पाळेकर,अंकुश मोंडे,विलास साळुंके, रविंद्र साळुंके,महेंद्र गोविंद साळुंके इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी निधी जमा करण्यासाठी अनंत परिश्रम केले.

आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कार्यकारी मंडळाच्या बरोबरीने आमच्या स्थानिक समिती सदस्यांनी, सभासदांनी व कार्यकर्त्यांनी बरोबरीचा वाटा उचलून आमचा उत्साह व्दिगुणित केला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या सर्वांचे जाहिर ऋण व्यक्त करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. मंडळाची आजवरची प्रगती आमच्या सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या योगदानाने आणि सन्माननीय देणगीदारांच्या निरपेक्ष दातृत्वाच्या बळावर झाल्याचे विनयपूर्वक कबूल करतो. म्हणुनच मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाच्यावेळी देणगीदारांसह सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन व विनम्रपणे मदतीसाठी आवाहन करुन नवीन प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवण्याचा शिरस्ता आजतागायत आम्ही कटाक्षाने पाळत आलो आहोत.

आमच्या सभासदांचे अतुट प्रेम व विश्वास यांच्या जोडीला सन्माननीय देणगीदारांचे भक्कम पाठबळ लाभल्याने मुटाट परिसरातील विद्यार्थ्यांसाठी माध्यामिक आणि उच्चमाध्यमिक (कनिष्ट महाविध्यालयीन) शिक्षणाच्या सोयी निर्माण करु शकलो. पंचक्रोशीच्या शैक्षणिक विकासासाठी जे जे काही करता येणे शक्य होते ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत हे अत्यंत विनयाने या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नमूद करु ईच्छितो. मंडळाचे सर्व हितचिंतक,आश्रयदाते, आजीव सभासद, सन्माननीय देणगीदार, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी या सर्वांना विदित करण्याचा हा प्रयत्न सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी नम्र विनंती. सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या या संक्षिप्त कथानामध्ये आमच्या ज्या आदरणीय बंधुभगिनींचा,हितचिंतकांचा आणि कार्यकर्त्यांचा नामोल्लेख आम्हांला करता आला नाही त्यांचे सदैव ऋणी राहणे पसंत करतो. मंडळाचे शैक्षणिक उपक्रम आणि इतर संकल्प सर्वांच्या सहकार्यानेच सफल झाले आहेत आणि उत्तरोत्तर विकासाची आणि यशाची कमान चढती राहील याची कृतज्ञतापूर्वक ग्वाही देतो.

आमच्या वाटचलीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हांला अत्यानंद होत आहे. मंडळाच्या स्थापनेपासून डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचा ( मुटाट विद्दयामंदिराचा) इयत्ता आठवीचा प्रथम वर्ग सुरु झाल्यापासून ते हायस्कूल परिपूर्ण होऊन आजच्या नामवंत स्थितीप्रत येण्यात आमच्या शिक्षक व शालेय कर्मचारी वर्गाचा महत्वपूर्ण हातभार लागलेला आहे. आमच्या शिक्षकांनी परिसरातील विद्दार्थ्यांना परिपूर्ण माध्यमिक शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत हे इथे नमूद करु ईच्छितो. मंडळाच्या शैक्षणिक तसेच संगणक प्रशिक्षणादि उपक्रमांच्या अपेक्षित यशासाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याची मंडळाला सदैव गरज राहणार आहे. मंडळाची उद्दीष्टे व संकल्प त्यांच्या सक्रियतेमुळेच सफल झाली आणि होतील अशी मंडळाची धारणा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्वांना सुख समृध्दी आणि सुयश चिंतितो.

मित्रहो! छपन्न वर्षांपूर्वीच्या मुटाटात व आजच्या मुटाटात लक्षणीय फरक पडला आहे.मोटर वहातुकीस योग्य अशी मणचे- पाळेकरवाडी- मुटाट जोडणारी डांबरी सड़क झाल्याने गावांत एस टी ची ये जा बारामास होवू लागली आहे.घरोघरी विजेचे व सौर उर्जेचे दिवे झळकू लागले आहेत.पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनांमुळे कष्टकरी शेतक-यांच्या दैनंदिन जीवनांत सुबत्ता व स्वच्छता आली आहे. पिठाच्या चक्कया आहेत.आधुनिक यंत्र सामुग्रीने युक्त भात सडण्याच्या गिरण्याही अलिकडे सुरु झाल्या आहेत.जात्यांची घरघर व मुसळाची टणटण बंद झाली आहे.गावात वैद्दकीय सोयी उपलब्ध झाल्या आहेत. खासगी हॉस्पिटले आणि दवाखाने आहेत.सबपोष्ट ऑफिस सुरु झाल्याला अनेक वर्षे झाली आहेत.टेलिफोनचे तसेच भ्रमणध्वनींचे जाळे निर्माण झाले आहे.एवढेच नाही तर रिक्शा, मोटरसायकल आणि मोटारी यांच्या बरोबरीने डिश टीव्ही, केबल टीव्हींचांही प्रसार झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षणप्रसारामुळे ग्रामस्थ व शेतकरी बांधव उत्पादन वाढीसाठी आधुनिक प्रक्रियांचा अवलंब करत आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची मानसिकता लोकांमध्ये रुजू लागली आहे. वैनगंगा कृष्णा ग्रामिण बॅंक या बॅंकेची शाखा सुरु झाली आहे. थोडक्यांत सांगायचे म्हणजे मुटाट परिसराचा बराचसा कायापालट झाला आहे.

