सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने सुमारे ६० वर्षांपूर्वी (सन १९६०-६१ पूर्वी) मुटाट गांव मागासच होता. शासकीय धोरणानुसार त्यावेळी गांवात इयत्ता ७ वी पर्यंत शिक्षण देणारी एक आणि ४ पर्यंत शिक्षण देणारी एक अशा दोन प्राथमिक शाळा होत्या. इंग्रजी शिक्षणाची सोय खुद्द गावातच नव्हे तर पंचक्रोशीतही नव्हती.त्यासाठी मुटाटच्या विध्यार्थ्यांना लांबच्या शहरात किंवा तालुक्याच्या गांवी जावे लागत असे. पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना स्थलांतर करणे शक्य नव्हते त्यांना नाईलाजाने शिक्षण सोडून द्यावे लागत असे. त्यातच बहुतांशी पालक अशिक्षित, गरीब शेतकरी वर्गातील असल्याने पाल्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ अभावानेच आढळायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाचे वाढते महत्व व उपयुक्तता यांची जाणीव झाल्याने मुटाटच्या विध्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर करावी व त्यांना गावातच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त विचाराने १९६०-६१ च्या दरम्याने काही खटपटी मुटाटकर मंडळी एकत्र आली. एका नवीन उत्साहाने ही मंडळी भारावली होती.काहीतरी भरीव कामगिरी करावी अशी जबर इच्छा मनी बाळगून होती. एकमेकांच्या कल्पना जाणून घेऊन परिस्थितीनुरुप विचार विनिमय करून मुटाट गांवातच माध्यमिक शाळा सुरु करावी असा निर्णय या प्रागतिक विचारवंतानी केला.
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुटाट या संस्थेची स्थापना होऊन तिची आवश्यक असलेल्या सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली. अशा रितीने या खास कोकणी खेड्यात साठ वर्षांपूर्वी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामिण विद्दयार्थ्याना उपलब्ध करुन दिली.
मंडळाचे उद्देश:
- सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील मुलामुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करणे.
- त्याच भागांतील रहिवाश्यांच्या तांत्रिक, कृषिविषयक व वाणिज्य विषयक माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे.