Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

आमची हीरक महोत्सवी वाटचाल

आमची हीरक महोत्सवी वाटचाल

       आमची हीरक महोत्सवी वाटचाल

 

          सन्माननीय सभासद, हितचिंतक, देणगीदार आणि  पंचक्रोशीतील ग्रामस्थ जन हो! मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलने सन २०२१/२२ हे  हीरकमहोत्सवी वर्ष, अनेक संस्मरणीय कार्यक्रम आयोजित करुन उत्साहाने साजरे केले. या हीरकमहोत्सवी वर्षाच्या संस्मरणीय सांगता सोहळ्याप्रसंगी आपल्याशी हितगुज साधताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सन १९६२ साली  स्थापना झालेल्या मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने मुटाट, पाळेकरवाडी, मणचे, वाघोटण, सडे वाघोटण, सौंदाळे, पेंढरी, बापर्डे, मालपे, कुंभवडे, हर्चिली, तारळ यासह अनेक खेड्यांतील विद्यार्थ्यांना आजपर्यंत, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या माध्यमातून पायाभूत माध्यमिक शिक्षण दिले आहे. सन १९६२ मधील असंख्य अडचणींवर मात करत शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामिण विद्दयार्थ्यापर्यंत पोचविणार्‍या आमच्या मंडळाची आणि पूर्वसुरींच्या कार्याची, हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने अल्पशी ओळख करुन देण्याचा आमचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा अशी विनंती करुन वाटचालीचे लेखांकन सुरु करतो.

        निसर्गरम्य कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या देवगड तालुक्यातले मुटाट हे एक आडवळणी खेडेगांव. कोकण रेल्वेवरील वैभववाडी स्थानकाच्या आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गाच्या तरेळे स्थानकाच्या पश्चिमेला विजयदूर्गला जाणार्‍या मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विसावलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे गांव. माथ्यावर जांभळ्या दगडाचा ऐसपैस सडा आणि पायथ्याशी विजयदूर्ग खाडीचा रम्य परिसर. भातशेतीच्या वाफ्यांच्या अवतीभवती डोंगरदर्‍यांतून जोपासलेल्या हापुस आंब्याच्या बागा, रायवळ आंब्याच्या राया आणि सर्वदूर पसरलेली हिरवीगार वनराई. खाडीकिनारी आणि वाड्यावाड्यांमधून डोकावणारी माडाची बने. आंबा, फणस, काजू, रातांबे, चिक्कू सारख्या कोकणी मेव्याची हंगामानुसार रेलचेल. असे निसर्गसमृद्धीचे लेणे लेवून हाकेहाकेच्या अंतरावर वसलेल्या मोवळवाडी, गयाळवाडी, भट (ब्राह्मण) वाडी, प्रभुवाडी, बौध्दवाडी, घाडीवाडी, राणेवाडी, वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या १० वाड्यांमधून वास्तव्य करीत असलेली सुमारे ४००० ची लोकवस्ती. लोक व्यवसायाने शेतकरी व शेतमजूर. दुकानदार,व्यापारी वा इतर व्यवसायिक त्या मानाने विरळच. आंबा व्यापार करणार्‍यांची हल्ली सधन व्यवसायिकांत गणना होऊ लागली आहे.

        एका विशेष भौगोलिक फेरबदल माहितीची सुरुवातीलाच सर्वांनी नोंद घेणे औचित्यपूर्ण ठरेल. ती म्हणजे सुमारे २२ वर्षांपूर्वी (सन १९९९-००) मुटाटचे विभाजन होऊन वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या वाड्यांचा मिळून पाळेकरवाडी गांव (लोकवस्ती सुमारे १४००) या नावाने नवीन गावाची शासकीय निर्मिती झाली.त्यामुळे पूर्वीच्या मुटाट गावाचे आता दोन गांव झाले आहेत. आमच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आता मुटाट पंचक्रोशीत मुटाट, पाळेकरवाडी, मणचे, मालपे, वाघोटण आणि सडेवाघोटण या गावांचा प्रामुख्याने समावेश होतो.

        मुटाटच्या विभाजनपूर्व आणि विभाजनोत्तर भौगोलिक पार्श्वभूमीशी निगडीत विस्मृतीत जाणार्‍या काही वैशिष्ट्यपूर्ण आठवणीनां थोडासा उजाळा देऊ या. गावातील वाड्यांच्या छोट्या भागाला अजूनही अवाट किंवा वठार म्हणायची पध्दत आहे. मुटाटातील भेंडी, शेवडी आणि भटवाडी ही नावेही लोकांच्या स्मरणात आहेत. आजच्या पिढीतील अनेकांना गावातील काही भौगिलिक ठिकाणांना विशिष्ट रुढ नांवे असल्याचे माहिती नसेल. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईकरांना गावाचे नांव सांगतांना गावाची ओळख मणचे-मुटाट अशी करुन द्यावी लागत असल्याचे अनेकांना आठवत असेल. एस. टीच्या तळेरे विजयदूर्ग मार्गावर पाळेकरवाडी तिठ्यावर असलेल्या छोट्या टेकडीवजा उंचवट्यावर एक पुरातन दगडांचा छोटा बुरुज (देवरणे) अजूनही आहे. त्याचे उभा धोंडा हे नांव आजुबाजूच्या परिसरातच नाही तर एस. टी. चा थांबा म्हणून दप्तरी नोंद आहे. तसेच लिखी हे मुटाट फाट्याचे नांव सर्वश्रृत आहे. विजयदुर्ग मार्गावर पेंढरी एसटी स्थानक आणि बापर्डे फाट्यावरील रेडेटाका एसटी स्थानकाच्या मधील रस्त्यावर मुटाटच्या सड्यावर, कोरीव पायर्‍यां असणारी पोखरबाव (विहीर) हल्लीच्या पिढीला माहितीही नसेल. स्थानेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वाहणार्‍या बारमाही पाणी असलेल्या वहाळाच्या उतारावरील पाण्याच्या कोंडीना (टाकी) रंकाळ्याच्या कोंडी हे नाव प्रचलित असून त्यातील पाण्याच्या खोलीबाबत अनेक आख्यायिका प्रचलित असल्याचे सर्वाना आठवत असेल. हायस्कूलशेजारच्या कुपलाच्या टेकडीचे नाव कदाचित काही वर्षांनंतर गावकर्‍यांच्या लक्षातही राहणार नाही. लोकहो! आधुनिकीकरणामुळे हल्ली पूर्वीच्या खेड्यांमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. यासाठी पिढ्यांनपिढ्या लोकांमुखी असलेल्या सर्व ग्रामवैशिष्ट्यांचा आठवणरुपी ठेवा जतन करणे महत्वाचे आहे असे आम्हाला वाटते.

        सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने सुमारे ६० वर्षांपूर्वी (सन १९६०-६१ पूर्वी) मुटाट गांव मागासच होता. शासकीय धोरणानुसार त्यावेळी गांवात इयत्ता ७ वी पर्यंत शिक्षण देणारी एक आणि ४ थी पर्यंत शिक्षण देणारी एक अशा दोन प्राथमिक शाळा होत्या. इंग्रजी शिक्षणाची सोय खुद्द गावातच नव्हे तर पंचक्रोशीतही नव्हती.त्यासाठी मुटाटच्या विध्यार्थ्यांना लांबच्या शहरात किंवा तालुक्याच्या गांवी जावे लागत असे. पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना स्थलांतर करणे शक्य नव्हते त्यांना नाईलाजाने शिक्षण सोडून द्यावे लागत असे. त्यातच बहुतांशी पालक अशिक्षित, गरीब शेतकरी वर्गातील असल्याने पाल्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ अभावानेच आढळायची.        

         अशी स्थिती असतानाही स्वातंत्रपूर्व काळांत श्री रघुनाथ अनंत तथा बळवंतराव लेले (डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचे वडील) यांनी जवळ जवळ ४० वर्षे इंग्रजी १ ले ते ३ री इयत्तांचे वर्ग आपल्या घरी भरविले. सर्व विषय ते स्वत:च शिकवीत. स्थानिक व गांवाबाहेरील काही मोजक्या इच्छुक विध्यार्थ्यांनी इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेतला. सन १९३९ मध्ये श्री बळवंतराव निवर्तले आणि ही इंग्रजी शिक्षणाची सोय बंद झाली. त्यानंतर शिक्षणाबद्दलच्या तळमळीमुळे दूर्लभ इंग्रजी शिक्षण आपल्या गावातील ज्ञानार्थी विद्दयार्थ्यांना मिळावे म्हणुन डॉ.मोरेश्वर जनार्दन बोडस यांनी आपल्या घरी इंग्रजीचे वर्ग काही काळ चालविले. परंतु व्यवसायातील व्यापामुळे त्यांना ते बंद करावे लागले.

        स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाचे वाढते महत्व व उपयुक्तता यांची जाणीव झाल्याने मुटाटच्या विध्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर करावी व त्यांना गावातच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त  विचाराने १९६०-६१ च्या दरम्याने काही खटपटी मुटाटकर मंडळी एकत्र आली. एका नवीन उत्साहाने ही मंडळी भारावली होती.काहीतरी भरीव कामगिरी करावी अशी जबर इच्छा मनी बाळगून होती. एकमेकांच्या कल्पना जाणून घेऊन परिस्थितीनुरुप विचार विनिमय करून मुटाट गांवातच माध्यमिक शाळा सुरु करावी असा निर्णय या प्रागतिक विचारवंतानी केला.

        विचार पक्का झाल्यावर तो प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. मुटाट गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काचतज्ञ व कोकणातल्या कांही शिक्षण संस्थांशी निगडीत असलेले डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, M.Sc.Ph.D. यांना भेटून आपला विचार या मंडळीनी त्यांच्या कानावर घातला. गांवातच माध्यमिक शाळा सुरु करण्याची कल्पना, शाळेची गरज कशी व किती आहे हे स्वानुभवावरुन पटल्यामुळे डॉक्टरांना एकदम मान्य झाली व ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन देण्यांचे त्यांनी तात्काळ मान्य केले.

        डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पाठिंबा मिळणार म्हटल्यावर संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यावर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुटाट या संस्थेची स्थापना होऊन तिची आवश्यक असलेल्या सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली. या कामी ज्या प्रमुख व्यक्तींनी विषेश खटपट केली त्या  व्यक्ती होत्या डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, सर्वश्री विष्णु सखाराम मराठे ,सावळाराम जनार्दन परांजपे, जगन्नाथ दामोदर लेले, भिकाजी धोंडो चिरपुटकर, भिकाजी विश्राम घाडी,गोपाळ लक्ष्मण पाळेकर,भालचंद्र चिंतामण लेले, शिवराम वामन लेले, केशव राजबा राणे, अनंत ध्यानबा पाळेकर, श्रीपाद रामकृष्ण लेले,धोंडो नारायण परब, गुंडो सखाराम कांबळे,भिकाजी गणेश सोवनी,रामचंद्र गोविंद पुजारी, दौलत संभाजी राणे, शांताराम सखाराम पाळेकर आणि पांडुरंग केशव पाळेकर.

        अशा रीतीने मंडळाची स्थापना झाल्यावर  तारीख ११ जून १९६२ पासून मंडळाने मुटाट विद्यामंदिर मुटाट या नावाने  हायस्कूल सुरु केले आणि  इयत्ता ८वी चा शुभारंभाचा वर्ग सुरु करण्यात आला. शुभारंभाच्या  इयत्ता ८वी च्या वर्गात पटावर एकूण २९ विद्यार्थी-विद्यार्थीनी होते. त्या नंतर पुढील प्रत्येक वर्षी एक इयत्ता अशा क्रमाने, जून १९६५ मध्ये इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु झाला. मार्च १९६६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेला आमच्या विद्या मंदिराची पहिली तुकडी बसली. शालांत परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.आमची शाळा पूर्णांशाने माध्यमिक शाळा झाली. एक लक्ष पुरे झाले.

        प्रारंभी म्हणजे जून १९६२ पासून एका तात्पुरत्या तयार केलेल्या कच्च्या जागेमध्ये हायस्कूलचे वर्ग भरत होते. प्राथमिक शाळेची जागासुध्दा वर्गासाठी वापरण्यात आली. हळुहळू विध्यार्थी संख्याही वाढत होती. आमच्या हितचिंतकांच्या आणि सभासदांच्या माहितीसाठी एक महत्वाची बाब नमूद करणे आवश्यक वाटते ती अशी की, सन १९६२ ते १९७४ पर्यंत आणि त्यानंतरही मौजे मुटाट येथिल विद्यार्थ्यांबरोबर कुंभवडे, हर्चिली, तारळ, मणचे, मालपे,वाघोटण, सडेवाघोटण, सौंदाळे, बापर्डे आणि पेंढरी येथून विद्यार्थी अनंत अडचणींचा सामना करुन मुटाट विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षणासाठी वाहतुकीच्या सोयींअभावी नदी, नाले पार करुन पायी येत होते. सहाजिकच हायस्कूलसाठी  जागेची  अपुरी आणि कामचलाऊ व्यवस्था योग्य नाही,  चिरकालीन व्यवस्था असणे इष्ट आहे असा विचार करुन मंडळाने सन १९६३ मध्ये गावांतच माध्यमिक  शाळेसाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला.

        शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीसाठी प्रशस्त व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेची शोधाशोध सुरु झाली. शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसणार्‍या घाडी आणि साळुंके या शेतकरी कुळांनी व श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू या मालकांनी स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली. घाडी आणि साळुंके शेतकरी बांधवांचा तसेच जमीनचे मालक श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू यांचा त्याग मंडळासाठी अनमोल आहे.

        इमारत बांधण्याच्या दृष्टीने १९६३ च्या डिसेंबर महिन्यांत इमारत बांधकाम शास्त्र विषयक तज्ञांनी जागेची पाहणी केली.आराखडे तयार करुन दिले. हे तज्ञ मुंबईहून मुटाटला आले होते. कंत्राटदार त्यावेळी गावात उपलब्ध नव्हता. म्हणुन मुंबईच्या एका प्रख्यात कंत्राटदारावर बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली.बांधकाम साहित्य, मजूर, यंत्रसामुग्री वगैरे मुंबईहून रवाना झाली. इमारतीसाठी लागणारे सामान बांधकामाच्या ठिकाणी नेण्यासाठी लोकांनी श्रमदानातून रस्ता तयार केला. पायाभरणीच्या कामी ग्रामस्थांबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही श्रमदान केले. मुख्याध्यापक श्री वामन गणेश नवरे यांनी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेच्या बांधकामात जातीने लक्ष घातले. अशाप्रकारे ग्रामस्थ,शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या  सहकार्याने व श्रमदानाने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामाला सुरुवात झाली.  शीघ्र गतीने साधारणत:, १९६५ च्या पूर्वार्धात २०३ फुट लांब व २८ फुट रुंद आकाराची सुंदर, टुमदार, पाहताक्षणी जिची भव्यता नजरेत भरुन येईल अशी एक चिरेबंदी इमारत भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ येथे दिमाखाने उभी राहिली.सरस्वतीच्या उपासनेचे मंगल मंदिर तयार झाले.तारीख १९ जुलै १९६५ पासून या ज्ञान मंदिरात मुटाट विद्दया मंदिराचे वर्ग भरु लागले.एक ऐतिहासिक घटना असा या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल.

        या इमारतीत चार वर्गखोल्यांच्या बरोबर चित्रकलायतन, विज्ञानालय, मुख्याध्यापकांचे कार्यालय, शिक्षकांची खोली समाविष्ट आहेत. एक संकल्प साध्य झाला. सुमारे लाख भराचा खर्च या इमारतीसाठी त्यावेळी आला. इमारत बांधकामासाठी निधी संकलानाच्या दोन मोहिमा मंडळाने काढल्या.तारीख १४ एप्रिल १९६४ ला चौपाटी जवळील भारतीय विद्याभवनमध्ये संगीत संशयकल्लोळ या संकृत नाटकाचा बहारदार प्रयोग गिरगांवच्या ब्राह्मण सभेने केला. या वेळी एक स्मरणिका प्रकाशित केली. नाटकाची तिकिट विक्री व जाहिरातीमधून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.४४,०००/- ची रक्कम मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा तारीख १७ एप्रिल १९६६ ला स्मरणिका प्रकाशन व संगीतभूषण श्री. राम मराठे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम दादरच्या बालमोहन विद्दा मंदिराच्या हॉलमध्ये विनाशुल्क करण्यात आला. जाहिरातदार, देणगीदार व संगीतप्रेमी मंडळी या समारंभाला बहुसंख्येने आली होती. स्मरणिकेच्या या उपक्रमातून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.२७,०००/- मिळाले. या शिवाय लहानमोठ्या देणग्या मिळाल्या. वरील दोन्ही मोहिमांमुळे मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून इमारतीचा बराचसा खर्च चुकता झाला.

        सन्माननीय सभासदांच्या आणि वाचकांच्या माहितीसाठी एका गोष्टीची येथे आवर्जुन उल्लेख करतो. वर सांगितल्याप्रमाणे जो काही लाखभराचा निधी मंडळाने गोळा केला तो गोळा करण्यात डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपल्या व्यवसायातील मंडळींकडून जाहिराती आणल्या. देणग्या मिळविल्या, विदेशवासिंयांकडूनही काही सहाय्य मिळविले. आमच्या पाठीशी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले नसते तर एवढा मोठा निधी त्यावेळी इतक्या अल्प काळात जमा होऊ शकला नसता. ही अतिशयोक्ती नसून वस्तूस्थिती आहे. डॉक्टरांनी मुटाटकरांवर अतिशय उपकार केले आहेत. अनेकांना त्यांनी आपल्या कारखान्यात नोकरी दिली. या उपकारांची प्रत्येक मुटाटकराला जाणीव आहे.

        इमारत निधीसाठी श्री.विनायक भिकाजी देसाई व श्री.माणेकलाल प्राणजीवनदास मेहता यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच श्रीमती रमाबाई बोडस यांनी पांच हजार रुपये एक रकमी दिले.या त्यांच्या भरीव सहाय्याबद्दल त्यांनी सुचविल्याप्रमाणे शाळेच्या वर्ग खोल्यांना नांवे देण्यात आली व तशा संगमरवरी पाट्या त्या त्या खोल्यांच्या प्रवेशव्दारापाशी बसविण्यांत आल्या.
श्री.उमाकांत श्रीरंग देसाई विज्ञानालय
श्री.माणेकलाल प्राणजीवनदास मेहता चित्रकलायतन
श्री.गजानन जनार्दन आणि श्रीमती रमाबाई बोडस वर्गखोली

        वरील पाट्यांचा जाहीर अनावरण समारंभ दिनांक १ मार्च १९६९ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री माननीय श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांच्या शुभ हस्ते झाला.समारंभाला पंचक्रोशीतून सुमारे दीड हजार मंडळी जमली होती. मंडळाच्या सुरुवातीच्या वाटचालीतील दीर्घ काळ स्मरणात राहील असा हा मोठा समारंभ होता.

        या नंतर लवकरच एक वज्राघाततुल्य प्रसंग ओढवला. मंडळाचे प्रमुख संस्थापक व अध्यक्ष डॉ.श्रीधर रघुनाथ लेले याना ता.२० एप्रिल १९६९ रोजी आकस्मिकरित्या देवाज्ञा झाली. मुटाटचा प्रकाश हरपला असेच सर्वाना वाटले. कार्यकर्ते मनाने थोडेसे खचले.आता संस्थेचे काय होणार अशी भीती काहीना वाटू लागली.अशा वेळी श्री भिकाजी धोंडो उर्फ बाबासाहेब चिरपुटकर पुढे आले.त्यांनी सर्वाना धीर व दिलासा दिला. डॉक्टरांचे परमस्नेही नामदार श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:हून स्विकारली व कार्यकर्त्यांना उत्तेजन दिले.

        कै. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक १९ एप्रिल १९७० रोजी आर्यन शाळेच्या सभागृहात त्यांना जाहीर आदरांजली वाहण्यात आली. डॉक्टरांच्या जीवनांतील विविध पैलुंचे दर्शन घडविणारा स्मृतिपूजा विशेषांक त्यावेळचे मुख्याध्यापक श्री.वामन गणेश नवरे यांनी परिश्रमपूर्वक तयार केला होता. त्या अंकाचे प्रकाशन सौ.ताराबाई पुरुषोत्तम खेर यांच्या हस्ते झाले.

        डॉ.श्रीधर रघुनाथ लेले ही व्यक्ती म्हणजे मंडळाचा आर्थिक झरा होता.शाळेसाठी द्रव्याची त्यांनी कधी कमतरता भासू दिली नाही. हा झरा काळाच्या पडद्याआड गेल्यावर मंडळापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. शाळेचा संपूर्ण खर्च निभावयाचा कसा याची थोडी चिंता लागली होती. पण याच सुमारास सरकारी अनुदान धोरणांत क्रांतीकारी बदल झाला.मान्यताप्राप्त शिक्षकांच्या पगारासह सर्व रास्त खर्चाचा ९९ टक्के भार सरकारने आपल्या शिरावर घेतला.ग्रामिण भागातील शाळा चालकांची एक मोठी चिंता दूर झाली.या सरकारी धोरणाचे त्यावेळी आम्ही जाहीर स्वागत केले होते.

        डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांनी मुटाटकरांवर अनंत उपकार केले. त्यांनी गांवामध्ये नवचैतन्य निर्माण केले. तन-मन-धन अर्पण करुन गावात माध्यमिक शाळा सुरु केली. त्यांना मुटाटचा सूर्य व माध्यमिक शिक्षणाचा जनक मानतात.त्यांच्या सामाजिक ऋणातून थोडेफार तरी मुक्त व्हावे व त्यांची प्रेरक शक्ति सदोदित स्फुरण देत राहावी म्हणून मुटाट विद्यामंदिराला डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल असे नांव देण्याचा ठराव मंडळाच्या तारीख २७ मे १९७३ रोजी भरलेल्या जादा सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजूर केला.नामांतराचा जाहीर समारंभ तारीख १ मार्च १९७५ रोजी झाला.त्यावेळचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री.भाईसाहेब सावंत (माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य) समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.अध्यक्षस्थानी मुटाटचे थोर विद्वान डॉ.वामन केशव लेले M.A.Ph.D. हे होते. समारंभ बहारदार झाला.

        मंडळाची कार्यकारी समिती प्रारंभी मुटाट येथे होती.कालांतराने त्यातील बरीच मंडळी मुंबईला आली व संस्थेचा कार्यालयीन कारभार मुंबईहून होऊ लागला. रजिर्स्टर्ड ऑफिस मुटाटहून मुंबईला हलविण्यात आले. त्यामुळे बृहन्मुंबई विभागाच्या धर्मादाय आयुक्तांच्या कचेरीत मूळची नोंदणी वर्ग करण्यात आली.नवा क्रमांक F-2046 (Bombay) असा आहे.

        डॉ. लेले यांच्या निधनानंतर मंडळाच्या प्राप्तीचा उगम आटत चालला असताना एक मोठी रक्कम मंडळाला देणगी रुपाने मिळाली त्याची हकीकत. श्री.गणेश अनंत लेले (डॉक्टरांचे चुलते) हे बडोदे संस्थानामध्ये मोठ्या अधिकारावर नोकरीला होते. दिनांक २७-२-१९४५ ला केलेल्या व्यवस्थापत्राने त्यांनी आपल्या मिळकतीची वाटणी केली.त्यानंतर दोन वर्षानी ते निर्वतले.साधारण १९७१ पर्यंत त्या मिळकतीची कोणी रीतसर व्यवस्था केली नाही.काही संबंधितांनी ही गोष्ट मंडळाच्या पदाधिकार्‍यांजवळ स्पष्ट केली. मंडळाने खटपट केल्यास या व्यवस्थापत्रातून मिळणारी रक्कम संस्थेला देणगी म्हणून देण्याची तयारी त्यांच्या वारसानी दर्शविली.तारीख ८ सप्टेंबर १९७२ ला मुंबईच्या हायकोर्टात मिळकतीचे व्यवस्थापक पत्र मिळविण्यासाठी वारसानी अर्ज केला. व्यवस्थापक पत्र मिळाल्यानंतर मिळकतीची रक्कम गोळा करण्यात आली.सर्व प्रकारचा खर्च वजा करुन वारसांच्या अतुलनीय त्यागामुळे मंडळाला एक रकमी रुपये ४१,४९६/- मिळाले. श्रीमती गीता श्रीधर लेले, श्री.अनंत श्रीधर लेले, डॉ.हेमलता माधव पुरंदरे,श्री.भालचंद्र रामचंद्र लेले, श्री.देवदत्त पुरुषोत्तम लेले व श्री.माधव पुरुषोत्तम लेले या वारसांचे मंडळ अनंत आभारी आहे.

        उपरोल्लेखित देणगी मिळविण्यात श्री.भिकाजी धोडो उर्फ बाबासाहेब चिरपुटकर यांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम महत्वाचे आहेत. श्री.बाबासाहेबांनी ही कामगिरी स्विकारली नसती तर इतकी मोठी रक्कम त्यावेळी मंडळाच्या पदरात पडली नसती.वयाच्या सत्तरीत,दृष्टी कमजोर झालेली असताना, वार्धक्यातील अडचणींची तमा न बाळगता त्यांनी स्विकारलेली कामगिरी पूर्णपणे तडीस नेली. तरुण व अननुभवी कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचा पितृतुल्य आधार होता. सम्यक मार्गदर्शन होते. डॉ.लेले यांनी स्थापलेल्या मंडळाचे बाबासाहेबांनी संगोपन व संवर्धन केले. श्री मनोहर गोविंद लेले यांच्यासारखे नि:स्वार्थी आणि निरलसपणे कार्य करणारे कार्यकर्ते तयार केले. त्यांनी दाखविलेल्या आखीव रेखीव मार्गावरुन कार्यकर्त्यांनी चालायला नुकतीच सुरुवात केली असताना तारीख ८ नोव्हेंबर १९७५ रोजी चिरनिद्रा घेण्यासाठी बाबासाहेब आम्हांस सोडून गेले. मंडळावर झालेला हा दुसरा वज्राघात.आले देवाजींच्या मना तेथे कोणाचे चालेना! कोणालाच कालगती रोखता येत नाही,की नियतीचा खेळ समजत नाही.

        बाबासाहेब चिरपुटकरांच्या निधनानंतरच्या कठिण परिस्थितीत कार्यकारी समितीचे जेष्ठ सभासद श्री मनोहर गोविंद लेले, श्री कृष्णाजी विठ्ठल लेले, श्री विष्णु सखाराम मराठे आणि श्री जगन्नाथ मोदर लेले यांनी मंडळाच्या कार्याची धुरा सांभाळली. जेष्ठांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला आणि सर्वजण झपाटून कामाला लागले. श्री.बाबासाहेब चिरपुटकर यांनी मंडळाची अविरत व आमरण सेवा केली.ती अनमोल सेवा सतत डोळ्यासमोर रहावी व स्मृती प्रेरणादायी व्हावी म्हणून हायस्कूलमधील एका वर्ग खोलीला त्यांचे नाव देण्याचा निर्णय तारीख ३१-१२-१९७८ ला भरलेल्या वार्षिक साधारण सभेने घेतला.

        तारीख ११-२-१९८० ला मुटाटला आणखी एक समारंभ झाला.आगावू ठरल्याप्रमाणे तीन वर्ग खोल्यांवर नावांच्या संगमरवरी पाट्या बसविल्या होत्या त्यांचे अनावरण बेळगांवचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्धोगपती श्री. बाळकृष्ण महादेव गोगटे तथा रावसाहेब गोगटे यांच्या हस्ते या दिवशी झाले.सुप्रसिध्द कादंबरी लेखिका व रत्नागिरीच्या त्यावेळच्या आमदार सौ.कुसुमताई अभ्यंकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

श्री.पुरुषोत्तम रामचंद्र लेले आणि श्रीमती सुंदराबाई पुरुषोत्तम लेले वर्ग खोली
श्री.भालचंद्र रामचंद्र लेले वर्ग खोली
श्री.भिं.धो.चिरपुटकर वर्ग खोली 

       मंडळाच्या आणि हायस्कूलच्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमांचा परामर्श घेत प्रगतीच्या अनेक टप्प्यांसह मंडळाची आणि हायस्कूलची सन १९८० पर्यंतची वाटचाट वर सादर केली आहे. यानंतरच्या वाटचालीतील प्रमुख घटनांचा संक्षिप्त आढावा घेताना एक महत्वाचे निरीक्षण इथे नमूद करावेसे वाटते ते असे की, श्री मनोहर गोविंद लेले यांनी परिश्रमपूर्वक निवडक कार्यकर्त्यांचे पाठबळ मंडळाच्या पाठीशी उभे केले. आर्थिकदृष्ट्या यथातथा स्तरातील असूनही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी डगमगून न जाता पूर्वसूरींच्या पुण्याईने मंडळाचा कारभार नेटका करुन संस्थेची भरभराट करण्यात मोलाचा हातभार लावला. याचे सारे श्रेय श्री मनोहर गोविंद लेले यांना जाते.