नोकरी व्यवसायामुळे मुटाटला बरीच वर्षे न गेलेले काही मुटाटकर आम्हांला पूर्वी उपहासाने सांगायचे की ,आहे काय त्या मुटाटात? त्यांना आमचे आग्रहाचे सांगणे आहे की त्यांनी एक वेळ मुटाटला यावे व खात्री करुन घ्यावी की त्यावेळचे मुटाट व आजचे मुटाट यांत काही बदल झाला आहे का? आमचे मुटाट गांव हे काही पर्यटन स्थळ नाही.पण आमचा आग्रह आहे की, शहरातल्या धकाधकीच्या ,दाटीवाटीच्या, प्रदुषणयुक्त वातावरणात जीवन घालविणा-यां शहरवासियानी चार दिवसासाठी मुटाटला यावे,शाळेचा नयनरम्य परिसर पाहावा,स्थानेश्वर,पावणाई,मालवीर,भुतनाथ या ग्रामदैवतांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, खाडी किनारी एखादी संध्याकाळ घालवावी,मोकळी व शुध्द हवा खावी,कातळातील झ-याच्या निर्मळ पाण्याचे जलपान करावे,नीरव शांतता अनुभवावी.आमची खात्री आहे की जो एक बार यहां आयेगा वो बार बार आते रहेगा.

वाचकहो! मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या व डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येस ज्या आमच्या पूर्वसुरींनी आमच्या वाटचालीचा मार्ग आम्हाला आखून दिला त्यांचे विनम्र भावाने पुण्यस्मरण करतो. त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने व त्यांच्या आशिर्वादांच्या पुण्याईवर आम्ही आजवरची वाटचाल केली आहे. भविष्यांतील वाटचालही सभासदांच्या, सहाय्यकर्त्यांच्या आणि हिचिंतकांच्या आशिर्वादाने यशस्वी होईल याची खात्री आहे. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी आमच्या सर्व सन्माननीय देणगीदारांचे,जाहिरातदारांचे, सभासदांचे, कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे, ग्रामस्थांचे आणि शिक्षणप्रेमीजनांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून ही वाटचालीची कथा आवरती घेतो.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकरिता
श्री जगन्नाथ दा. लेले श्री विश्वासराव रा. पाळेकर  श्री मनोहर गो. लेले श्री विष्णु स. मराठे श्री रमेश अच्युत मुख्य
कार्यवाह                    कार्याध्यक्ष                   उपाध्यक्ष                     उपाध्यक्ष                      अध्यक्ष

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ दिनांक २ मे ते ४ मे २०१२ : सुवर्ण क्षणांचे  वृत्तांकन आणि क्षणचित्रे:

सुवर्ण महोत्सव वाटचालीच्या वृत्तांन्तात नमूद केल्याप्रमाणे सुवर्ण महोत्सवी वर्षात नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच हायस्कूलतर्फे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सुवर्ण महोत्सव सांगता समारोहाच्या निमित्ताने मंडळाने प्रसिध्द केलेल्या ‘झेप’ या स्मरणिकेत मंडळाच्या स्थापनेपासून ते ३१ मार्च २०१२ पर्यंतच्या वाटचालीतील सर्व महत्वाच्या घटनांचा आढावा सभासदांसह सर्व हितचिंतकांना सादर केला आहे. आता प्रत्यक्ष सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमांचे व प्रमुख घटनांचे संक्षिप्त वार्तांकन आपणा सर्वांच्या माहितीसाठी पुढे देत आहोत.

मंडळाच्या आणि हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा दिमाखदार सोहळा महोत्सव दिनांक २ मे २०१२ ते ४ मे २०१२ या तीन दिवसात उत्साहाने पार पडला.मंडळाच्या वाटचालीतील महत्वाचा मैलाचा दगड आणि कार्यपूर्तीचा ठळक टप्पा अशी या दिमाखदार सोहळ्याची सुवर्णाक्षरात नोंद व्हावी असे दृष्ट लागण्यासारखे सुनियोजित आयोजन करण्यात आले होते.वर्षभर चालू असलेल्या विविध उपक्रमांच्या आयोजनासह सुवर्ण महोत्सवाची सुनियोजित आखणी आणि सादरीकरणाचे इंद्रधनुष्य सुवर्णमहोत्सव समितीने लिलया पेलले याबद्दल सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांचे मन:पूर्वक आभार.

सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुभारंभ – दिवस पहिला: बुधवार दिनांक २ मे २०१२:

सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्याच्या प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मा. श्री रमेशराव घाटे हे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक श्री रमेश ताम्हनकर यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे पुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले.

