Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

प्रस्तावना

!! सुस्वागतम !!

सन्माननीय सभासद,देणगीदार,ग्रामस्थ बंधु-भगिनी आणि माजी विद्यार्थी मित्रांनो!

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या सन २०११-१२ या सुवर्णमहोत्सवी वर्षात साजरा झालेल्या नेत्रदिपक सांगता समारंभानंतर वर्षभरातच मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या वेबसाईटचा शुभारंभ केला होता.

वेबसाईटच्या शुभारंभी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी झेप स्मरणिकेत प्रकाशित मंडळाच्या आणि हायस्कूलच्या १९६२ ते २०१२ या पन्नास वर्षातील वाटचालीचा संक्षिप्त लेखाजोखा वेबसाईटवर सादर केला होता. सुवर्णमहोत्सवा नंतरच्या वाटचालीत मंडळाने अनेक उद्दिष्टांची पूर्तता करीत महत्वपूर्ण यश मिळवले असल्याने वेबसाईटवरील माहितीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. आपण या अद्ययावत माहितीपटाला भेट दिल्यास आपणास अद्यतन माहिती उपलब्ध होऊ शकेल.मंडळाच्या अनेक उपक्रमांबद्दलची माहिती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून आपले अभिप्राय, प्रतिक्रिया आणि सूचना अपेक्षित आहेत.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेने पंचक्रोशीतील ग्रामिण विद्दयार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची सोय गांवातच करण्याच्या हेतूने प्रेरीत आदरणीय पूर्वसुरींच्या कार्याची आणि प्रगतीशील वाटचालीची सुवर्ण महोत्सवी वर्षाप्रसंगी अल्पशी ओळख करुन दिली होती. नुतन वेबसाईटव्दारे मंडळासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या काही खास व्यक्तींची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला आहे तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा. त्याचबरोबर मंडळाबद्दल आत्मीयता बाळगणार्‍या आणि मंडळासाठी सचोटीने कार्य केलेल्या अनेक व्यक्तिंच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.

मंडळाच्या उद्दिष्ट पूर्तता वेळापत्रकाचा पाठपुरावा करताना मंडळ संचालित डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे या शैक्षणिक आस्थापनांमध्ये भर घालून सन २०१३-१४ पासून शासनमान्य कै. सौ.जानकी शिवराम राणे कला वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय मुटाटला सुरू केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयामुळे मुटाट परिसरातील अनेक विध्यार्थ्यांना त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण करणे शक्य झाले आहे.

शासनाच्या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या विशाल युगाला सामोरे जाण्यासाठी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल- कै.भाऊसाहेब काळे भागशाळा आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती वेबसाईटमध्ये अद्ययावत करुन सादर केली आहे.

आमच्या सर्व सभासदांनी व कार्यकर्त्यांनी बरोबरीचा वाटा उचलून मंडळाच्या जडणघडणीत कार्यकारी समितीला मोलाची साथ, आश्वासक सहकार्य आणि अखंड पाठबळ दिले त्याबद्दल सर्वांचे जाहीर ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर हिचिंतकांनी आणि सन्माननीय देणगीदारांनी दिलेल्या देणग्यांमुळे ज्ञानदानाच्या सोयी ग्रामिण भागात रुजविण्याचे अवघड कार्य पार पाडता आले ही भावना प्रामाणिकपणे सर्वांपर्यंत पोचविणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

मुटाट विद्यामंदिर मुटाट या नावाने १९६२ च्या जूनमध्ये सुरु केलेल्या इयत्ता आठवीपासून ते आजच्या डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा, आणि कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय ही आस्थापने नावारुपाला येण्यात आमच्या शिक्षक व शालेय कर्मचारी वर्गाचा महत्वपूर्ण हातभार लागलेला आहे. या सर्वांचे कष्ट आणि अखंड मेहनतीमुळे हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची उत्तम शैक्षणिक प्रगती होऊन सुमारे ६६० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

मुटाट पंचक्रोशीच्या ग्रामिण परिसरात १९६२ साली रुजविलेल्या या रोपट्याचे आज विशाल वृक्षात रुपांतर झाल्याचे पाहाताना आमच्या सभासदांना नक्की कृतकृत्य वाटेल. माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाच्या जोडीने विद्दार्थ्यांची सर्वांगीण प्रगती, संगणक प्रशिक्षण,जिल्हा,राज्य व देश पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षातील सहभाग आणि त्यांनी मिळविलेले यश वाखाणण्यासारखे आहे. या यशस्वी वाटचालीत मंडळाचे समस्त सभासद, सन्माननीय देणगीदार, शिक्षणप्रेमी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा हातभार लागला आहे. या सगळ्यांच्या साथीने पुढील वाटचालीत मंडळाच्या उपक्रमांची आणि संकल्पांची यशस्वी कार्यवाही करण्याची ग्वाही देतो. मंडळाच्या माहितीजालावरील माहिती आमच्या सर्व दर्शकांना माहितीपूर्ण वाटो आणि सर्वांचा संस्थेला वरदहस्त मिळो अशी प्रार्थना करुन सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.

आपला नम्र

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकरिता
विश्वासराव रामचंद्र पाळेकर
अध्यक्ष