        खेडेगावातील शाळा म्हटली की तेथे विद्यार्थ्यांची तशी कमतरताच.आलोभने प्रलोभने दाखवून सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य देऊन थोडीफार सक्ती करुन विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागत असे. याला मुटाट हायस्कूलचाही अपवाद नाही. प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या प्रमाणित होती. मुटाटच्या खाडीपल्याड असलेल्या कुंभवडे गांवात ज्यावेळी हायस्कूलची सोय झाली त्यावेळी आमच्याकडील विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली. परंतु नव्या शैक्षणिक आकृतिबंधामुळे इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे प्राथमिक शाळेचे ३ वर्ग हायस्कूलला जोडण्याच्या सरकारी निर्णयामुळे १९७७-७८ या वर्षापासून एकेक इयत्ता आमचेकडे घेण्यात आली.१९७९-८० या वर्षी इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे तीनही वर्ग पूर्णपणे आमच्या हायस्कूलमध्ये भरु लागले आणि त्यामुळे विद्यार्थी संख्येला नीटसा आकार आला. पुढील प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या वाढतच गेली.या वाढत्या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था थातूर मातूर सोय असलेल्या अपुर्‍या जागेतच करावी लागत असे. व्हरांड्यामध्येही वर्ग भरवावे लागत.एवढे करुनही ही सर्व व्यवस्था अपुरी पडू लागली.नव्या वर्ग खोल्यांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.अखेरीस नवीन वर्ग खोल्या बांधण्याचा कार्यकारी समितीने निर्णय घेतला.

        वर्ग खोल्या बांधण्यासाठी इमारत बांधकाम विशारदाकडून जागेची पाहणी करुन हायस्कूल इमारतीवर मजला चढवून नवीन वर्ग खोल्या बांधाव्यात असे ठरले.त्याप्रमाणे तज्ज्ञांकडून नियोजित बांधकामाचा अंदाजी खर्च काढण्यात आला. अत्यावश्यक बाबींवरच खर्च करण्याचे धोरण ठरवून खर्चाचा अंदाज दोन लाखांवर गेला. प्रत्यक्ष खर्च जास्त होतो हे गृहीत धरुन किमान अडीच लाख रुपयांची तरतुद करायला हवी असे कार्यकारी समितिने ठरविले.अडीज लाखांचा निधी उभा करणे ही कामगिरी कार्यकर्त्यांना जरा जड वाटत होती. सर्वच नवखे होते. डॉ. लेले यांच्या पश्चात एवढा मोठा निधी जमा करण्याचा प्रसंग आजवर कधी आला नव्हता.त्यामुळे ही कामगिरी आपल्या हातून तडीस जाईल की नाही अशी भिती काहींच्या मनाला चाटून गेली.

        या थोड्याश्या कठिण परिस्थितीत कार्यकारी समितीचे जेष्ठ सभासद श्री कृष्णाजी विठ्ठल लेले आणि श्री मनोहर गोविंद लेले यांनी योग्य मार्गदर्शन करुन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. खास करुन श्री मनोहर लेले यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या विनयशील आणि आश्वासक स्वभावामुळे मंडळाशी संबंधित तसेच अपरिचितांनीही देणग्यांचा हात पुढे केला. त्यांच्या बरोबरीने श्री नारायण गणेश परांजपे,कार्यकारी समितीचे एक जेष्ठ आणि जाणते सदस्य व मंडळाचे उपाध्यक्ष पुढे आले. श्री नारायणरावांनी कार्यकर्त्यांना धीर देत मनातील भिती दूर केली.कार्याचे महत्व व महनियता लोकांना पटवून द्या. लोक तुम्हाला जरुर सहाय्य करतील असा कानमंत्र दिला. विश्वास निर्माण केला. शिवाय लाखभराचा निधी स्वत: जमवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनपूर्तीचा भाग म्हणून परांजपे ऑटो कास्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीतर्फे इमारत निधीसाठी रु. ५०,०००/- ची शुभारंभाची देणगी त्वरीत दिली.

        या सर्व गोष्टींचा कार्यकर्त्यांच्या मनावर इष्ट परिणाम झाला.सर्वजण एकवटले व निधीसंकलन मोहिमेला दृढ निश्चयाने सुरुवात झाली.लहानमोठ्या मिळतील त्या देणग्या गोळा करण्यासाठी कार्यकर्ते दारोदार फिरु लागले.अनेक मुटाटकरांनी आपले कर्तव्य मानून जमेल त्या रकमेच्या देणग्या दिल्या. शिक्षण प्रसार हे पुण्यकर्म समजून अनेक मंडळीनीही आमच्या कार्यास हातभार लावला. मंडळाचे विश्वस्त श्री अनंत श्रीधर लेले यांनीही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. निधी जमविण्याचा एक भाग म्हणून स्मरणिका काढायचे ठरले. स्मरणिकेतील जाहिरातींद्वारा छपाई खर्च वजा जाता सुमारे ४२,७५५ रुपयांचा बांधकाम निधी गोळा झाला. स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची सजावट व छपाई श्री हरीष बाळकृष्ण परब यांनी विनामुल्य करुन दिली. स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा दिनांक १५ सप्टेंबर १९८५ रोजी दादरच्या बालमोहन विद्दयामंदिराच्या सभागृहात मंडळाचे अध्यक्ष श्री पु.ग.खेर यांचे अध्यक्षतेखाली, डॉ.सुधाकर साने यांचे उपस्थितीत संपन्न झाला.ख्यातनाम गायिका सौ.जयमाला शिलेदार यांच्या सुश्राव्य नाट्यगीत गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. मंडळाचे एक हितचिंतक श्री.य.के.लेले यांच्या सौजन्याने नाट्यगायनाचा कार्यक्रम विनाबिदागी सादर करण्यात आला.

        नियोजित बांधकामासाठी जामसंड्याचे श्री.सुरेश गोगटे यांना कंत्राट देण्यात आले.जानेवारी १९८५ मध्ये त्यांनी या बांधकामाची सुरुवात केली.बांधकाम चालू असताना काही अडचणी आल्या.त्या दूर करुन अल्पशा विलंबाने जुलैच्या आरंभी त्यांनी नवीन तीन वर्ग खोल्या बांधून पूर्ण केल्या.दिनांक १५ जुलै १९८५ पासून नवीन जागेत दोन वर्ग सुरु झाले.आमच्या योजनेचा एक भाग पूर्ण झाला.या कामाबरोबरच इमारतीची इतर काही पूर्वी न केलेली किरकोळ कामे करुन घेण्यात आली.या वाढीव कामांमुळे बांधकामाचा एकूण खर्च अडीच लाखांपर्यंत गेला.बांधकाम चालू असताना जुन्या इमारतीच्या काही भागाची मोडतोड करावी लागल्यामुळे काही वर्ग बाहेरील मोकळ्या जागेत तात्पुरती सोय करुन भरवावे लागले.थोड्याच दिवसांत आपली शाळा नवीन होणार या एका गोड कल्पनेने विद्यार्थ्यांनी ही अडचण सहन केली.याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.शिक्षक व शिक्षकेतर सेवकवर्गांची झालेली गैरसोय त्यांनी कधीच व्यक्त केली नाही.उलट आम्हालाच, मंडळाच्या इमारत निधीमध्ये आपलाही अल्पस्वल्प वाटा असावा याची जाणीव ठेवून आपापसात गोळा केलेली रु ५,२२५/- ची रक्कम मंडळाला देणगी म्हणून देवून सुखद धक्का दिला.त्यांच्या या देणगीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.अध्यापन कार्याबरोबर वेळप्रसंगी संस्थेला आर्थिक सहाय्य करण्यात आम्ही मागे नाही हे त्यांनी कृतीने सिध्द केले.आमच्या त्या वेळच्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या दातृत्वाने एक आश्वासक प्रेरणास्रोत निर्माण केला त्याचे आम्हाला अप्रूप वाटते.

        विस्तारीत इमारतीचे जाहीर उद्घाटन व नव्या वर्गखोल्यांचे नामकरण करण्यासाठी तारीख १ मार्च १९८६ रोजी हायस्कूलच्या प्रांगणात एक शानदार समारंभ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवगडच्या स.ह.केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. ए. कुळकर्णी यांनी भुषविले होते.श्री. अप्पासाहेब गोगटे व श्री. दादासाहेब राणे हे आजीमाजी आमदार, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. इमारत विस्ताराच्या कार्यपूर्तीमुळे कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उत्साहाला आलेले उधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होते.

      रौप्यमहोत्सवी वर्षाचा शानदार सोहळा : सन १९८७-८८ हे मंडळाचे व डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे रौप्यमहोत्सवी वर्ष. संस्थेच्या व हायस्कूलच्या यशस्वी वाटचालीतील महत्वाचा ऐतिहासिक टप्पा. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या व हायस्कूलच्या वाटचालीतील हा महत्वाचा टप्पा तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना व ग्रामस्थांना प्रचंड आत्मविश्वास व कार्यपूर्तीचा आनंद देवून गेला. दृष्ट लागण्यासारखा हा रौप्य महोत्सवी सोहळा तारीख २८ जानेवारी १९८८ ते ३० जानेवारी १९८८ या कालावधीत शाळेच्या प्रांगणात चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तीन दिवस चाललेल्या या समारंभ सोहळ्याचे प्रसंगी अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणुन कोल्हापुरचे प्राचार्य म.अ.कुळकर्णी होते. प्राचार्य कुळकर्णी यांच्याबरोबर डॉ.दिलीप केशव राणे व डॉ. शरद रंगनाथ लेले या विद्वतजनांचा सहवास ग्रामस्थांना घडला व या विद्वतजनांचे प्रबोधनपर बोल ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी हायस्कूलचे स्नेहसंम्मेलन झाले. रात्रीच्या सत्रात विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले.

        दुसरा दिवस हा या सोहळ्याचा प्रमुख दिवस.या दिवशी सकाळच्या सत्रात काही वर्गखोल्यांचे व प्रवेशव्दाराचे नामकरण अध्यक्ष व प्रमुख अतिथी श्री अमृतराव राणे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.रात्रीच्या कार्यक्रमात श्री सदाशिव रामचंद्र लेले यांनी जादूचे प्रयोग सादर केले तर माजी विद्यार्थी श्री म.वि.गोखले यानी सुरेल आवाजात श्रोत्यांना नाट्यगीते ऐकविली.तिसरे दिवशी सकाळी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.त्या दिवशी रात्री मुंबईच्या श्री परशुरामबुवा पांचाळ यांच्या सुमधुर भजनाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.ग्रामस्थांच्या बरोबरीने कार्यकारी समितीचे मुंबई पुण्याकडील पदाधिकारी व सभासद या रौप्य महोत्सवी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित होते.

        डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या भागशाळेची मणचे गावात सुरुवात: मंडळाच्या वाटचालीतील एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख केल्याशिवाय वाटचालीचा पुढील आढावा कथन करता येणार नाही. ती म्हणजे मुटाट जवळच्या मणचे गावांत मंडळाने डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलची भागशाळा मणचे गावकर्‍यांच्या विनंतीनुसार सन १९८४-८५ या वर्षी इयत्ता ८ वी चा एक वर्ग सुरु करुन केली. सन १९८५- ८६ मध्ये ८ वी आणि ९ वी असे दोन वर्ग असे करत सन १९८६-८७ साली इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी पर्यंतचे भागशाळेचे तीनही वर्ग सुरु झाले. भागशाळेच्या तीन वर्गांची विद्यार्थी संख्या सुमारे १४० होती. ग्रामपंचायतीने गावांतील श्रीकृष्ण मंदिराच्या धर्मशाळेत भागशाळेच्या वर्गांसाठी जागेची तात्पुरती सोय केली होती. या कामी त्या वेळचे सरपंच श्री. बापूसाहेब गोखले यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्नांना मणचे ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य दिले. माजी आमदार श्री. दादासाहेब राणे यांनी या भागशाळेसाठी शिक्षण खात्याकडून त्वरीत परवानगी मिळवून दिली. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.       

        मंडळाच्या रौप्यमहोत्सवानंतर सन १९८८-८९ ते सन १९९७-९८ या सुमारे दहा वर्षांच्या काळांत प्रामुख्याने मंडळाचा विस्तार तसेच शैक्षणिक विकास-विस्तार संबंधात विषेश लक्षवेधी प्रसंग आले नाहीत. पण विकासाशी निगडीत अनेक बाबींवर परिपूर्ण विचारविनिमय होऊन दूरदृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबतची सांद्यत हकीगत पुढे सादर केली आहे. मंडळाचे काही वर्षांचे विलंब झालेले हिशेब पूर्ण करण्यात कार्यकारी समितीचा बराचसा वेळ खर्ची पडला. ताळेबंद आणि आय-व्यय लेखापरीक्षणास विलंब झाला. परिणामी मंडळाच्या वार्षिक सभाही  वेळापत्रकाप्रमाणे घेता आल्या नाहीत. मात्र या अडचणींची सोडवणूक करीत कार्यकारी समितीचे उद्दिष्टांची पूर्तता आणि शैक्षणिक  विकासाचे काम अविरत चालू होते.

        मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करुन देण्यासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध करणे, माहिती तंत्रज्ञानाची तोंडओळख होण्यासाठी संगणक सुविधा उपलब्ध करणे इत्यादी विधायक बाबींवर सतत विचार चालू होता. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देणगीरुपात संगणक मिळवून, विकत घेऊन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी संगणक प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध स्पर्धात्मक परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. मणचे भागशाळा शाखेसाठी कायमस्वरुपी जागेची सोय करण्याविषयी कार्यकारी समितीच्या सभांमध्ये वेळोवेळी चर्चा होत होत्या. मंडळाकडून व मणचे ग्रामस्थांकडुन भागशाळेसाठी सुयोग्य जागेच्या पर्यायांचा शोध चालू होता. थोडक्यात भविष्यातील विस्ताराची पायाभरणी याच कालावधीत करण्यात आली.

        या दहा वर्षांच्या कालावधीत मंडळाचे अनेक नामवंत पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते दिवंगत झाले. त्यांत मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री ना.श्री. पुरुषोत्तम गणेश खेर, श्री. प्रभाकर ताम्हनकर, श्री. धोंडोपंत घाटे,श्री. नानासाहेब पाळेकर, इत्यादी मान्यवरांना आम्ही कायमचे पारखे झालो. मात्र ते जरी आज आमच्यात नसले तरी त्यांचे कार्य आम्हांला सदैव मार्गदर्शक होऊन प्रोत्साहित करीत आहे.                               