प्रमुख पाहुण्या मा.साहित्यिका सौ. वृंदा कांबळी यांचे हस्ते मंडळाच्या झेप या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर श्री दादा मराठे, श्री ज.दा.लेले,श्री विश्वासराव पाळेकर, श्री शिवाजी राणे,श्री विनायक लेले,श्री जितेंद्र साळुंके,श्री सुभाष परांजपे, श्री विवेक केळकर, श्री किशोर प्रभू,श्री राजेश राणे, डॉ.हेमलता पुरंदरे,श्री अच्युतराव राणे, श्री रावजी(नाना) राणे, श्री बळवंतराव राणे, सौ.मीरा पिंपळस्कर,श्रीमती शांता काळे, सरपंच सौ.प्रणाली भेकरे,श्री मोरेश्वर गोविंद लेले, श्री बापुसाहेब गोखले,श्री रायकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

या समारंभाचे औचित्य साधून मंडळाच्या कामकाजात महत्वाचे योगदान देऊन भरीव कार्य करणारे श्री दादा मराठे, श्री ज.दा.लेले, डॉ.हेमलता पुरंदरे, श्री बापुसाहेब गोखले, श्रीमती शांता काळे या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.मा. श्री कृ.वि.लेले व मा. श्री मनोहर लेले यांचा सत्कार मुंबईत कार्यकारी मंडळाच्या सभेत करण्याचे ठरले.

हायस्कूलच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी सवर्श्री रघुनाथ पाळेकर, जयंत परांजपे,भगवान पाळेकर,सुभाष परांजपे,मधुकर तेली यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. तसेच माजी मुख्याध्यापक श्री सी.रा.प्रभूदेसाई व माजी शिक्षक श्री जगन्नाथ तु.बांडे यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रमुखपाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी वर्षात हायस्कूलमध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुण्या मा. सौ. वृंदा कांबळी यांनी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक तसेच सुवर्णमहोत्सावाच्या प्रमुख सोहळ्यास अनुलक्षून ओघवत्या शैलीत उद्बोधक भाषण केले.शाळेचा नयनरम्य परिसर व सर्वसंबसधीतांचा भक्कम आधार यामुळे संस्था आपल्या उद्दिष्टांची निश्चितच पूर्ती करेल अशी शुभेच्छा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ.हेमलता पुरंदरे, सर्वश्री ज.दा लेले,दादा मराठे, बापुसाहेब गोखले,कार्याध्यक्ष व अध्यक्ष यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

वरील कार्यक्रम पार पडल्यानंतर डॉ.हेमलता माधव पुरंदरे(लेले)विद्दासंकुलाच्या नामफलकाचे श्री मधुकर शंकर तेली यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर निमंत्रित आणि मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या तसेच विदयार्थी,पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास मंडळाच्या सर्व पदाधिका-यांच्या बरोबर मुटाट व मणचे स्थानिक समितीचे सदस्य, मणचे गावचे सरपंच,पं.स.सदस्य सौ. दिप्ती घाडी, मणचे शाखेचे विद्यार्थी यांचेंबरोबर बहुसंख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. श्री बापूसाहेब गोखले यांनी याप्रसंगी शाल व श्रीफळ देऊन श्रीमती शांता काळे, अध्यक्ष श्री रमेशराव घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर,मुख्याकार्यवाह श्री ज.दा.लेले यांचा सत्कार केला. श्री शिवाजी राणे,श्री विनायक लेले, श्री राजेश राणे,माजी शिक्षक श्री बांडेसर, माजी मुख्याध्यापक श्री प्रभूदेसाई सर इत्यादि मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मणचे हे मंडळाचे अभिन्न अंग असून मंडळाच्या वाटचालीत कोणत्याही प्रकारे आप-पर भाव केला जाणार नाही याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना कार्याध्यक्ष श्री विश्वास पाळेकर यांनी दिली. श्री बापुसाहेब गोखले, श्रीमती शांता काळे, श्री ज.दा.लेले,श्री प्रभूदेसाई सर, श्री संदिप सातवळेकर यानीही आपले विचार व्यक्त केले.

रात्रीच्या सत्रात हायस्कूल तसेच मुटाट,पाळेकरवाडी,वाघोटण, सडेवाघोटण येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणर्शनाच्य कार्यक्रमांस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ब्राम्हणवाडी महिला मंडळानेही याप्रसंगी नाटक सादर केले.

सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस दुसरा : गुरुवार दिनांक ३ मे २०१२:

