मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची तारीख २९ में १९६२ रोजी स्थापना झाल्यावर त्याच वर्षी तारीख ११ जून १९६२ पासून मंडळाच्या मुटाट विद्यामंदिर मुटाट या शाळेचा इयत्ता ८वी चा एक वर्ग सुरु करण्यात आला. शुभारंभाच्या इयत्ता ८वी च्या वर्गात पटावर एकूण २९ विद्यार्थी-विद्यार्थीनी होते. त्या नंतर पुढील प्रत्येक वर्षी एक इयत्ता अशा क्रमाने, जून १९६५ मध्ये इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु झाला. मार्च १९६६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेला मुटाट विद्या मंदिराची पहिली तुकडी बसली. शालांत परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.अश्याप्रकारे माध्यमिक शाळा सुरु करण्याचे एक लक्ष पुरे झाले.
प्रारंभी म्हणजे जून १९६२ पासून एका तात्पुरत्या तयार केलेल्या कच्च्या जागेमध्ये हायस्कूलचे वर्ग भरत होते. प्राथमिक शाळेची जागासुध्दा वर्गासाठी वापरण्यात आली. परंतु कामचलाऊ व्यवस्थेऐवजी चिरकालीन व्यवस्था असणे इष्ट आहे,असा विचार करुन मंडळाने गावांत शाळेसाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला.
शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीसाठी प्रशस्त व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेची शोधाशोध सुरु झाली. शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसण्या-या घाडी आणि साळुंके या शेतकरी कुळांनी व श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू या मालकांनी स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली. घाडी आणि साळुंके शेतकरी बांधवांचा तसेच जमीनचे मालक श्री गणूकाका परांजपे आणि प्रभूबांधवांचा त्याग मंडळासाठी
अनमोल आहे.
इमारत बांधण्याच्या दृष्टीने १९६३ च्या डिसेंबर महिन्यांत इमारत बांधकाम शास्त्र विषयक तज्ञांनी जागेची पाहणी केली.आराखडे तयार करुन दिले. हे तज्ञ मुंबईहून मुटाटला आले होते. कंत्राटदार त्यावेळी गावात उपलब्ध नव्हता, म्हणुन मुंबईच्या एका प्रख्यात कंत्राटदारावर बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली.बांधकाम साहित्य, मजूर, यंत्रसामुग्री वगैरे मुंबईहून रवाना झाली.ग्रामस्थांच्या सहकार्याने व श्रमदानाने आणि शहरी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बांधकामाला सुरुवात झाली व शीघ्र गतीने साधारणत: १९६५ च्या मध्यास २०३ फुट लांब व २८ फुट रुंद या आकाराची सुंदर,टुमदार,पाहताक्षणी जिची भव्यता नजरेत भरुन येईल अशी एक चिरेबंदी इमारत, भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ येथे दिमाखाने उभी राहिली.सरस्वतीच्या उपासनेचे मंगल मंदिर तयार झाले.तारीख १९ जुलै १९६५ पासून या ज्ञानमंदिरात मुटाट विद्दया मंदिराचे वर्ग भरु लागले.