       अध्यक्ष श्री रमेश अच्युत घाटे, उपाध्यक्ष  श्री कृष्णाजी विठ्ठल लेले, उपाध्यक्ष श्री कृष्णा सिताराम राणे, कार्याध्यक्ष श्री विश्वासराव रामचंद्र पाळेकर, कार्योपाध्यक्ष श्री मनोहर गोविंद लेले, मुख्य कार्यवाह श्री विष्णु सखाराम मराठे,खजिनदार श्री शिवाजी कृष्णा राणे आणि स्थानिक समिती सभासद श्री जगन्नाथ दामोदर लेले व श्री सदानंद पांडुरंग पाळेकर यांनी मंडळाच्या संचालनांत त्यांची उणीव भासू दिली नाही. सर्वश्री रामचंद्र लक्ष्मण टुकरुल, वसंत हिराजी त्रिंबककर, रामचंद्र गणपत वारीक, प्रभाकर सावळाराम परांजपे, विश्वनाथ वामन पाळेकर, हणमंत कृष्णाजी घाटे आणि ताम्हनकर या सर्वांनी मोलाची साथ दिली. विशेषत: श्री मनोहर गोविंद लेले यांनी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना मंडळाच्या कार्यात सहभागी करुन नविन रक्ताला वाव देण्याचे धोरण राबविले त्याचा इष्ट परिणाम झाला. कार्यकारी समितीत माजी विध्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याने मंडळाच्या शैक्षणिक आस्थापनांच्या कार्यक्षम वाढीला गती येऊ लागल्याने श्री मनोहर लेले यांचे धोरण सफल झाल्याचे आपल्या लक्षात येईल.

        अध्यक्ष श्री रमेश अच्युत घाटे आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव रामचंद्र पाळेकर, यांनी सन १९९२-९३ पासून प्रागतिक विचारांची कास धरुन मंडळाच्या कार्यकक्षेत आधुनिकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. मंडळाच्या भावी  वाटचालीतील महत्वाकांक्षी संकल्पांची रुपरेषा निश्चित केली.शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी विध्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आणि संगणक शिक्षणाची ओळख करुन देणे यासारख्या उपक्रमांस प्राधान्य दिले. संस्थेच्या कार्यप्रणालीतील परंपरागत शिथिलतेचा त्याग करुन उत्साह आणि प्रयोगशीलतेचे रोपण केले. लवकरच या सगळ्याचा दृष्य परिणाम मंडळाच्या वाटचालीत आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या ( मणचे  भागशाळेसह) शैक्षणिक प्रगतीत दिसू लागला.  

        मंडळ स्थापनेस पस्तीस वर्षे झाल्यानंतर सन १९९८-९९ या वर्षात मंडळाच्या घटनेतील एका शिक्षणबाह्य उद्देश कपातीचा आणि सभासद वर्गणी वाढीचा निर्णय मंडळाला घ्यावा लागला. मंडळ उद्देशातील – सिंधुदुर्ग (रत्नागिरी) जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील जनतेच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिक विकासासाठी व सर्वांगीण उत्कर्षासाठी खटपटी करणे या उद्देशामुळे धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात मंडळाला १९९२-९३ ते १९९७-९८ या सहा वर्षांत रु.९२२४ इतकी रक्क्म वर्गणी म्हणून भरावी लागली.वरील उद्देश हिशेबतपासनिसांच्या सल्ल्यानुसार व पूर्ण विचारांती घटनेतून काढून टाकण्याचा निर्णय मंडळाने घेतला. तसेच मंडळाच्या विविध सभासद प्रकारांच्या वर्गणीत १९६२ सालापासून वाढ करण्यात आली नव्हती. याबाबतच्या सभासदांच्या सूचनांचा सर्वांगाने विचार करुन कार्यकारी समितीने तारीख १ एप्रिल १९९९ पासून सभासद वर्गणीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला (सभासद वर्गणी दरपत्रक तपशील अन्यत्र छापला आहे).

        सन १९९७-९८ साली मंडळाने मणचे भागशाळेसाठी कायमस्वरुपी इमारत बांधण्यासाठी चाचपणी सुरु केली. अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि उपाध्यक्ष श्री .कृष्णाजी विठ्ठल लेले यांनी याकामी पुढाकार घेतला.कार्यकारी समितीने या विषयावर सखोल चर्चा करुन सर्व सोयीयुक्त भागशाळा इमारतीचा प्रस्ताव कार्यान्वित करावयाचे ठरविले. मणचे ग्रामस्थांच्या सहभागासाठी मंडळाने मणच्यातील हितचिंतक व कार्यकर्ते श्री मोरेश्वर अनंत उर्फ बापुसाहेब गोखले, श्री अरविंद ठाकुरदेसाई, श्री प्रभाकर मणचेकर, श्री मुकुंद ठाकुरदेसाई, श्री शंकर तोरसकर, श्री गजानन सिताराम मेस्त्री, श्री मंगेश रहाटे व अन्य ग्रामस्थांशी विचारविनिमय केला. सर्वांनी सहकार्याचा हात पुढे केल्यामुळे भागशाळेची (कै.भाऊसाहेब काळे भागशाळा) संपूर्ण नवी इमारत बांधावयाचा संकल्प जाहीर केला. इमारत बांधकामासाठी मणचे ग्रामविकास मंडळाने पाठिंबा देऊन सहकार्याचे आश्वासन दिले होते.

        भागशाळेसाठी मणचेकरांनी सुचविलेल्या जागांच्या अनेक प्रस्तावांतून गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री गजानन सिताराम मेस्त्री यांच्या मालकीच्या सर्वे नं.१२,पोट हिस्सा नं.६ क्षेत्र ०-१६-४ या सुमारे १६ गुंठे क्षेत्राच्या जागेची नियोजित इमारतीसाठी निवड करण्यात आली.जमीन खरेदीसाठी रुपये ६०,००० पेक्षा अधिक खर्च आला. श्रीमती नलिनी केशव गोखले यांचेवतीने रुपये ४०,०००/- देणगी रुपाने मंडळास मिळाल्याने एक मोठे काम झाले.

       मंडळास भुखंड मिळाला पण इमारत खर्चासाठी निधी उभारावा कसा? हा प्रश्न आ वासून उभे राहिला. या कठिण  प्रसंगी श्री कृष्णाजी विठ्ठल लेले कुटुंबिय मंडळाच्या मदतीस धावून आले. त्यांच्या डोंबिवलीकर नातलग श्रीमती शांता काळेंना त्यांनी मंडळाच्या मणचे भागशाळेविषयी सर्व माहिती सांगितली. श्रीमती शांता काळे मंडळाच्या कार्यामुळे प्रभावित झाल्या. मंडळाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे व हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचे निमंत्रण स्विकारुन त्यांनी प्रत्यक्ष मंडळाच्या कार्याचे निरीक्षण केले. त्या स्व:त मणचेकर असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी मुळचे मणचेकर असलेले पण मणचे गाव कायमचे सोडून मुंबईस स्थलांतरीत झालेले कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे,संस्थापक समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई यांचे सुपुत्र डॉ.राम काळे व डॉ.घन:श्याम काळे यांना मणचे भागशाळेविषयीची सर्व माहिती सांगितली. प्राथमिक माहितीची देवाणघेवाण झाल्यानंतर सर्वश्री रमेशराव घाटे,विश्वासराव पाळेकर,मनोहर लेले आणि प्रभाकर मणचेकर यांनी डॉ.घन:श्याम काळे यांची वसई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना मंडळाच्या कार्याची सांद्यत माहिती दिली. मणचे भागशाळेची प्रगती व भागशाळा इमारतीची निकड समजावून सांगितली. डॉ.घन:श्याम काळे यांचे पुण्यातील जेष्ठ बंधु डॉ.राम काळे यांना कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांनी सविस्तर पत्राने मंडळाच्या कार्याचा परिचय करुन दिला.

      मंडळाच्या कार्याने भारावून सर्व काळे कुटुंबीय या उदात्त शैक्षणिक कार्याच्या पूर्ततेसाठी मंडळाच्या पाठिशी उभे राहिले. मणचे येथील नूतन इमारतीस कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ कै. भाऊसाहेब काळे भागशाळा हे नाव देण्याच्या अटीवर त्यांनी एकरकमी रुपये पांच लाख देणगी देण्याचे मान्य केले. शुभारंभाच्या या आश्वासक देणगीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना बळ लाभले.त्यांनी यथाशक्ती दृढनिश्चयाने उर्वरीत रक्कम उभी केली. अध्यक्ष श्री.रमेश घाटे यांच्या प्रयत्नाने वालचंद ट्रस्टकडून घसघशीत २.७५ लाख रुपयांची विनाअट देणगी मिळाल्याने आमचे काम फारच सोपे झाले. मग देणग्या देण्यात मणच्यातील गोखले, ठाकुरदेसाई, मणचेकर, रहाटे इत्यादी ग्रामस्थांबरोबर मुटाटकरही मागे राहिले नाहीत (निधी संकलन तपशील मंडळाने सन २००४ ते २००७ या वर्षांच्या वार्षिक अहवालांत सादर केला आहे).

      भागशाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ दिनांक १० जानेवारी २००४ रोजी श्री नारायणराव दिवेकर भागीदार समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई, यांचे अध्यक्षतेखाली मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर कार्योपाध्यक्ष श्री मनोहर लेले या सर्वांच्या सहभागाने विधीवत भूमीपूजन आणि श्री नारायणराव दिवेकर यांचे शुभ हस्ते शिलान्यासाचा चिरा बसवून करण्यात आला.अत्यंत उत्साही वातावरणात मणचे गांवी हायस्कूल भागशाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची मुहुर्तमेढ रोवली गेली. या महत्वपूर्ण सोहळ्यास सर्वश्री वि.स.मराठे, ज.दा.लेले,अच्युत राणे,शिवाजी राणे,विनायक कृष्णाजी लेलें सह मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेली पाहुणे मंडळी उपस्थित होती. मंडळाच्या स्थानिक समितीचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय श्री.बापुसाहेब गोखले,श्री.अरविंद ठाकुरदेसाई, समस्त मणचेकर ग्रामस्थ आणि मणचे ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी यांनी सोहळ्याचे शानदार आयोजन केले होते.   

        मंडळाच्या निविदा प्रक्रियेनुसार कै. भाऊसाहेब काळे भागशाळेच्या नियोजित बांधकामाचे कंत्राट मुटाटचे श्री सुरेश रायकर यांना देण्यात आले. प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी म.रा.वि. बोर्डाच्या विद्युत वाहिन्या आणि अन्य अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी मंडळास सुमारे २५,०००/- रुपये खर्च करावा लागला.

      समस्त मणचे ग्रामस्त आणि मंडळ सभासदांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून सुंदर अशी आठ वर्ग खोल्यांची नूतन इमारत मे २००५ मध्ये बांधून पूर्ण झाली. बांधकामास सुमारे रु.२२ लाखांचा खर्च झाला. दिनांक १२ जून २००५ रोजी डॉ. राम काळे, डॉ.घन:श्याम काळे यांचे शुभ हस्ते कै. भाऊसाहेब काळे भागशाळा इमारतीचा दिमाखादार उद्घघाटन सोहळा झाला.तसेच वर्ग खोल्यांसाठी देणग्या देणार्‍या देणगीदारांच्या हस्ते नामकरण फलकांचे अनावरण करण्यात आले. एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्याने मंडळाच्या इतिहासात ठळकपणे ही घटना अधोरेखित करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. त्याचबरोबर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे श्रम सार्थकी लागल्याने कृतकृत्य वाटत आहे. दिनांक ८ ऑगस्ट २००६ पासून नवीन इमारतीत भागशाळेचे इयत्ता ८ वी ते इयत्ता १० चे वर्ग भरु लागले.

      कै.भाऊसाहेब काळे  भागशाळा इमारत बांधल्यानंतर मंडळाने मुटाट परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्याच्या पर्यायावर विचार सुरु केला. सन २००८ सालच्या हायस्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी ग्रामस्थांबरोबरच्या बैठकीत या पर्यायावर सखोल चर्चा झाली. मुटाटचे आराध्यदैवत श्री स्थानेश्वराच्या दर्शनासाठी मुंबईकर मंडळी गेली असता गप्पागोष्टींच्या ओघात श्री अच्युतराव राणे यांनी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाबद्दल विचारणा केली. कनिष्ट महाविद्दयालय विनाअनुदान तत्वावर चालवावे लागणार असल्याने घसघशीत देणगी मिळाल्यास कनिष्ट महाविद्दयालय सुरु करावयाचा मंडळाचा विचार असल्याचे कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यानी सांगितले. श्री अच्युतराव राणे यांनी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाबद्दलची माहिती मुटाटचे सुपुत्र श्री रावजी शिवराम राणे यांच्या कानावर घातली. श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे यांनी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्यासाठी मंडळास आश्वासक पाठिंबा दिला. तसेच कनिष्ट महाविद्यालयाच्या खर्चाचा बोजा उचलण्याचे त्यांनी मान्य करुन विनाविलंब रुपये ११,००,००० (रुपये अकरा लाख मात्र) ची भरीव देणगी दिली.

        श्री नाना राणे यांचे आर्थिक पाठबळ व परिसरातील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २००९-१० पासून मुटाट येथे कै.सौ.जानकी शिवराम राणे कनिष्ट महाविद्दालयाच्या ( प्रस्तावित) विनाअनुदानीत वाणिज्य शाखेचा ११ वीच्या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. कनिष्ट महाविद्दयालयास शासनाची मान्यता मिळेल अशी खात्री होती. परंतु मंडळाने प्रयत्न करुनही शासकीय धोरणांमुळे मान्यता मिळू शकली नाही. इयत्ता अकरावी वाणिज्यचा वर्ग २००९-१० या वर्षी चालवून इयत्ता बारावीसाठी २०१०-११ मध्ये फणसगांव शिक्षणसंस्थेमार्फत विद्यार्थ्थांना बोर्डाच्या परीक्षेला बसविले. आम्हाला सहकार्याचा हात पुढे करुन आमच्या विद्दयार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होण्यासाठी सर्व मदत केल्याबद्दल आम्ही फणसगांव शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री. सहदेव नारकर व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले. एक पाऊल मागे घ्यावे लागले तरी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्यास शिक्षण खात्याची परवानगी मिळविण्यासाठी मंडळाचे आणि श्री नाना राणे यांचे अखंड प्रयत्न सुरु झाले.

       मुटाटला कनिष्ट महाविद्यालय सुरु करायचेच असा दृढ निश्चय करुन सारे पदाधिकारी व कार्यकार्ते उत्साहाने कामास लागले. कनिष्ट महाविद्दयालयासाठी सुसज्ज जागा, संगणक प्रशिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम, हायस्कूलची वाढती विद्दयार्थी संख्या आणि भविष्यातील सर्वांगीण वाढ विचारात घेऊन मंडळाने मुटाट हायस्कूल इमारत परिसरात विस्ताराची योजना आखली. डॉ.श्री.र.लेले हायस्कूल इमारतीच्या दक्षिणेला मागील बाजूस आठ खोल्यांची एक मजली इमारत बांधण्याचे ठरले. प्रस्तावित इमारतीच्या आराखडयाच्या शासकीय मान्यतेनंतर रविवार दिनांक ४ जानेवारी २००९ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे , कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री. मनोहरपंत लेले यांचे उपस्थितीत विश्वस्त व उपाध्यक्ष श्री. विष्णु सखाराम मराठे व मुख्य कार्यवाह श्री. जगन्नाथ दामोदर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. भूमीपूजन सोहळ्याचे पौरोहित्य आदरणीय श्री विनुभाऊ मराठे यांनी केले.या सोहळ्यास सर्वश्री शिवाजी राणे,राजेश राणे,अच्युतराव राणे,सदानंद पाळेकर, बाळकृष्ण पाळेकर, विठोबा प्रभु,सुभाषचंद्र परांजपे,सुरेश पाळेकर,सुरेश रायकर यांचेसह स्थानिक समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.     