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.मा.श्री अमृतराव राणे, मा.जनार्दन तेली आणि अन्य मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मुख्याध्यापक श्री रमेश ताम्हनकर यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे पुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले. नूतन इमारतीच्या पाय-यावर मा.श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरानी इमारतीत प्रवेश केला. नूतन इमारतीचे उद्घाटन मा.श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इमारतीच्या भूमीपूजनाच्या पाटीचे अनावरण श्री रावजी शिवराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याच समारोहात पुढीलप्रमाणे आठ वर्गखोल्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
१.कै.गणेश आप्पजी परांजपे स्मृतीकक्ष-उद्घाटक श्री केशव सुभाष परांजपे/सुभाष परांजपे
२.कै अच्युत भालचंद्र घाटे व श्रीमती सुमती अच्युत घाटे स्मृतीकक्ष-उद्घाटक डॉ.दिलीप अच्युत घाटे
३.कै.शिवराम बळवंत राणे स्मृतीकक्ष-उद्घाटक सौ.व श्री मधुकर परब (श्रीमती सुचेता राणे)
४. कै. गोविंद विष्णु लेले व कै श्रीमती भागीरथी गोविं लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री मोरेश्वर गोविंद लेले
५.माजी विद्यार्थी कक्ष- उद्घाटक सर्व माजी विद्यार्थी
६.कै. केशव बाबुराव लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विनायक कृष्णाजी लेले
७.कै.रत्नाकर शिवराम राणे स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री अच्युतराव राणे
८.कै.वि.गो.केळकर व श्रीम.विनिता वि. केळकर स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विकास,विवेक,विनय केळकर बंधू
या सुवर्णमहोत्सवाचे प्रसंगी मंडळाचे प्रमुख देणगीदार सर्वश्री नानासाहेब राणे,बळवंतराव राणे,विनायक लेले,केळकर बंधू,मोरेश्वर लेले, डॉ.दिलीप घाटे, केशव सुभाष परांजपे,तसेच सौ.मीरा पिंपळस्कर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे मा. श्री अमृतराव राणे यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमात सर्वश्री सुरेश रायकर,किरण प्रभू,अच्युतराव राणे,राजेश राणे,जितेंद्र साळुंके,शिवाजी राणे,किशोर प्रभू,बाळकृष्ण पाळेकर,केशव साळुंके,विठोबा प्रभू,रघुवीर लेले,उदय सोवनी,चंद्रकांत घाडी,अमोल पाळेकर,सत्यवान परब,प्रमोद चव्हाण,चंद्रकांत पाळेकरआणि सौ.गीता सोवनी,सरपंच सौ. प्रणाली भेकरे यांचा तसेच मंडळाचे अन्य आजी-माजी सभासद, इतर मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुवर्ण महोत्सवी समिती कार्यकर्ते माजी विद्दयार्थी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच श्री धरपणकर सर यांचा खास सत्कार करण्यात आला.

त्यानंतर निमंत्रित आणि मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या तसेच विदयार्थी,पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

 रात्रौ ठिक १०.०० वाजता नवलादेवी नाट्यमंडळ सडेवाघोटण यांनी देवाघरचा न्याय ही नाट्यकृती सादर केली.

सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस तीसरा : शुक्रवार दिनांक ४ मे २०१२:

कार्यक्रमाची सुरुवात ठिक १०.०० वाजता सत्यनारायणाच्या महापूजेने झाली. पूजाविधी सुरु असताना ११.०० वाजता फुड फेस्टीवलचे उद्घउटन मा. श्री रमेशराव घाटे यानी केले.

फूड फेस्टीवलमधील पाककृतींचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. सत्यनारायणाच्या महापूजेनंतर चक्रीभजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सायंकाळच्या सत्रात माजी विद्दयार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्व कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्याने सुवर्णमहोत्सवाची सांगता अत्यंत आनंदाची आणि कायम स्मरणात राहील अशी संस्मरणीय झाली.

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ क्षणचित्रे:

शुभारंभ दिनांक 02.05.2012: दीप प्रज्वलन:                       

  

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत:

 

सुवर्ण महोत्सवी “झेप” स्मरणिकेचे प्रकाशन:

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ :दिनांक 03.05.2012: प्रमुख पाहुण्यांचे स्वागत:   

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ : दिनांक 03.05.2012: प्रमुख देणगीदारांचे स्वागत:

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ : दिनांक 03.05.2012 मान्यवरांचे स्वागत:

हायस्कूलच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार:

सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ : दिनांक 02.05.2012 पुरंदरे(लेले)विद्या संकुलाचे अनावरन:

कै. भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे: शालेय पोषण डॉ.हेमलता माधव आहार खोलीचे श्रीमती शांता काळे यांचे शुभहस्ते उद्घाटन:

सौ.मीराताई पिंपळस्कर आणि श्री सुहास चिरपुटकर यांचा सत्कार :

कै. गोविंद विष्णु लेले व कै श्रीमती भागीरथी गोविंद लेले स्मृतीकक्ष-उद्घाटक श्री मोरेश्वर गोविंद लेले:

कै. केशव बाबुराव लेले स्मृतीकक्ष-उद्घाटक श्री विनायक कृष्णाजी लेले:

शाळेभोवतीच्या कंपाऊंड वॉलचे उद्घाटन करताना श्री विनायक कृष्णाजी लेले आणि मान्यवर:

डॉ. श्री.र. लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि कर्मचारी वर्ग:

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे माजी विद्यार्थी:

खास प्रकटन: सुवर्ण महोत्सवाच्या आयोजनासह, सुनियोजित आखणी आणि सादरीकरणाचे लक्षवेधी काम सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे, उपाध्यक्ष सर्वश्री अच्युतराव राणे, सदानंद पाळेकर आणि रमेश ताम्हनकर, सचिव श्री दिलीप तुकाराम घरपणकर, खजिनदार सर्वश्री सुभाषचंद्र परांजपे आणि रघुनाथ पाळेकर, सहसचिव सर्वश्री लक्ष्मण घाडी आणि रघुवीर लेले, सल्लागार सर्वश्री सीताराम प्रभुदेसाई,जगन्नाथ लेले, मधुकरराव मराठे, जनार्दन तेली,मोरेश्वर गोखले आणि बाळकृष्ण पाळेकर आणि सर्व सदस्यांनी  लिलया पेलले याबद्दल सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे मन:पूर्वक आभार.

