26 डिसेंबर 2017
सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनीनो!
सप्रेम नमस्कार.
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीची बिनविरोध निवड केल्याबद्दल जाहीर आभार:
महोदय/महोदया, आपल्या एकमुखी भक्कम पाठिंब्यामुळे मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि आठ संचालक मिळून अकरा सभासद बंधु-भगिनींची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल आपणां सर्वांचे मनापासून आभार. आपण आमच्यावर दाखविलेल्या शतप्रतिशत विश्वासामुळे कार्यकारी समितीला पुढील पाच वर्षे मंडळाची सेवा करण्याची सुसंधी मिळाली आहे. या जाहीर प्रकटनाद्वारे आम्ही मंडळाच्या समस्त सभासद बंधु-भगिनींना आश्वस्त करतो की मंडळ संचालित डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल (भागशाळेसह) आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विद्यमान गरजा लक्षात घेऊन पारदर्शी कारभार करण्याचा निश्चित प्रयत्न करू.
सुवर्णमहोत्सव पश्चात पुढील वाटचाल दमदारपणे करणार्या मंडळाच्या उद्यिष्टांतर्गत पंचक्रोशीतील विद्दयार्थ्यांसाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी गांवातच निर्माण करण्याच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिलेल्या आमच्या पूर्वसुरींच्या कार्याची परंपरा खात्रीने पुढे नेण्याचा आम्ही जरुर प्रयत्न करु याची कृतज्ञतापूर्वक ग्वाही देतो.
आपले अखंड सहकार्य, विश्वास आणि सन्माननीय देणगीदारांच्या भक्कम पाठबळाने मुटाट परिसराचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी तुमची नवनिर्वाचित कार्यकारी समिती आटोकाट प्रयत्न करेल. मंडळाच्या कार्यकक्षेचा विस्तार करताना सभासदांकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे उत्साहवर्धक यश मिळाले असून ते निश्चित तुम्हां-आम्हां सर्वांचे आहे.
१९६२ साली स्थापना झालेल्या मंडळाचे संवर्धन करुन त्याचा विस्तार करण्यासाठी गेल्या पंचावन्न वर्षांत समस्त सभासद, सन्माननीय देणगीदार, शिक्षणप्रेमी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा हातभार लागला आहे. या सगळ्यांचे ऋण शिरी घेऊन,त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर मंडळाच्या पुढील वाटचालीत ध्येयधोरणांची, उपक्रमांची आणि संकल्पांची यशस्वी कार्यवाही करण्याची ग्वाही कार्यकारी मंडळाच्यावतीने आपणांस देत आहे.
सर्वांचे परत एकदा मन:पूर्वक आभार. सर्वांना उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य, सुख आणि समृध्दी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
मुटाट पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळाकरिता
(विश्वासराव रामचंद्र पाळेकर)
अध्यक्ष