        भूमीपूजन सोहळ्यानंतर नियोजित बांधकामासाठी श्री सुरेश रायकर यांना बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. पावसाळा संपल्यावर इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्याचे नक्की झाले. दिनांक २७ दिसेंबर २००९ या दिवशी सकाळी ९ वाजता श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे,अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते कोनशिला बसविण्यात येऊन बांधकामाचा शुभारंभ झाला. या संस्मरणीय सोहळ्यास कार्यकारी समितीचे पदाधिकारी सर्वश्री शिवाजी राणे, विनायक लेले, राजेश राणे, जितेंद्र साळुंके यांचेसह मुंबईहून आलेल्या पाहुण्यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. स्थानिक समिती सदस्य सर्वश्री अच्युत राणे, सुभाषचंद्र परांजपे, सदानंद पाळेकर, सुरेश पाळेकर, विठोबा प्रभु, देवगड पंचायत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्री जनार्दन तेली, स्थानिक समिती सभासद, प्रमुख ग्रामस्थ व अन्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीने समारंभाची शोभा वाढली. कोनशीलान्यास आणि बांधकाम शुभारंभाचा हा संस्मरणीय सोहळा दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहील.     

        बांधकाम शुभारंभप्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभारंभाच्या देणग्या देऊन तथा जाहीर करुन आमचा उत्साह  द्विगुणित केला. बांधकामास सुरुवात झाल्यावर देणगीदारांकडून सुरु झालेला अर्थसहाय्याचा ओघ सुरु राहून मंडळास देणग्यां मिळत राहिल्या. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मनोहर गोविंद लेले आणि कुटुंबीय, श्री रमेश अच्युत घाटे आणि कुटुंबीय, श्री यशवंत केशव लेले, श्री विनायक कृष्णाजी लेले आणि कुटुंबीय, सौ सुशीला व श्री नारायण गणेश परांजपे आणि कुटुंबीय, श्री बळवंत शिवराम राणे आणि कुटुंबीय, श्री विवेक विष्णु केळकर आणि कुटुंबीय, श्री अभिजित राणे मित्रमंडळ आणि माजी विद्यार्थी संघ यांचेकडून प्रमुख देणग्या प्राप्त झाल्या. संपूर्ण इमारतीच्या बांधकामास आवश्यक सोयींसह सुमारे २८ लाख रुपये एवढा खर्च झाला. मार्च २०१२ अखेर कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या शुभ मुहुर्तावर सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमुख देणगीदारांच्या हस्ते नूतन वर्गकक्षांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले (याबद्दलचा  तपशील पुढे दिला आहे).

      सन २०११-१२ या वर्षी सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने नूतन कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे उर्वरीत  बांधकाम, परिसर कंपाऊंडचे बांधकाम, रंगमंचाचे निर्माण, हायस्कूल संकुलास व नूतन इमारतीस नांव देण्याच्या उद्देश्यासाठी देणग्या जमविण्याचा निर्णय मंडळाने घेतला. कार्यकारी समिती पदाधिकारी डॉ. हेमलता माधव पुरंदरे यांनी आवहनास प्रतिसाद देऊन विद्दयानगरी संकुलाच्या नामकरणासाठी रुपये ८,००,०००/- (रुपये आठ लाख मात्र) ची घसघशीत देणगी जाहीर करुन शुभारंभाची रक्कम मंडळाकडे जमा केली . तसेच मणचे येथिल कै. भाऊसाहेब काळे भागशाळेच्या पोषण आहार खोलीच्या बांधकामासाठी श्रीमती शांता काळे यांनी रुपये ७५,००० (रुपये पंच्याहत्तर हजार मात्र) ची आश्वासक  देणगी दिली. तसेच सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित होणार्‍या ‘झेप’ स्मरणिकेत छापण्यासाठी अनेक जाहिरातीं विश्वस्त श्री अनंतराव लेले, सुवर्ण महोत्सव समिती अध्यक्ष श्री बळवंतराव राणे आणि श्री अभिजित राणे यांनी मिळवून दिल्या. आमचे माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवर ग्रामस्थांनीही अर्थसाह्य दिले. अशाप्रकारे सभासद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निधी संकलनासाठी अनंत परिश्रम घेतल्याने मान्यवर देणगीदार, हितचिंतक व कार्यकर्त्यांकडून भरघोस अर्थसहाय्य प्राप्त झाल्याने उद्देश्यपूर्तीसाठी निधीची चणचण भासली नाही.

दमदार वाटचालीतील मौलिक क्षण सुवर्ण महोत्स समारोह

      सन २०११-१२ या सुवर्ण महोत्सवी वर्षात कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल आणि कै. भाऊसाहेब काळे भागशाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाने प्रसिध्द केलेल्या सुवर्ण महोत्सवी ‘झेप’ स्मरणिकेत मंडळ स्थापनेपासून ते ३१ मार्च २०१२ पर्यंतच्या वाटचालीतील सर्व महत्वाच्या घटनांचा आढावा सन्माननीय सभासद आणि हितचिंतकांना सादर करण्यात आला होता. यापुढे प्रत्यक्ष सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुभप्रसंगी आयोजित कार्यक्रमांचे आणि प्रमुख घटनांचे संक्षिप्त वार्तांकन आपल्या  सर्वांच्या माहितीसाठी सादर करीत आहोत.    

        मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचा दिमाखदार सुवर्णमहोत्सवी सांगता समारोह दिनांक २ मे २०१२ ते ४ मे २०१२ या तीन दिवसात अतिशय उत्साहाने आणि आनंदात पार पडला. मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाटचालीतील महत्वाचा मैलाचा दगड आणि कार्यपूर्तीचा सुवर्ण टप्पा अशी या दिमाखदार सोहळ्याची सुवर्णाक्षरात नोंद व्हावी असे दृष्ट लागण्यासारखे सुनियोजित आयोजन करण्यात आले होते. वर्षभर पार पडलेल्या विविध उपक्रमांसह सुवर्ण महोत्सवाच्या सुनियोजित आखणी आणि सादरीकरणाचे इंद्रधनुष्य सुवर्णमहोत्सव समितीने लिलया पेलले याबद्दल सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री बळवंतराव राणे, सर्व पदाधिकारी व सभासदांचे मन:पूर्वक आभार मानून सुवर्ण महोत्सव सांगता समारोहाच्या वार्तांकनाला सुरुवात करतो.

सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुभारंभ – दिवस पहिला: बुधवार दिनांक २ मे २०१२:

         सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्याच्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राची शुभ सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मा. श्री रमेशराव घाटे हे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक श्री रमेश ताम्हनकर यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे पुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले.

      प्रमुख पाहुण्या साहित्यिका मा.सौ. वृंदा कांबळी यांचे हस्ते मंडळाच्या ‘झेप’ या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा व्यासपीठावरील सर्वश्री रमेशराव घाटे, विष्णु (दादा) सखाराम  मराठे, विश्वासराव पाळेकर, जगन्नाथ दा.लेले, शिवाजी राणे, विनायक लेले, जितेंद्र साळुंके, सुभाषचंद्र परांजपे, विवेक केळकर, किशोर प्रभू, राजेश राणे, अच्युतराव राणे, रावजी (नाना) राणे, बळवंतराव राणे,  मोरेश्वर गोविंद लेले,  बापुसाहेब गोखले, सुरेश रायकर तसेच डॉ.हेमलता पुरंदरे, सौ.मीरा पिंपळस्कर,श्रीमती शांता काळे, सरपंच सौ.प्रणाली भेकरे, इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात पार पडला.

      सुवर्ण महोत्सव समारंभाचे औचित्य साधून मंडळाच्या कामकाजात महत्वपूर्ण योगदान देऊन भरीव कार्य करणार्‍या श्री दादा मराठे, श्री ज.दा.लेले, डॉ.हेमलता पुरंदरे, श्री बापुसाहेब गोखले आणि श्रीमती शांता काळे या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी श्री कृष्णाजी विठ्ठल लेले व श्री मनोहर गोविंद लेले हे वयपरत्वे समारंभास हजर राहू शकले नसल्याने त्यांचा सत्कार मुंबईत कार्यकारी समितीच्या सभेत करण्याचे ठरले.

      डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या म्हणजेच मुटाट विद्यामंदिर मुटाटच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी सर्वश्री रघुनाथ पाळेकर, जयंत परांजपे,भगवान पाळेकर,सुभाषचंद्र परांजपे,मधुकर तेली यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. तसेच माजी मुख्याध्यापक श्री सीताराम रा.प्रभूदेसाई व माजी शिक्षक श्री जगन्नाथ तु.बांडे यांचाही सत्कार करण्यात आला.

      प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी वर्षात हायस्कूलमध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुण्या मा. सौ. वृंदा कांबळी यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तसेच सुवर्णमहोत्सवाच्या प्रमुख सोहळ्यास अनुलक्षून ओघवत्या शैलीत उद्बोधक भाषण केले. शाळेचा नयनरम्य परिसर व सर्वसंबंधितांचा भक्कम आधार यामुळे संस्था आपल्या उद्दिष्टांची निश्चितच पूर्ती करेल अशी शुभेच्छा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ.हेमलता पुरंदरे, सर्वश्री ज.दा लेले,दादा मराठे, बापुसाहेब गोखले,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर आणि अध्यक्ष श्री रमेश घाटे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

         वरील कार्यक्रमानंतर डॉ.हेमलता माधव पुरंदरे (लेले) विद्यासंकुलाच्या नामफलकाचे श्री मधुकर शंकर तेली यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्व निमंत्रित पाहुण्यांच्या समवेत विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

      दुपारच्या सत्रात, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे, येथिल शालेय पोषण आहार खोलीचे उद्घाटन मा. श्रीमती शांताबाई काळे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमास मंडळ पदाधिकारी, मुटाट व मणचे स्थानिक समितीचे सदस्य, मणचे गावचे सरपंच,पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती घाडी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री बापूसाहेब गोखले यांनी शाल व श्रीफळ देऊन श्रीमती शांता काळे, अध्यक्ष श्री रमेशराव घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर,मुख्य कार्यवाह श्री जगन्नाथ दा.लेले यांचा सत्कार केला. सर्वश्री शिवाजी राणे, विनायक लेले, राजेश राणे, माजी शिक्षक श्री बांडेसर, माजी मुख्याध्यापक श्री प्रभूदेसाई सर इत्यादि मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. मणचे हे मंडळाचे अभिन्न अंग असून मंडळाच्या वाटचालीत आप-पर भाव केला जाणार नाही याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांनी दिली. श्रीमती शांता काळे, सर्वश्री बापुसाहेब गोखले,ज.दा.लेले, प्रभूदेसाई सर, संदिप सातवळेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

      रात्रीच्या सत्रात डॉ.श्रीधर रघुनाथ  लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा तसेच मुटाट, पाळेकरवाडी, वाघोटण, सडेवाघोटण येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ब्राम्हणवाडी महिला मंडळाने एक छान नाटक सादर केले.

सुवर्ण महोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस दुसरा : गुरुवार दिनांक ३ मे २०१२:

      कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. माजी आमदार मा.श्री अमृतराव राणे, मा. श्री जनार्दन तेली आणि अन्य मान्यवरांनी दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मुख्याध्यापक श्री रमेश ताम्हनकर यांनी व्यासपीठावरील तसेच सभामंडपातील मान्यवरांचे पुष्प देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले. नूतन कनिष्ठ महाविद्यालय इमारतीच्या पायर्‍यावर मा.श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांनी इमारतीत प्रवेश केला. नूतन कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन मा.श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इमारतीच्या भूमीपूजनाच्या पाटीचे अनावरण श्री रावजी शिवराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याच समारोहात पुढीलप्रमाणे आठ वर्गखोल्यांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले.
१. कै.गणेश आप्पाजी परांजपे स्मृतीकक्ष-उद्घाटक श्री केशव सुभाषचंद्र परांजपे/ श्री सुभाषचंद्र परांजपे
२. कै अच्युत भालचंद्र घाटे व श्रीमती सुमती अच्युत घाटे स्मृतीकक्ष-उद्घाटक डॉ.दिलीप अच्युत घाटे
३. कै.शिवराम बळवंत राणे स्मृतीकक्ष-उद्घाटक सौ.व श्री मधुकर परब (श्रीमती सुचेता राणे)
४. कै. गोविंद विष्णु लेले व कै.श्रीमती भागीरथी गोविंद लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री मोरेश्वर गोविंद लेले
५. माजी विद्यार्थी कक्ष- उद्घाटक सर्व माजी विद्यार्थी
६. कै. केशव बाबुराव लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विनायक कृष्णाजी लेले
७. कै.रत्नाकर शिवराम राणे स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री अच्युतराव राणे
८. कै.वि.गो.केळकर व श्रीम.विनिता वि. केळकर स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विकास,विवेक,विनय केळकर बंधू

      या शुभप्रसंगी प्रमुख देणगीदार सर्वश्री रावजी शिवराम (नानासाहेब) राणे, बळवंत शिवराम राणे,विनायक लेले,केळकर बंधू,मोरेश्वर लेले, डॉ.दिलीप घाटे, केशव सुभाष परांजपे,तसेच सौ.मीरा पिंपळस्कर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्वश्री सुरेश रायकर,किरण प्रभू,अच्युतराव राणे,राजेश राणे,जितेंद्र साळुंके,शिवाजी राणे,किशोर प्रभू,बाळकृष्ण पाळेकर,केशव साळुंके,विठोबा प्रभू,रघुवीर लेले,श्रीकृष्ण सोवनी,चंद्रकांत घाडी,अमोल पाळेकर,सत्यवान परब,प्रमोद चव्हाण,चंद्रकांत पाळेकर, सौ.गीता सोवनी,सरपंच सौ. प्रणाली भेकरे यांचेसह मंडळाचे अनेक आजी-माजी सभासद, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष श्री बळवंतराव राणे आणि इतर सदस्य, माजी विद्दयार्थी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री दिलीप घरपणकर सर यांचा खास सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे मा. श्री अमृतराव राणे यांनी आपले मौलिक आणि मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

      कार्यक्रमानंतर निमंत्रित पाहुण्यांसह विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांच्या सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्रौ ठिक १०.०० वाजता नवलादेवी नाट्यमंडळ सडेवाघोटण यांनी देवाघरचा न्याय ही नाट्यकृती सादर केली.

सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस तीसरा : शुक्रवार दिनांक ४ मे २०१२:

      कार्यक्रमाची सुरुवात ठिक १०.०० वाजता सत्यनारायण महापूजेने झाली. पूजाविधी सुरु असताना ११.०० वाजता फुड फेस्टीवलचे उद्घउटन अध्यक्ष श्री रमेशराव घाटे यानी केले.

      पंचक्रोशीतील सुमारे २२ गृहिणींनी स्वादिष्ट पाककृती सादर केल्या होत्या. फूड फेस्टीवलमधील पाककृतींचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. सत्यनारायण महापूजेनंतर सुमधुर चक्रीभजनाचा कार्यक्रम पार पडला.

      सायंकाळच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडल्याने तीन दिवस रंगलेल्या सुवर्णमहोत्सवाची सांगता संस्मरणीय झाली.        

              सुवर्णमहोत्सव समितीचे लक्षवेधी कार्य: सुवर्ण महोत्सवाचे आयोजन, सुनियोजित आखणी आणि सादरीकरणाचे लक्षवेधी काम अध्यक्ष श्री. बळवंतराव राणे, उपाध्यक्ष सर्वश्री अच्युतराव राणे, सदानंद पाळेकर आणि रमेश ताम्हनकर, सचिव श्री दिलीप तुकाराम घरपणकर, खजिनदार सर्वश्री सुभाषचंद्र परांजपे आणि रघुनाथ पाळेकर, सहसचिव सर्वश्री लक्ष्मण घाडी आणि रघुवीर लेले, सल्लागार सर्वश्री सीताराम प्रभुदेसाई,जगन्नाथ लेले, मधुकरराव मराठे, जनार्दन तेली,मोरेश्वर गोखले आणि बाळकृष्ण पाळेकर यांचेसह सर्व सदस्यांनी  लिलया पेलले. या मनोवेधक कार्यासाठी सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री बळवंतराव राणे, सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे मन:पूर्वक आभार. तसेच या संस्मरणीय सोहळ्यात उपस्थिती नोंदवून संस्मरणीय करण्यात हातभार लावलेल्या सर्व विध्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि सर्व स्नेहीजनांचे मन:पूर्वक आभार.

      एका अप्रिय घटनेचे वार्तांकन: सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाचे कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर कार्यपूर्तीच्या आनंदात मुंबईस परतणारे कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर आणि खजिनदार श्री विनायक लेले यांच्या मोटारीला संगमेश्वरजवळ गोळवली येथे दिनांक ४ मे २०१२ रोजी दुपारी ३.४५ वाजता दुर्दैवाने मोठा अपघात झाला. मोटारीतील चौघांपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने मंडळाचे कार्याध्यक्ष आणि खजिनदार या अपघातात गंभीर दुखापती होऊनही वेळेवर मिळालेल्या पोलीसांच्या मदतीमुळे आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारांमुळे प्राणघातक संकटातून बचावले. अकस्मात कोसळलेल्या या जीवघेण्या संकटप्रसंगी सन्माननीय सभासद, हितचिंतक आणि  ग्रामस्थांच्या वेळेवर मिळालेल्या आश्वासक मदतीमुळे आणि शुभेच्छांमुळे मोठे संकट टळले. तथापि  अपघातातील गंभीर दुखापतींवरील वैद्यकीय उपचारांस वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लागल्याने मंडळाच्या कामकाजात थोडी शिथिलता आल्याने हिशेब वेळेवर सादर करता आले नाहीत.

      सुवर्णमहोत्सवी वाटचालीतील एक ठळक घटना: मंडळाच्या मालकीच्या डॉ. श्री. र. लेले हायस्कूल इमारतीचा भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ (१.०७ हेक्टर २ आर) तसेच कै.अनंत विठ्ठल लेले यांचेकडून प्राप्त भूखंड सर्वे न.२०२ हिस्सा न. १३ क्षेत्र १५ गुंठे ठिकाण आगार हे दोनही भूखंड शासकीय विलंबामुळे रीतसर मंडळाच्या नावे ७/१२ मध्ये नोंद होऊ शकले नव्हते.कार्यकारी समितीचे माजी खजिनदार व स्थानिक समितीचे कर्तव्यतत्पर सदस्य श्री.अच्युत अर्जुन राणे यांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांस यश येऊन या दोन्ही जमिनी निर्विवादपणे मंडळाच्या मालकीच्या झाल्या.श्री अच्युतराव राणे आणि त्यांना सहाय्य करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत.

सुवर्ण महोत्सव समारोहानंतरचे महत्वाचे उपक्र आणि उल्लेखनीय घडामोडी:

      उल्लेखनीय उद्देश्यपूर्ती – कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी: मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास शासन निर्णय क्र.स्वयं अ/२०१३/८८५/१३ माशि-१ चे सहपत्रान्वये स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे दर्जावाढ कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात मंडळाचा कै.सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय असा प्रस्ताव मंजूरीसाठी दाखल करण्याचा ठराव असताना अनवधानाने आमच्या पदाधिकार्‍यांकडून दर्जावाढ कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्यालय असा प्रस्ताव दाखल केला गेल्यामुळे तशी मंजूरी मंडळास मिळाली. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे दर्जावाढ कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्यालय (प्रस्तावित कै.सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय) सुरु केले. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक ३ जुलै २०१३ रोजी प्रमुख देणगीदार माननीय श्री रावजी शिवराम राणे उर्फ श्री नाना राणे यांचे हस्ते आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या समारंभास सेवानिवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. कनिष्ठ महाविद्दयालयाच्या इयत्ता ११ वीच्या कला व वाणिज्य संयुक्त प्रथम वर्गाची विद्दयार्थी संख्या ६१ होती.

        सुवर्ण महोत्सव पार पडल्यानंतर, मंडळासाठी कार्य केलेल्या अनेक मेहनती आणि सचोटीच्या कार्यकर्त्यांतून श्री सुभाषचंद्र गणेश परांजपे आणि श्री संजय दत्ताराम टाकळे यांचे योगदान मंडळासाठी बहुमोल असल्याचे त्यांच्या कार्याने सिध्द केले. याच दरम्यान श्री धनंजय गणेश परांजपे हे मंबईस्थित मुटाटकर मंडळाच्या कार्यधारेत सामील झाले. या सगळ्यांच्या सहाय्याने रेंगाळलेली हिशेबादी कामे नवसंजीवनी प्राप्त झाल्याप्रमाणे मार्गस्थ झाली. परत एकदा सर्वजण कार्यभाराचे ओझे झटकून उत्साहाने कामाला लागले. सभासद बंधु आणि भगिनींनो! आमच्या पूर्वसुरींच्या कार्याची प्रेरक महतीच अशी आहे की, नव्या विचाराचे, नव्या ताकदीचे कार्यकर्ते  अडचणींत संकटमोचक म्हणून पुढे येतात. 

      माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पदार्पण: दिनांक २७ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या हायस्कूल व कनिष्ठ महाविध्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आणि स्नेहसम्मेलनाचे औचित्य साधून निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांचे शुभहस्ते मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या www.mpspm.org या वेबसाईटचे शुभारंभी उद्घाटन करण्यात आले.

            दिनांक ४ नोव्हेंबर २०१५ रोजी मंडळाचे विश्वस्त, माजी कार्याध्यक्ष, जेष्ठ सभासद आणि  आधारस्तंभ  श्री कृष्णाजी विठ्ठल लेले यांचे दु:खद निधन झाले. मंडळाच्या  प्रत्येक संकल्पाबद्दल आणि प्रगतीशील कामाबद्दल कै. कृष्णाजी विठ्ठल लेले यांना खूप आस्था होती. मंडळाची स्थापनेपासूनची नेत्रदीपक प्रगती, निरपेक्ष वृत्तीने कार्य करणार्‍या मंडळाच्या सदस्यांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे झाल्याचे ते नेहमी म्हणत असत. मंडळासाठी त्यांनी केलेले भरीव कार्य आणि त्यांच्या प्रेरक आठवणींचे स्मरण कार्यकर्त्यांना नेहमी स्फूर्ती देत राहील.

      डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलमध्ये दिनांक ३० डिसेंबर २०१५ रोजी पार पडलेल्या संयुक्त सभेने किचन शेड, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय इमारतीत ईलेक्ट्रीक फिटींग, शुद्ध पाणी पुरवठ्याची सोय करणे, मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधणे आणि मंडळाची बोअरवेल खणणे या प्राधान्य कामांना मंजुरी दिली. तसेच निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार मुख्य कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे यांनी त्यांचे बंधू श्री धनंजय गणेश परांजपे यांच्याद्वारे मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचेशी संपर्क साधून मंडळाच्या प्राधान्य कामांना निधी मंजूर करण्याची विनंती केली. मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी . असोसिएशनने मंडळाच्या विनंती अर्जास (३० डिसेंबर २०१५) आश्वासक प्रतिसाद देत मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी सुमारे पाच लाख आणि ईलेक्ट्रिक फिटिंगसाठी सुमारे दोन लाखांचा निधी सत्वर मंजूर केला.

      डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण: मंडळाचे आद्य संस्थापक डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पुतळा हायस्कूलात स्थापन करावा अशी कार्यकारी समिती पदाधिकारी आणि सदस्यांची मागणी होती. विश्वस्त श्री.अनंतराव लेले, कार्यकारी समिती सदस्या डॉ. श्रीम. हेमलता पुरंदरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पुतळा स्थापनेचा आग्रह धरला. सर्वांच्या उस्फूर्त भावना लक्षात घेऊन, मंडळाच्या दिनांक ३० डिसेंबर २०१५ च्या संयुक्त सभेने अर्ध पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या जन्मदिनी दिनांक १ मार्च २०१६ रोजी मा. जनार्दन तेली यांचे शुभहस्ते मुख्याध्यापक कक्षालगतच्या मध्यवर्ती भिंतीवर अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ह्रद्य प्रसंगी मोठ्या संख्येने सभासद आणि ग्रामस्थ हजर होते.

      सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन: मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात सांस्कृतिक भवनासाठी १० लाखांचा  निधी मंजूर झाला. या कामी माजी मुख्य कार्यवाह श्री ज.दा.लेले आणि श्री धनंजय गणेश परांजपे यांनी विशेष खटपटी केल्या. सांस्कृतिक भवनाची पायाभरणी आणि भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक १९ मार्च २०१६ रोजी मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा.साळसकर, सर्वश्री जगन्नाथ लेले, शामराव लेले, शिवाजी राणे, प्रकाश भेकरे, विजय चिरपुटकर, सिताराम प्रभू, प्रशांत खरबे, मनोहर तेली, मधुकर घाडी,सरपंच श्री किरण प्रभू यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते.

      स्वच्छतागृ आणि हायस्कूल इमार ईलेक्ट्रिक फिटिंगचा शालार्पण कार्यक्रम: दिनांक २८ मार्च २०१६ रोजी सकाळी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा, पाणी शुध्दिकरण यंत्राचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक फिटिंगचा शालार्पण सोहळा, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम. एल.पी. असोसिएशनचे मान्यवर प्रतिनिधीं  सर्वश्री टी. व्ही. शहा, एस. व्ही. खोले, भावेश छोटालिया, बिजल शहा, किशोर मर्चंट आणि श्री धनंजय गणेश परांजपे यांच्या हस्ते पार पडला. देणगीदार संस्था प्रतिनिधींचे मंडळाचेवतीने हार्दिक स्वागत करुन शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वच्छतागृहांच्या शालार्पण सोहळ्यास कार्यकारी समिती पदाधिकारी श्री सुभाषचंद्र परांजपे,श्री शिवाजी राणे, श्री अरुण राणे, स्थानिक समिती सदस्य श्री बळवंतराव राणे,शाळा समिती सदस्य,महिला समिती सदस्य, संरपंच श्री किरण प्रभू, उप-सरपंच पाळेकरवाडी श्री गोपाळ पाळेकर ,इंजिनिअर नेने आणि गोगटे, अनेक मान्यवर ग्रामस्थ तसेच डॉ.श्री.र.लेले हायस्कूल आणि कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालायाचे मुख्याध्यापक-प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ बंधु- भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

      दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेने स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाचे कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट असे नामकरण करणारा ठराव पारीत केला. सदर नामकरण ठराव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या शिफारसीसह मा.शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या मंजुरीसाठी दाखल केला होता त्यास त्यांच्या पत्र जा.क्र.३/ कोवि/क.म.ना.ब/२०१७ दिनांक २८ ऑगस्ट २०१७ द्वारे मंजुरी दिली आहे.

डॉ.श्रीम.हेमलता माधव पुरंदरे (लेले) विद्यासंकुलातील विविध विकास कामांची माहिती: डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरातील मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या रु.पाच लाखांच्या निधीत मंडळाने सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजारांची भर घालून सलग 500 वर्ग फुटांच्या सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्ण झाले.

      विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम : दिनांक २८ मार्च २०१६ रोजी विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा शालार्पण सोहळ्याप्रसंगी, मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे मान्यवर प्रतिनिधीं आणि माननीय श्री धनंजय गणेश परांजपे यांनी विद्यार्थी स्वच्छतागृह बांधकामासाठी सुमारे पाच लाखांचा निधी जाहीर केला होता. सदर देणगीतून विद्यार्थी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दिनांक ०६ जानेवारी २०१७ रोजी, पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पारितोषिक विजेते सन्माननीय पाहुणे श्री अण्णासाहेब पाटील, मुख्याध्यापक शिवडाव हायस्कूल यांच्या हस्ते उद्घाटन फित कापून सभासद आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष वापरासाठी शालार्पण करण्यात आले.

      पोषण आहार शेड : शासन मंजूर निधीत संस्थेने लाखाचेवर स्वनिधी वापरुन बांधलेल्या पोषण आहार शेडचे दिनांक ०६.०१.२०१७  रोजी पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर उद्घाटन करुन प्रत्यक्ष वापर सुरु झाला.

        अल्पबचत हॉल: मोडकळीस आलेल्या अल्पबचत हॉलचे निर्लेखन पूर्ण होऊन निर्लेखन मंजुरीतून कॉलेज इमारतीकडे जाण्यासाठी सुमारे १२० फूट लांबीचा व्हरांडा पूर्ण करण्यात आला.

        मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार,डॉ. श्री.र.लेले यांचे पुतळ्याखालील मागील प्रवेशद्वार तसेच कॉलेज इमारतीत जिन्याजवळ सरकती संरक्षक दारे ( कोलॅप्सिबल गेट) बसविण्यात आली.