सुवर्णमहोत्सव समारोहानंतरची दमदार वाटचाल:

ल्लेखनीय उद्देश्यपूर्तीचे यश – कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी:
शासन निर्णय क्र.स्वयं अ/२०१३/८८५/१३ माशि-१ चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यास अनुसरुन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय सुरु केले आहे. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक ३ जुलै २०१३ रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे उर्फ श्री नाना राणे यांचे हस्ते आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या समारंभास सेवानिवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. इयत्ता ११ वीचे कला आणि वाणिज्य शाखांचे वर्ग सुरु झाले असून विद्दयार्थी पटसंख्या ६१ आहे.

महत्वाच्या नोंदी:
मंडळाच्या सर्व सभासदांचे हार्दिक पाठबळ, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, चिकाटी व कार्यक्षमता आणि सन्माननीय देणगीदारांचे समर्थ आर्थिक पाठबळ यांचे जोरावर मंडळाची आगेकूच सुरु आहे. सन २००४ ते २००६ या वर्षात भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथिल नुतन इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वानंतर डिसेंबर २००९ मध्ये मुटाट येथील मुख्य हायस्कूल इमारतीच्या बाजूला नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. परत एकदा मंडळाचे सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. अल्पस्वल्प देणगी स्वत:पासून जमा करायाला सुरुवात केली आणि हा हा म्हणता कार्यकर्त्यांनी लाखों रुपयांचा निधी बांधकामासाठी जमा केला. या सर्वांच्या समर्थ पाठबळाच्या जोरावर मुटाट येथील नुतन इमारत मार्च २०१२ अखेर बांधून पूर्ण झाली. आजपर्यंत सर्व अडथळे, अडचणी आणि समस्यांवर मात करीत पंचक्रोशीच्या शैक्षणिक विकासासाठी कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालय जुलै २०१३ पासून सुरु केले आहे त्याचा लाभ मुटाट परिसरांतील सर्व विद्दयार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करुन या विस्तारीत वाटचालीची सांगता करीत आहोत

आमच्या सर्व सभासदांचे, हितचिंतकांचे, सन्माननीय देणगीदारांचे, ग्रामस्थांचे, आजीमाजी विध्यार्थ्यांचे मनापासून आभार:

शालांत परीक्षेतील उल्लेखनीय यशाची चढती कमान:

मार्च 2009 पासून शालान्त परीक्षेचा हायस्कूलचा निकाल खालील प्रमाणे लागला.

मार्च 2009   :   75.49 टक्के
मार्च 2010   :   88.23 टक्के
मार्च 2011   :   81.30 टक्के
मार्च 2012   :   92.14 टक्के
मार्च 2013   :   89.60 टक्के
मार्च 2014   :   97.60 टक्के
मार्च 2015   :   95.15 टक्के

स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ: कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या प्रथम बॅचने (फेब्रुवारी २०१५) उच्च माध्यमिक
शालान्त परीक्षेत मिळविले नेत्रदिपक यश:
डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल-स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या विद्यार्थ्यांनी
फेब्रुवारी-मार्च२०१५ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत पदार्पणातच ९६.६१ टक्के एवढे नेत्रदिपक यश
मिळविले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पदार्पणातच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला.

महत्वाच्या कार्यक्रमांची नोंद आणि उल्लेखनीय घडामोडी:

दिनांक ०३ जानेवारी २०१३ रोजी हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले.

दिनांक २७ डिसेंबर २०१४ रोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविध्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले. या पारितोषिक वितरण समारंभात, निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांचे शुभहस्ते मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला.
website: www.mpspm.org.

मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी ‘झेप’ स्मरणिकेत सादर केलेली मंडळाच्या आणि हायस्कूलच्या गेल्या छपन्न वर्षातील वाटचालीची महत्वाची संक्षिप्त माहिती अद्ययावत करुन सर्वांच्या कायम स्मरणात राहावी यासाठी वेबसाईटवर सादर करण्यात आली आहे.

सन 2014-15 या वर्षी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल-स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत पदार्पणात ९६.६१ टक्के एवढे नेत्रदिपक यश मिळविले. या यशाबद्दल मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या तमाम सभासदांच्यावतीने सर्व यशस्वी विध्यार्थी आणि विध्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

मंडळाने शालेय पोषण आहार खोलीच्या बांधकामाच्या खर्चाची स्वनिधीची तरतूद केली आणि आराखड्याप्रमाणे बांधकाम
सुरु होऊन पूर्ण झाले.

