मणचे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला श्री.गजानन सिताराम मेस्त्री यांच्या मालकीच्या सर्वे नं.१२,पोट हिस्सा नं.६ क्षेत्र ०-१६-४ या सुमारे १६ गुंठे क्षेत्राचा भुखंड भागशाळा शाळा इमारतीसाठी निवडण्यात आला. भुखंड खरेदीसाठी झालेल्या रुपये ६०,००० च्या खर्चातील रुपये ४०,०००/- देणगी रुपाने श्रीमती नलिनी केशव गोखले यांचेवतीने मंडळास मिळाले.
मणचे येथील नूतन इमारतीस कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे भागशाळा हे नाव देण्याच्या अटीवर मूळ मणचेकर काळे कुटुंबीयांनी शैक्षणिक कार्याच्या पूर्ततेसाठी मंडळास एकरकमी रुपये पांच लाख देणगी देण्याचे मान्य केले. शुभारंभाच्या देणगीमुळे मंडळास कार्यकर्त्यांकरवी उर्वरीत रक्कम उभी करता आली. मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश घाटे यांनी वालचंद ट्रस्ट यांचेकडून घसघशीत २.७५ लाख रुपयांची विनाअट देणगी मिळविली. देणग्या देण्यात मणच्याचे गोखले,ठाकुरदेसाई,मणचेकर इत्यादी मणचे ग्रामस्थांबरोबर मुटाटकरही मागे राहिले नाहीत.
भागशाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ दिनांक १० जानेवारी २००४ रोजी श्री नारायणराव दिवेकर भागीदार समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई, यांचे अध्यक्षतेखाली मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर कार्योपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजन होऊन झाला. श्री नारायणराव दिवेकर यांचे शुभ हस्ते शिलान्यासाचा चिरा बसविण्यात आला. या सोहळ्यास सर्वश्री वि.स.मराठे, ज.दा.लेले,अच्युत राणे,शिवाजी राणे,विनायक कृष्णाजी लेलें सह मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेली पाहुणे मंडळी, स्थानिक समितीचे सभासद, कार्यकर्ते, माननीय श्री.बापुसाहेब गोखले,श्री.अरविंद ठाकुरदेसाई यांचेसह मणचे ग्रामस्थ आणि मणचे ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. नियोजित बांधकामासाठी मुटाटचे श्री सुरेश रायकर यांना कंत्राट देण्यात आले.
भागशाळेची सुंदर आठ वर्ग खोल्यांची नूतन इमारत मे २००५ मध्ये बांधून पूर्ण झाली. दिनांक १२ जून २००५ रोजी डॉ. राम काळे, डॉ.घन:श्याम काळे यांचे शुभ हस्ते भागशाळा इमारतीचा दिमाखादार उद्घघाटन सोहळा झाला.तसेच वर्ग खोल्यांना देणग्या देणा-या देणगीदारांच्या हस्ते खोल्यांच्या नामकरन फलकांचे अनावरण करण्यात आले. मंडळाच्या वाटचालीतील ही एक अभिमानास्पद घटना आहे. दिनांक ८ ऑगस्ट २००६ पासून नवीन इमारतीत भागशाळेचे (इयत्ता ८ वी ते १०) वर्ग भरु लागले.