माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करण्याची गरज
निसर्गरम्य कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या देवगड तालुक्यातले मुटाट हे एक आडवळणी खेडेगांव. कोकण रेल्वेवरील वैभववाडी स्थानकाच्या आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गाच्या तरेळे स्थानकाच्या पश्चिमेला विजयदूर्गला जाणार्या मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विसावलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे गांव. माथ्यावर जांभळ्या दगडाचा ऐसपैस सडा आणि पायथ्याशी विजयदूर्ग खाडीचा रम्य परिसर. भातशेतीच्या वाफ्यांच्या अवतीभवती डोंगरदर्यांतून जोपासलेल्या हापुस आंब्याच्या बागा, रायवळ आंब्यांच्या राया आणि सर्वत्र हिरवीगार वनराई. खाडीकिनारी आणि वाड्यावाड्यांमधून डोकावणारी माडाची बने. आंबा, फणस, काजू, रातांबे, चिक्कू सारख्या कोकणी मेव्याची हंगामानुसार रेलचेल. असे निसर्गसमृद्धीचे लेणे लेवून हाकेहाकेच्या अंतरावर वसलेल्या मोवळवाडी, गयाळवाडी, भट(ब्राह्मण)वाडी, प्रभुवाडी, बौध्दवाडी, घाडीवाडी, राणेवाडी, वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या १० वाड्यांमधून वास्तव्य करीत असलेली सुमारे ४००० ची लोकवस्ती. लोक व्यवसायाने शेतकरी व शेतमजूर. दुकानदार,व्यापारी वा इतर व्यवसायिक त्या मानाने विरळच. आंबा व्यापार करणार्यांची हल्ली सधन व्यवसायिकांत गणना होऊ लागली आहे.
संस्थापक मंडळ - १९६२
मुटाट गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काचतज्ञ व कोकणातल्या कांही शिक्षण संस्थांशी निगडीत असलेले डॉ. श्रीधर रघुनाथ लेले,M.Sc.Ph.D. यांना भेटून आपला विचार या मंडळीनी त्यांच्या कानावर घातला. गांवातच माध्यमिक शाळा सुरु करण्याची कल्पना, शाळेची गरज कशी व किती आहे हे स्वानुभवावरुन पटल्यामुळे डॉक्टरांना एकदम मान्य झाली व ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन देण्यांचे त्यांनी तात्काळ मान्य केले.
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पाठिंबा मिळणार म्हटल्यावर संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यावर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुटाट या संस्थेची स्थापना होऊन तिची आवश्यक असलेल्या सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली. या कामी ज्या प्रमुख व्यक्तींनी विषेश खटपट केली त्या व्यक्ती होत्या डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, सर्वश्री विष्णु सखाराम मराठे ,सावळाराम जनार्दन परांजपे, जगन्नाथ दामोदर लेले, भिकाजी धोंडो चिरपुटकर, भिकाजी विश्राम घाडी,गोपाळ लक्ष्मण पाळेकर,भालचंद्र चिंतामण लेले, शिवराम वामन लेले, केशव राजबा राणे, अनंत ध्यानबा पाळेकर, श्रीपाद रामकृष्ण लेले,धोंडो नारायण परब, गुंडो सखाराम कांबळे,भिकाजी गणेश सोवनी,रामचंद्र गोविंद पुजारी, दौलत संभाजी राणे, शांताराम सखाराम पाळेकर आणि पांडुरंग केशव पाळेकर.