दिनांक २९ डिसेंबर २०१५ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष म्हणून फणसगांव पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सहदेव नारकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुवर्ण कोकणचे संस्थापक श्री सतीश परब यांच्याबरोबर डॉ.राजेंद्र मुंबरकर,श्री सतिशजी जागुष्टे, श्री विजय पांगम, श्री अनंतजी राणे,श्री नरेंद्र पावसकर इत्यादि सन्माननीय पाहुणे आणि सर्वश्री विश्वासराव पाळेकर, शिवाजी राणे, सुभाषचंद्र परांजपे, अच्युतराव राणे, मुरलीधर राणे, किशोर प्रभू, राजेश राणे, विवेक केळकर आणि रघुनाथ पाळेकर हे कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंडळाच्या शैक्षणिक विस्तारातील उद्देश्यपूर्तीचे ऊल्लेखनीय यश – कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी:

शासन निर्णय क्र.स्वयं अ/2013/885/13 माशि-1 चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली. मंजुरीनुसार मंडळाने शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून मुटाट येथे दर्जावाढ कला आणि वाणिज्य (प्रस्तावित नांव: सौ. जानकी शिवराम राणे) कनिष्ठ महाविद्दयालय सुरु केले. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक 3 जुलै 2013 रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे (श्री नाना राणे) यांचे हस्ते, कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलमध्ये दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी पार पडलेल्या संयुक्त सभेत चर्चा केल्यानुसार मंडळाने प्राधान्य कामांसाठी निधी मिळविण्यासाठी खटपट करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे यांनी त्यांचे बंधू श्री धनंजय परांजपे यांच्याद्वारे मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचेशी संपर्क साधून मंडळाच्या प्राधान्य कामांना निधी मंजूर करण्याची विनंती (दिनांक 30 डिसेंबर 2015 च्या अर्जाने) केली. मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी . असोसिएशन यांनी मंडळाच्या विनंती अर्जास आश्वासक प्रतिसाद देत मुलींच्या स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी आणि ईलेक्ट्रिक फिटिंगसाठी सत्वर पुरेसा निधी मंजूर केला.

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण:

मंडळाचे आद्य संस्थापक डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्ध पुतळ्याची विश्वस्त श्री.अनंतराव लेले आणि कार्यकारी समिती सदस्य डॉ. श्रीम. हेमलता पुरंदरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आग्रहाची मागणी होती. सर्वांच्या उस्फूर्त सहभागाने, सर्व सूचनांचा विचार करुन, कार्यकारी समिती आणि स्थानिक समितीने हायस्कूलमध्ये झालेल्या दिनांक ३०डिसेंबर २०१५ च्या संयुक्त सभेत अर्ध पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याच सभेत पुतळा स्थापनेची जागा निश्चित करण्यासाठी सभेपुढे आलेल्या अनेक प्रस्तावांचा विचार करण्यात येऊन सर्व सदस्यांच्या सहमतीने प्रत्यक्ष पाहाणी करुन मुख्याध्यापक कक्ष आणि वरिष्ठ लिपिक कक्ष यांच्या मधील हॉलकडे असणार्‍या भिंतीवरील मध्यवर्ती जागेची सर्वमान्यतेने निवड करण्यात आली. वरील सभेच्या निर्णयाप्रमाणे डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या जन्मदिनी दिनांक १ मार्च २०१६ या दिवशी मा. जनार्दन तेली यांचे शुभहस्ते अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ह्रद्य प्रसंगी मोठ्या संख्येने सभासद आणि ग्रामस्थ हजर होते.

सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन:

मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलातील सांस्कृतिक भवनास मंजूर झालेल्या निधीतून सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 19 मार्च 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा.साळसकर, श्री जगन्नाथ लेले, श्री शामराव लेले,श्री शिवाजी राणे,श्री प्रकाश भेकरे,श्री विजय चिरपुटकर,श्री सिताराम प्रभू, श्री प्रशांत खरबे, श्री मनोहर तेली, मधुकर घाडी,सरपंच श्री किरण प्रभू यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते.

स्वच्छतागृहांचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक फिटिंगचा शालार्पण कार्यक्रम:

दिनांक 28 मार्च 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा, पाणी शुध्दिकरण यंत्राचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक फिटिंगचा शालार्पण सोहळा, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम. एल.पी. असोसिएशन यांचे मान्यवर प्रतिनिधीं श्री टी व्ही शहा, श्री एस व्ही खोले, श्री भावेश छोटालिया, श्री बिजल शहा, श्री किशोर मर्चंट आणि श्री धनंजय गणेश परांजपे यांच्या हस्ते, मंडळाचे सभासद, आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.

देणगीदार संस्था प्रतिनिधींचे मंडळाचेवतीने हार्दिक स्वागत करुन शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छतागृहांचा शालार्पण सोहळा कार्यकारी समितीचे पदाधिकारी श्री सुभाषचंद्र परांजपे,श्री शिवाजी राणे, श्री अरुण राणे, स्थानिक समिती सदस्य श्री बळवंतराव राणे,शाळा समिती सदस्य,महिला समिती सदस्य,मुटाट संरपंच श्री किरण प्रभू, उप-सरपंच पाळेकरवाडी श्री गोपाळ पाळेकर ,इंजिनिअर नेने आणि गोगटे, अन्य मान्यवर ग्रामस्थ, डॉ.श्री.र.लेले हायस्कूल आणि स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालायाचे मुख्याध्यापक-प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला.