        डॉ. श्री.र.लेले हायस्कूल,मुटाट येथे बायोमेट्रीक सिस्टिम आधारीत कर्मचारी हजेरीपत्रक कार्यान्वित झाले. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या आरंभापासून डॉ. श्री.र.लेले हायस्कूल,मुटाट येथे दोन डिजटल वर्ग सुरु झाले. डॉ. श्री.र.लेले हायस्कूल आणि कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य  (सं) कनिष्ठ महाविद्यालय इमारत परिसरावर सी. सी. टी. व्ही. कॅमेर्‍यांची निगरानी सुरु झाली.

         खास आभार: मंडळाने मे.अँक्वा बनेव्हलंट फंड, मुंबई यांजकडे आर्थिक मदतीसाठी केलेल्या विनंती अर्जाची त्वरीत दखल घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या देणगीतून विध्यार्थी-विध्यार्थीनींच्या स्वच्छतागृहांसह अनेक कामे पूर्ण करण्यात आली. आम्ही ट्रस्टचे मान्यवर विश्वस्त/प्रतिनिधी यांचे आणि उपाध्यक्ष श्री धनंजय गणेश परांजपे यांचे भरघोस मदतीबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार मानत आहोत.        

         दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ रोजी मंडळाच्या कार्यकारी समितीचे माजी उपाध्यक्ष, जेष्ठ आश्रयदाते श्री नारायण गणेश परांजपे यांचे पुणे मुक्कामी दु:खद निधन झाले. मंडळाच्या प्रगतीशील वाटचालीत आणि डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांचा फार मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने मंडळाने आणखी एक जेष्ठ आधारस्तंभ आणि समर्थ मार्गदर्शक गमावला असून त्यांच्या नसण्याची उणीव कायमची भासत राहील.

        संस्थेच्या बाबतीत असे कडू, गोड, दु:खद प्रसंग अनेकदा येत असतात. त्यांना तोंड देत करीत पुढील वाटचाल करावी लागते. आपल्या मंडळानेही तारीख २२ डिसेंबर २०१७ रोजी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंडळ कार्यकक्षेचा विस्तार करणे सुलभ व्हावे यासाठी घटना आणि नियमांत आवश्यक बदल प्रस्तावित करुन पुनरचित घटना आणि नियमांना सर्वानुमते मंजूरी दिली.

        मंडळाची पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मध्ये संपन्न झाली. या सभेने सन २०१७ ते २०२२ या पांच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारी समिती निवडीसाठी मंडळाने नेमलेले निवडणूक अधिकारी श्री जयंत आत्माराम परांजपे यांनी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून आलेल्या ११ (अकरा) विजयी उमेदवारांची सभेत घोषणा केली. वार्षिक सर्वसाधारण सभेने कार्यकारी समिती निवडीस सर्वानुमते मान्यता दिली.

        मंडळाची छपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी  स्नेहलता राणे हायस्कूल, दादर येथे संपन्न झाली. विषय पत्रिकेप्रमाणे सर्व कामकाज पार पडले.

        पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन: दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडला. मा. डॉ. घन:शाम काळे आणि सौ. काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिनांक २७ डिसेंबर २०१८ रोजी विध्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांच्या आकर्षक सादरीकरणाने स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला.

      या नंतर मंडळाला आणखी एक धक्का सहन करावा लागला. मंडळाचे संस्थापक सदस्य, कार्यकारी समितीचे माजी मुख्य कार्यवाह, जेष्ठ सभासद आणि आधारस्तंभ श्री जगन्नाथ दामोदर लेले  यांचे दिनांक १३  जानेवारी २०१९ रोजी दु:खद निधन झाले. कै. जगन्नाथ दा. लेले यांच्या निधनाने मंडळाने एक समर्थ, संतुलित, प्रेरक आणि आदरणीय सभासद गमावला असून त्यांच्या उपयुक्त मार्गदर्शनाची कायमची उणीव भासत राहील. 

        सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन: शनिवार दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाचे सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. दिपकभाई केसरकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास श्री अरुण दुधवडकर, इतर मान्यवर, संस्थाचालक आणि ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०१९ समारोह :  मंडळाचे अध्यक्ष श्री  विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते विधीवत ध्वजारोहन झाले. या प्रसंगी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्गवार उत्तम राष्ट्रभक्ती गीते आणि शौर्यगीते सादर केली. निवडक पारितोषिके आणि शिष्यवृत्त्यांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या  रानभाज्या आणि औषधी वनस्पतींच्या माहितीपूर्ण प्रदर्शनाचे अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.     

       मंडळाची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा:  मंडळाच्या सर्व सभासदांची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,मुटाट, ता.देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, ४१६८०३,  येथे  आयोजित करण्यात आली. सभेस मंडळाचे एकूण ४० सभासद हजर होते. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्त साधून आयोजित पर्ण फुले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांनी केले.

       ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ : डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयात दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत देवगड तालुकास्तरीय ४५ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित  करण्यात आले. सदर प्रदर्शनात देवगड तालुक्यातील १२८ प्राथमिक शाळा आणि हायस्कूलांनी भाग घेतला होता.

        पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या वितरण समारंभ  दिनांक २७ डिसेंबर २०१९: मंडळाचा पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या वितरण समारंभ शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष,श्री सदानंद वामन पवार हे होते. श्री अशोक मनोहर देसाई, सौ. आकांक्षा अशोक देसाई, श्री रमेश रामचंद्र भिडे आणि श्री काशिनाथ रत्नोबा पाळेकर हे हास्कूलचे माजी विध्यार्थीं, सन्माननीय पाहुणे म्हणुन उपस्थित होते. दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी विध्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा  बहारदार कार्यक्रम  पार पडला.    

       करोना विषाणु संसर्ग संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर व्यवस्थापन संचालन सहभाग: मे २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत वैश्विक महामारी कोरोनाच्या संसर्ग प्रकोपाच्या काळात मंडळाने उस्फूर्तपणे संकुलातील जागा शासकीय आरोग्य यंत्रणेला दिली. मा. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशानुसार खंबीरपणे काम करुन, परोपकारी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. मंडळ सहभागाने डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट आणि कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथे शासन पुरस्कृत संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर व्यवस्थित सुरु राहिले. कोरोना संकट काळात आपल्या मूळ गांवी परतलेल्या पंचक्रोशीतील शेकडो चाकरमान्यांना या सुविधेचा उपयोग झाला. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या संभाव्य संसर्गास न जुमानता क्वारंटाईन सेंटरमधील काम अतुलनीय धैर्याने केले. मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांचा या कार्यातील सकारात्मक योगदानाचा गौरव करीत आहे.

       वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१: कोरोना प्रतिबंधांचे पालन करुन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.  कार्यक्रमास सर्वश्री विजय पांगम, धनंजय परांजपे, शिवाजी राणे, सुभाषचंद्र परांजपे, जितेंद्र साळुंके,रघुनाथ पाळेकर,बाळकृष्ण पाळेकर,अरविंद ठाकूरदेसाई, डॉ.विनय केळकर, डॉ.दिलीप पाळेकर आणि सौ.गीता सोवनी हे मान्यवर उपस्थित होते. मंडळाची ५८ वी (अठ्ठावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट , येथे  आयोजित करण्यात आली होती. सभेस एकूण २९ सभासद हजर होते.सभेचे कामकाज विषयपत्रिकेप्रमाणे निर्वेध पार पडले. त्यानंतर मंडळाच्या ध्येय आणि धोरणांशी संबंधित आणि येणार्‍या हीरक महोत्सवी वर्षाच्या पूर्व तयारीसंबंधात सूचना मांडण्याची सभासदांना परवानगी देण्यात आली. सर्व सभासदांनी  हीरक महोत्सवी वर्षाच्या पूर्वतयारीसाठी “हीरक महोत्सवी समिती”  गठित करावी व त्या समितीमार्फत हीरक महोत्सवाची रूपरेषा ठरवून महोत्सवाची सुरूवात करावी असे मत मांडले. इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा, विचारविनिमय होऊन आभार , चहापान व अल्पोपहारानंतर सभेचे कामकाज संपले. 

      श्री मनोहर गोविंद लेले यांचे दु:खद निधन:  हीरक महोत्सवाचे नियोजन चालू असतांना मंडळास फार मोठा आघात सहन करावा लागला. विद्यमान कार्यकारी समिती सदस्य, माजी उपाध्यक्ष, माजी कार्येपाध्यक्ष, जेष्ठ सभासद आणि आधारस्तंभ श्री मनोहर गोविंद लेले  यांचे दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी दु:खद निधन झाले. कै. मनोहर गोविंद लेले यांच्या निधनामुळे मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची अपरिमित हानी झाली असून मंडळावर वज्राघात झाला आहे. मंडळाच्या प्रगतीशील वाटचालीत आणि डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांचा फार मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने मंडळाने एक समर्थ, संतुलित आणि बहुआयामी लोकप्रिय आधारस्तंभ गमावला असला तरी त्यांचे आदर्श कार्य मंडळाच्या सभासदांना आगामी वाटचालीत कायमच मार्गदर्शक प्रेरणा देत राहील.

      कै. मनोहर गोविंद लेले यांच्या कार्याला प्रणाम करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी मंडळाने २ मे २०२१ रोजी सर्व सभासदांची ऑनलाईन शोकसभा आयोजित केली होती. स्मरण सभेला उपस्थित मान्यवरांनी दुखवटा व्यक्त करताना कै. मनोहर गोविंद लेले यांच्या हृद्य आठवणी जागविल्या. शोकसभेच्या शेवटी सर्व मान्यवर सभासदांनी कै. मनोहर गोविंद लेले यांच्या कार्याला प्रणाम करुन सद्गदित अंत:करणाने भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

        श्री विष्णु सखाराम मराठे यांचे दु:खद निधन:  हीरक महोत्सवाचे नियोजन चालू असतांना श्री विष्णु सखाराम मराठे यांच्या दु:खद निधनाचा धक्का सहन करावा लागला. मंडळ संस्थापक सदस्य, आधारस्तंभ, मार्गदर्शक, कार्यकारी समितीचे माजी मुख्य कार्यवाह, माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त अशी अनेक पदे भूषविलेले, मंडळाची कार्ये आणि उद्दिष्टांच्या काटेकोर अंमल बजावणीत उभी हयात प्रयत्न करणारे, आपल्या सर्वांचे आदर्श श्री विष्णु सखाराम मराठे उर्फ दादा मराठे यांचे शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी मुटाट येथे दु:खद निधन  झाले. मंडळासाठी हा वज्राघात आहे. कै.विष्णु सखाराम मराठे उर्फ दादांच्या निधनामुळे मंडळाच्या स्थापनेचा शिलेदार, प्रगतीसाठी झटणारा व्रतस्थ, मंडळाची इत्यंभूत माहिती असणारा जेष्ठ मार्गदर्शक, सर्वांना एकत्र ठेवणारा, स्फूर्ती देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा वडीलधारा दुवा आज आपल्यात नाही हे सत्य पचविणे कठीण आहे.

        मंडळाचे सर्व सभासद, हितचिंतक, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कै. विष्णु सखाराम मराठे  यांच्या पुण्यात्म्यास शांती आणि सद्गती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केलेल्या ऑनलाइन शोकसभेत भावपूर्ण आदरांजली वाहिली.

हीरक महोत्सवी वर्षातील उल्लेखनीय कार्यक्रम:

मोफत आरोग्य तपासणी शिबीर: नवतरुण विकास मंडळाने रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉ.श्री.र.लेले हायस्कूलमध्ये डॉ.गद्रे आणि सहकार्‍यांच्या मदतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.

देवगड पंचायत समितीची मासिक सभा: हीरक महोत्सवानिमित्त माननीय सभापती श्री लक्ष्मण (रवी) पाळेकर, हीरक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री भास्कर पाळेकर आणि माजी पंचयत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१  रोजी डॉ. श्री.र.लेले हायस्कूलमध्ये देवगड पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.

मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३० डिसेंबर २०२१:  डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै. भाऊसाहेब काळे भागशाळा आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे मा.श्री मोहनराव सावंत, माजी गटशिक्षणाधिकारी, कणकवली आणि उपाध्यक्ष अ.भा.साने गुरुजी कथामाला यांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला. मंडळाचा हीरक महोत्सवी उपक्रम म्हणून कार्यक्रमास उपस्थित, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे नामवंत गुणवान माजी विध्यार्थी सर्वश्री दत्तात्रय सातवळेकर, शेखर परांजपे, डॉ.आदित्य लेले आणि नासीर सोलकर यांचा युवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

मंडळाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ३० डिसेंबर २०२१: कोरोना प्रतिबंधांचे पालन करुन मंडळाची ५९ वी (एकोणसाठावी) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट , येथे  आयोजित करण्यात आली होती. सभेस एकूण १९ सभासद हजर होते. सभेचे कामकाज विषयपत्रिकेप्रमाणे निर्वेध पार पडले. सभेत मंडळाच्या ध्येय आणि धोरणांशी संबंधित आणि  हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या पूर्व तयारी संबंधात सूचना मांडून चर्चा करण्यात आली. सर्व सभासदांनी  हीरक महोत्सव सांगता समारोहाच्या दिनांक २ ते ४ मे २०२२ या तारखांस सर्वानुमते संमती दिली. तसेच समारोहासंबंधीत पूर्वतयारी कामकाजास प्राधान्याने सुरुवात करण्याचे निर्देश दिले. हीरक महोत्सवी समितीच्या व्यवस्थापनाने, हीरक महोत्सव संस्मरणीय व्हावा असे मत मांडले. इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा, विचारविनिमय होऊन आभार, चहापान व अल्पोपहारानंतर सभेचे कामकाज संपले.

        हीरक महोत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्या आगार सर्वे न.२०२ हिस्सा न. १३ क्षेत्र १५ गुंठे या भूखंडाचा सर्वे करुन हद्द निश्चिती करण्याचे काम उपाध्यक्ष श्री शिवाजी राणे आणि मुख्य कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे यांनी इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने पार पाडले. कार्यकारी समितीने दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी सदर भूखंडास भेट देत त्यातील वनसंपत्तीची पाहणी केली. तसेच  या भूखंडाभोवती संरक्षक कंपाऊंड बांधून घेण्याच्या सूचना दिल्या. या कामात सहभागी सर्वांचे आभार मानन्यात आले.

        हीरक महोत्सवी वर्षात माहे मार्च २०२२ मध्ये संस्थेने डॉ. हेमलता मा. पुरंदरे विद्या संकुलाची वीजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च भागेल एवढी देणगी डॉ. हेमलता मा. पुरंदरे यांनी दिली. सौरऊर्जा निर्मितीमुळे संथेच्या लौकिकात हीरकमहोत्सवी  झळाळी प्राप्त झाली असे आम्ही समजतो.

        सन्माननीय सभासद हो! साठ वर्षात आपली संस्था अधिक स्वयंपूर्ण आणि प्रगतीशील झाली आहे. भविष्याचा वेध घेऊन आपले मंडळ आपणां सर्वांच्या सहकार्याने पुढीलप्रमाणे काही नवीन उपक्रम राबवू ईच्छिते.

  • कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा महाविद्यालयीन पदवीपर्यंत विस्तार.
  • परंपरागत शैक्षणिक सुविधांसह ग्रामीण भागाच्या वर्तमान आणि भावी काळातील गरजा पूर्ण करणारे संगणक अभ्यासक्रम, अल्प-दीर्घ मुदतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, तंत्र शिक्षण अभ्यासक्रम, कौशल्याधारित तांत्रिक कोर्सेस स्वबळावर सुरु करण्याची योजना मंडळाच्या  विचाराधीन आहे. गेल्या दोन वर्षात अन्य संस्थांच्या मदतीने काही कौशल्याधारित कोर्सेसचे यशस्वीपणे आयोजन केले त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.
  • आपल्या मंडळाचे केवळ शिक्षण क्षेत्रातील प्रगती एवढेच उद्दिष्ट नसून, ग्रामीण भागातील समाजाच्या सर्वच घटकांना सहजसाध्य शिक्षणाच्या सोयी पुरवून त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याचा ध्येय आहे.

 कार्यगौरव आणि कृतज्ञतास्मरण: मंडळाच्या प्रगतीशील वाटचालीत, सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ आणि त्यानंतरचे विविध उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी माजी अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, विद्यमान अध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष/कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि कार्याध्यक्ष श्री. विनायक लेले यांनी समर्थपणे मार्गदर्शन केले. त्यांस विश्वस्त, पदाधिकारी आणि सदस्य सर्वश्री विष्णु सखाराम मराठे,जगन्नाथ दामोदर लेले, सुभाषचंद्र परांजपे, संजय टाकळे, रघुनाथ पाळेकर, प्रभाकर परांजपे, रामचंद्र वारीक, शिवाजी राणे, जितेंद्र साळुंके, विवेक केळकर, अच्युतराव राणे, राजेश राणे, मुरलीधर राणे आणि किशोर प्रभू यांची अखंड साथ मिळाली. श्री धनंजय परांजपे यांच्या मंडळ कार्य सहभागाने आवश्यक सोयी सुविधांच्या निर्माणास वेग आला. मुटाट स्थानिक समिती आणि मणचे स्थानिक समिती सदस्य सर्वश्री बळवंतराव राणे,नानासाहेब राणे,अभिजित राणे, बाळकृष्ण पाळेकर, भास्कर पाळेकर, सदानंद पाळेकर, अंकुश मोंडे, विलास साळुंके, रविंद्र साळुंके,डॉ.महेंद्र गोविंद साळुंके, बापुसाहेब गोखले, अरविंद ठाकुरदेसाई, विजय पांगम, रमेश भिडे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी मंडळासाठी अनंत परिश्रम घेतले. हीरक महोत्सवप्रसंगी या सर्वांसह अन्य मान्यवरांच्या कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव करतो.

      मंडळाच्या प्रगतीशील वाटचालीत स्थानिक समिती सदस्य, सभासद, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थांनी बरोबरीचा वाटा उचलून लौकिकात भर घातली. हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या सर्वांचे जाहिर ऋण व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. मंडळाने आजवर जे प्रगतीचे टप्पे पार केले ते सभासद व कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे आणि सन्माननीय देणगीदारांच्या निरपेक्ष दातृत्वाच्या बळावर झाल्याचे विनयपूर्वक नमूद करतो. आपले मंडळ कृतज्ञता म्हणून नवीन प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवताना सर्वांना मदतीसाठी आवाहन करण्याचा शिरस्ता कटाक्षाने पाळत आले आहे.  

        सर्वांचे निस्सीम प्रेम आणि विश्वासाच्या जोडीला सन्माननीय देणगीदारांचे पाठबळ लाभत असल्याने, मुटाट परिसरातील विद्यार्थ्यांसाठी माध्यामिक आणि उच्च माध्यमिक (कनिष्ट महाविध्यालयीन) शिक्षणाच्या सोयी निर्माण करता आल्या. पंचक्रोशीच्या शैक्षणिक विकासासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत हे हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधोरेखित करु ईच्छितो. मंडळाचे आधारस्तंभ, हितचिंतक, आश्रयदाते, आजीव सभासद, सन्माननीय देणगीदार, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी आजपर्यंत उत्तम साथ दिली याचे सात्विक समाधान वाटते. हीरकमहोत्सवी वाटचालीच्या या संक्षिप्त वृत्तांकनामध्ये आमच्या ज्या आदरणीय बंधुभगिनींचा, हितचिंतकांचा आणि कार्यकर्त्यांचा नामोल्लेख राहून गेला त्यांचे सदैव ऋणी राहणे पसंत करतो. मंडळाचे शैक्षणिक उपक्रम आणि संकल्प सर्वांच्या सहकार्यानेच सफल झाले आहेत. आमच्या पुढील वाटचालीत, चौफेर विकास, विस्तार आणि यशाची कमान चढती राहील याची कृतज्ञतापूर्वक ग्वाही देतो.

        हीरक महोत्सवाच्या शुभप्रसंगी आमचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि  शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सातत्यपूर्ण योगदानाबद्दल अभिनंदन करताना अत्यानंद होत आहे. डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचा ( मुटाट विद्दयामंदिराचा) प्रथम वर्ग सुरु झाल्यापासून ते हायस्कूल परिपूर्ण होऊन आजच्या नामवंत स्थितीप्रत येण्यात शिक्षक आणि कर्मचार्‍यांचा महत्वपूर्ण हातभार लागला आहे. सन २०१३ मध्ये कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकही विध्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी  मेहनत घेत आहेत. हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या शुभप्रसंगी मंडळाची उद्दिष्टे व संकल्पना प्रत्यक्षात सुफळ संपूर्ण करणारे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व्याख्याते आणि कर्मचार्‍यांना आम्ही उत्तम आरोग्य, सुख-समृध्दी आणि सुयशासाठी शुभकामना देतो.

      अद्ययावत माहितीचे सादरीकरण: सन १९६२-६३ ते सन २०२१-२२ या कालावधीतील डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलची (कै.भाऊसाहेब काळे भागशाळेसह) वर्षवार विद्दयार्थ्यांची संख्या,तुकड्यांची संख्या,शालान्त परीक्षेचा निकाल,मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचार्‍यांची नांवे या बरोबर कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य  (सं) कनिष्ठ महाविद्यालयाची सन २०१३-१४ पासूनची उपयुक्त माहिती या हीरक महोत्सवी स्मरणिकेत  सादर केली आहे. त्याचबरोबर  सन १९६२ ते सन २०२२ या साठ वर्षांतील सर्व अद्ययावत उपयुक्त माहिती मंडळाच्या वेबसाईटवर प्रस्तुत केली आहे. सर्वांना ती उद्बोधक आणि उपयुक्त वाटेल असा विश्वास वाटतो.

        सिंहावलोकन:  मित्र हो! वयाच्या सत्तरीतील सभासद, माजी विध्यार्थ्यीं आणि ग्रामस्थांनी आज मागे वळून सन १९६२ सालापासूनचा मुटाटचा गतकाळ नजरेसमोर आणला तर अनेक आठवणींचा गुंजारव त्यांच्या मनात फेर धरतांना दिसेल. त्यांत सन १९६३ पासून १९६५ पर्यंत दिवसा आणि रात्रीही, गॅस बत्ती (पेट्रो मॅक्स) आणि कंदीलांच्या प्रकाशात चालू असलेले हायस्कूल इमारतीचे बांधकाम, सिमेंट, चुनखडी, रेती आणि खडी मिश्रणाचे गोलाकार रिंगण, मोट ओढणारा बैल डौलाने झुलतानाची दृष्ये असतील. आमच्या ज्या ग्रामस्थांनी हायस्कूल इमारत बांधकामासाठी श्रमदान केले त्यांच्यासाठी ही खास अभिमानाची बाब आहे. आमचे मुख्याध्यापक श्री वामन गणेश नवरे, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विध्यार्थ्यांनीही विद्यामंदिर उभारणीसाठी श्रमदान केले होते हे आज आवर्जून सांगत आहोत. मंडळ पदाधिकार्‍यांसमवेत घाटें, पाळेकर, लेले, परब, राणे, घाडी, साळुंके, प्रभू ,कोळसुमकर, माळी असे पूरक सेवा देणारे ग्रामस्थ आनंदाने संस्थेसाठी झटताना दिसत होते. श्री रामभाऊ भिडे आणि सौ. विजयामामी भिडेंच्या खानावळीत साक्षात अन्नपूर्णेने अनेकांची क्षुधा-शांत केल्याच्या आठवणी आमच्या अनेक माजी विध्यार्थ्यांच्या मनात आजही ताज्या असतील. अन्नछत्र सेवेची ही परंपरा नंतर श्री राजाराम घाटे यांनी पुढे चालू ठेवली. सर्व-सहभागाचा हा भावनात्मक एकोपा मंडळाच्या पुढील वाटचालीत कायम राहिला आहे. आम्ही आजही खात्रीने सांगू शकतो की मंडळामुळे शिक्षणार्थींसह आसपासच्या अनेक खेड्यातील लोक मंडळाशी आणि डॉ.श्री.र.लेले हायस्कूलशी कायमचे जोडले गेले. हे घट्ट रुजलेले आणि जपलेले ऋणानुबंध आम्हाला आज हीरक महोत्सव साजरा करताना खूप मोलाचे वाटत आहेत.

     मान्यवर सभासद आणि प्रिय ग्रामस्थ जनहो! साठ वर्षांपूर्वीच्या मुटाट आणि परिसरात आज लक्षणीय फरक पडला आहे. मणचे- पाळेकरवाडी- मुटाट जोडणारी रिंगणाकृती डांबरी सड़क झाल्याने गावांत एस टी ची ये जा बारामास होऊ लागली आहे. लवकरच मालपे मणचे आणि वाघोटण मुटाट रस्त्याने जोडले जातील. गावातील घराघरांत सन १९७० पासून विजेचे आगमन झाले होते. आता त्यात सौर उर्जेची भर पडली आहे. पाण्याच्या नळ योजनांमुळे कष्टकरी शेतकर्‍यांच्या दैनंदिन जीवनांत पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कमी झाल्याने सुबत्ता व स्वच्छता आली आहे. मुटाट आणि पाण्याचा आटाट हा वाक्प्रचार विस्मृतील गेला आहे. गावोगावी भात सडण्याच्या गिरण्या, पिठाच्या चक्क्या तसेच लाकूड कताईच्या मिलही सुरु झाल्या आहेत. घराघरातील जात्यांची घरघर व मुसळाची टणटण केव्हाच बंद झाली आहे. थोडक्यात मुटाट परिसर सुदृढ विकासाकडे मार्गस्थ झाला आहे.

        आज मुटाट परिसरात अनेक डॉक्टर वैद्दकीय सेवा-सुविधा पुरवत आहेत. अनेक दुर्धर रोगांवर इलाज आणि शुश्रुषा सोयी उपलब्ध आहेत. सरकारी, खासगी हॉस्पिटले आणि दवाखाने आहेत.अभिमानास्पद बाब म्हणजे यातील बहुसंख्य डॉक्टर आमचे माजी विध्यार्थी आहेत. सबपोष्ट ऑफिस, टेलिफोन तसेच भ्रमणध्वनींची सोय झाल्याला अनेक वर्षे लोटली आहेत. रिक्शा, स्कुटर, मोटरसायकल, मोटारी या वाहतुक सोयींबरोबर डिश टीव्ही, केबल टीव्हींचांही प्रसार झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे निर्माण होऊन स्थिरावले आहे. माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थ व शेतकरी बांधव त्याचा लाभ घेत आहेत. उत्पादन वाढीसाठी आधुनिक प्रक्रियांचा अवलंब करत आहे. ग्रामस्थांनी सुंदर, टिकाऊ, चिरेबंदी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकडे लोकांची मानसिकता झुकू लागली आहे. मुटाटात विदर्भ कोकण ग्रामिण बँकेची शाखा आणि मणचेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरु झाल्याने बँका दारात आल्या आहेत.

      सन्माननीय आप्तजनहो! मुटाट परिसराचा ग्रामीण चेहरा मोहरा बदलण्याच्या प्रक्रियेने जो वेग घेतला आहे त्याचे श्रेय प्रामुख्याने  मंडळाच्या विध्यार्थी  हितदक्ष माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या सोयींना जाते.

        मुटाट परिसरातील नोकरदार बांधवांना आमचे आग्रहाचे सांगणे आहे की, त्यांनी वेळोवेळी मुटाटला जरुर यावे. पूर्वीचे मुटाट व आजचे मुटाट यांत बदल झाला आहे का नाही याची खात्री करुन घ्यावी. आमचे मुटाट गांव आणि पंचक्रोशी परिसर ही काही पर्यटन स्थळे नाहीत. पण आमचा आग्रह आहे की शहरातल्या धकाधकीच्या,दाटीवाटीच्या, प्रदुषणयुक्त वातावरणात जीवन घालविणार्‍यां शहरवासियांनी चार दिवसांसाठी मुटाटला यावे. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा नयनरम्य परिसर पाहावा. श्रीस्थानेश्वर, पावणाई, मालवीर, भुतनाथ या ग्रामदैवतांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. मनोहर खाडी किनारी एखादी संध्याकाळ घालवावी.मोकळी व शुध्द हवा घ्यावी.कातळातील झर्‍याच्या निर्मळ पाण्याचे जलपान करावे. निसर्गरम्य नीरव शांतता अनुभवावी. आमची खात्री आहे की जो एक बार यहां आयेगा वो बार बार आतेही रहेगा.

      वाचकहो! मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या व डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या शुभप्रसंगी आमच्या ज्या पूर्वसुरींनी आमच्या वाटचालीचा मार्ग आखून दिला त्यांचे विनम्र भावाने पुण्यस्मरण करतो. त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने व त्यांच्या आशिर्वादांच्या पुण्याईवर आम्ही आजवरची वाटचाल करताना, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूची शाखा: कै.भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय, मुटाट या शैक्षणिक संस्थांची  सुरुवात करुन यशस्वी संचालन करु शकलो. मंडळाची भावी वाटचाल आणि आगामी संकल्पही सर्वांच्या आशिर्वादाने यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे. हीरक महोत्सवी समारोहाच्या या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी आमचे सर्व संस्थापक, विश्वस्त, सन्माननीय देणगीदार, जाहिरातदार, सभासद, कार्यकर्तें, हितचिंतक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी सज्जन या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून ही वाटचालीची कथा आवरती घेतो.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकरिता

      श्री संजय टाकळे  श्री सुभाषचंद्र परांजपे   श्री विनायक लेले   श्री शिवाजी राणे    श्री विश्वासराव पाळेकर
          कोषाध्यक्ष                  कार्यवाह                  कार्याध्यक्ष             उपाध्यक्ष                     अध्यक्ष