शालांत परीक्षेतील उल्लेखनीय यशाची चढती कमान:

गेल्या वर्षी शालान्त परीक्षेचा हायस्कूलचा निकाल खालील प्रमाणे लागला.

  • मार्च २०१६  :  ९७.५८ टक्के
  • मार्च २०१७  :  ९५.७४ टक्के

स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ: कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाने उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत मिळविले नेत्रदिपक यश:

  • फेबब्रुवारी २०१६ :   ९१.९४ टक्के
  • फेब्रुवारी २०१७   :   ९८.११ टक्के

कला शाखा: निकाल ९६.९६ टक्के

उल्लेखनीय बाब म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला.

मंडळाच्या दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेने स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाचे कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट असे नामकरण करणारा ठराव पारीत केला आहे. सदर नामकरण ठराव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या शिफारसीसह मा.शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या मंजुरीसाठी दाखल केला होता त्यास यांनी त्यांच्या पत्र जा.क्र.३/कोवि/क.म.ना.ब/२०१७ दिनांक २८ ऑगस्ट २०१७ द्वारे मंजुरी दिली आहे.

सन २०१६/१७ ते २०१७/१८ या काळात डॉ.श्रीम.हेमलता माधव पुरंदरे (लेले) विद्यासंकुलात केलेल्या विविध विकास कामांची माहिती.

  1. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलातील सांस्कृतिक भवनाचे बांधकाम मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या रु.पाच लाखाच्या निधीत मंडळातर्फे सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजाराची भर टाकून पूर्ण झाले आहे.
  2. विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम : दिनांक २८ मार्च २०१६ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा शालार्पण सोहळा पार पाडताना, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे वतीने मान्यवर प्रतिनिधीं श्री धनंजय गणेश परांजपे यांनी विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकामासाठी निधी जाहीर केला होता त्यानुसार विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले. मंडळाच्या दिनांक ०६.०१.२०१७ रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर सन्माननीय पाहुणे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पारितोषिक विजेते श्री पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा शालार्पण सोहळा सभासद आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
  3. पोषण आहार किचन शेडचे बांधकामासाठी संस्थेने रु. १लाखाचेवर स्वनिधी खर्च केला असून बांधकाम पूर्ण झाल्याने दिनांक ०६.०१.२०१७ च्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर शेडचा वापर सुरु करण्यात आला.
  4. मोडकळीस आलेल्या अल्पबचत हॉलचे निर्लेखन पूर्ण झाले. या निर्लेखन कामाच्या मंजुरीतून कॉलेज इमारतीकडे जाण्यासाठी सुमारे १२० फूट लांबीचा व्हरांडा पूर्ण करण्यात आला.
  5. मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार,डॉ. श्री.र.लेले यांचे पुतळ्याखालील मागील प्रवेशद्वार तसेच कॉलेज इमारतीत जिन्याजवळ सरकती संरक्षक दारे( कोलॅप्सिबल गेट) बसविण्यात आले.
  6. बायोमेट्रीक सिस्टिम आधारीत कर्मचारी हजेरीपत्रक मुटाट येथे कार्यान्वित आहे.
  7. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या आरंभापासून दोन डिजटल वर्ग सुरु झाले आहेत.
  8. हायस्कूल आणि कॉलेज इमारत परिसरावर चार सी. सी. टी. व्ही. कॅमेर्‍यांची निगरानी सुरु झाली आहे.
  9. हायस्कूल आणि कॉलेज वर्गांसाठी व्हाईट बोर्ड घेण्यात आले आहेत.

वरील कामे पूर्ण करण्यासाठी मंडळाने आर्थिक मदतीसाठी मे.अँक्वा बनेव्हलंट फंड, मुंबई यांजकडे अर्जविनंती केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या देणगी निधीतून अनेक कामे पूर्ण करण्यात आली. ट्रस्टचे मान्यवर विश्वस्त/प्रतिनिधी श्री धनंजय गणेश परांजपे आणि त्यांचे सहकारी यांच्या आत्मीयतेबद्दल आणि भरघोस मदतीबद्दल मंडळ कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २०१७:

मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाचे स्नेहसंमेलन दिनांक २२ व २३ डिसेंबर २०१७ रोजी पार पडले.पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर]आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय, गारगोटी व संचालक श्री.मौनी विध्यापिठ गारगोटी हे उस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

या सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासराव पाळेकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांस उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, श्री.शिवाजी राणे कार्यवाह श्री.सुभाषचंद्र परांजपे आणि इतर पदाधिकारी सर्वश्री रघुनाथ पाळेकर,जितेंद्र साळुके,डॉ.विनय केळकर, सौ. गीता सोवनी आणि सर्व स्थानिक कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आकर्षक पध्दतीने आणि आनंदी वातावरणात सादर केले. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले-

शालान्त परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील उज्वल यश :

  1. डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल आणि कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथिल मार्च २०१८ मध्ये पार पडलेल्या शालांत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९४.६१ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
  2. स्वयंअर्थसहाय्यित सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.२२ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. उल्लेखनीय बाब म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला.

पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २०१८:

दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. व डॉ. घन:शाम भि. काळे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्वश्री विजय पांगम आणि अच्युतराव राणे यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. उपाध्यक्ष श्री धनंजय परांजपे, उपाध्यक्ष श्री शिवाजी राणे, कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे, कार्योपाध्यक्ष श्री जितेद्र साळुंके, कोषाध्यक्ष श्री संजय टाकळे, सहकोषाध्यक्ष डॉ.विनय केळकर, सहकार्यवाह श्री रघुनाथ पाळेकर, सल्लागार श्री किशोर प्रभू, सल्लागार श्री बाळकृष्ण पाळेकर यांच्यासह कार्यकारी समितीचे सभासद सौ. गीता सोवनी आणि श्री अरविंद ठाकुरदेसाई उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिनांक २७ डिसेंबर २०१८ रोजी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांच्या आकर्षक सादरीकरणाने आनंदी वातावरणात पार पडला. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.

शनिवार दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाचे सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. दिपकभाई केसरकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास अरुण दुधवडकर, इतर मान्यवर, संस्थाचालक आणि ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०१९- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : डॉ.श्रीधर रघूनाथ लेले हायस्कूल मुटाट कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचेसह आणि खास बाब म्हणून शिक्षण खात्याच्या मान्यतेने डॉ.श्रीधर रघूनाथ लेले हायस्कूलमधून यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डेसह मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८९.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचे वैशिष्ट्य  म्हणजे अभ्यासक्रम- परीक्षा निकष बदल यशस्वीपणे आत्मसात करून  विध्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे.

उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : स्वयंअर्थसहाय्यित सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयातील फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.२४ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. उल्लेखनीय बाब म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल सलग पाचव्यांदा १०० टक्के लागला.

स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०१९ समारोह :  मंडळाचे अध्यक्ष श्री  विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते विधीवत ध्वजारोहन झाले. या प्रसंगी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्गवार राष्ट्रभक्ती गीते आणि शौर्यगीते उत्तम प्रकारे सादर केली. निवडक  पारितोषिके आणि शिष्यवृत्त्यांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या  रानभाज्या आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते करण्यात आले. 

मंडळाची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९: मंडळाच्या सर्व सभासदांची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,मुटाट, ता.देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, ४१६८०३ येथे  आयोजित करण्यात आली होती. सभेस मंडळाचे एकूण ४० सभासद हजर होते. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्त साधून आयोजित पर्ण फुले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांनी केले.

४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ : डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयात दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत देवगड तालुकास्तरीय ४५ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित  करण्यात आले. सदर प्रदर्शनात देवगड तालुक्यातील १२८ प्राथमिक शाळा आणि हायस्कूलांनी भाग घेतला होता.

पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ सन २०१९-२०२० : दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री. सदानंद वामन पवार ( उपाध्यक्ष ,देवगड एज्यु. बोर्ड ), सन्माननीय पाहुणे म्हणुन श्री. अशोक मनोहर देसाई,सौ. आकांक्षा अशोक देसाई आणि श्री रमेश रामचंद्र भिडे उपस्थित होते. त्याचबरोबर  सर्वश्री विजय पांगम आणि अच्युतराव राणे या  मान्यवरांची  उपस्थिती लाभली. उपाध्यक्ष श्री धनंजय परांजपे, उपाध्यक्ष श्री  शिवाजी राणे, कार्यवाह श्री सुभाषचंद्र  परांजपे, कार्योपाध्यक्ष श्री जितेद्र साळुंके, सहकोषाध्यक्ष डॉ. विनय केळकर,  सहकार्यवाह श्री रघुनाथ पाळेकर, सल्लागार श्री बाळकृष्ण पाळेकर,डॉ.दिलिप पाळेकर यांच्यासह  कार्यकारी समितीचे सभासद सौ. गीता सोवनी आणि श्री अरविंद ठाकुरदेसाई उपस्थित होते. स्थानिक समिती सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसह सर्वांनी सहभोजनाचा लाभ घेतला. 

दिनांक २८ डिसेंबर २०१ रोजी दुपारी स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांच्या आकर्षक सादरीकरणाने आनंदी वातावरणात पार पडला. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. तालुका व जिल्हा स्तरावर बक्षिसे मिळविलेल्या नृत्य प्रकारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात  करमणुकीच्या कार्यक्रमांचे स्वागत केले.

उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा- फेब्रुवारी/मार्च २०२०- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : स्वयंअर्थसहाय्यित कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ट महाविद्दयालयाचे फेब्रुवारी- मार्च २०२०मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ९७.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.                 

माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०२०- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट आणि कै.भाऊसाहेब काळे भागशाळा,मणचे येथिल मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसलेले  ९८.९७ टक्के विद्यार्थ्यीं उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर आपल्या हायस्कूलमधून माध्यमिक शालांत परीक्षेला बसलेल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापार्डे येथिल विद्यार्थ्यांनीही परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. (एकत्रित टक्केवारी ९८.४१).